भरारी : पचेल, रुचेल आणि पटेल तेच स्वीकारा | पुढारी

भरारी : पचेल, रुचेल आणि पटेल तेच स्वीकारा

  • देविदास लांजेवार  

रायगडचे जिल्हाधिकारी असताना अविनाश धर्माधिकारी यांना पत्र लिहून मी विचारले होते, आयएएस बनण्यासाठी काय काय वाचावे लागेल? त्यावर त्यांनी उत्तर दिले होते, ‘सूर्याखालचे काहीही!’ या एका वाक्यावरून स्पर्धा परीक्षा उमेदवारांनी नुसता अंदाज जरी घेतला की, त्यांना संघ लोकसेवा आयोगाची परीक्षा क्रॅक करण्यासाठी काय काय वाचण्याचे आणि स्मरणात ठेवण्याचे दिव्य करावे लागेल, तरी त्यांचा यशाचा मार्ग सुकर होईल.

नवीन युगातील मनोरंजक साधनांमुळे मानवाला वेळ मिळेनासा झाला आहे. नवनव्या तंत्रज्ञानावर आधारित माहितीचे मायाजाल विणणारी, ज्ञान देणारी माध्यमे आणि साधने अत्याधुनिक बनली असली, तरी बुद्धी मात्र तीच आहे. तुमच्या बुद्धीची क्षमता, वेग, सहनशक्ती आणि आकलनशक्ती कोणत्याही तंत्रज्ञानाने वाढविता येणार नाही. त्यामुळे नवे शतक वा नवे सहस्रक तुम्हाला जेवढ्या संधी उपलब्ध करून देईल, तेवढ्याच प्रमाणात नवीन आव्हानेही तुमच्यापुढे आ वासून उभी असतील.

प्रत्येक जिज्ञासू विद्यार्थ्याला अमूक आयएएस झालेल्या विद्यार्थ्यात काय विशेष आहे, हे जाणून घेण्याची इच्छा असते. आयपीएस झालेल्याने काय कष्ट घेतले? उपजिल्हाधिकारी बनलेल्या विद्यार्थ्याने अभ्यासाचे नियोजन कसे केले, या प्रश्नांची समर्पक उत्तरे शोधण्यात बहुतांश विद्यार्थी अपयशी होतात. एखादा परीक्षार्थी यशस्वी उमेदवारास संबंधित प्रश्न विचारून त्यांची उत्तरे ऐकतो त्यावेळी तो काहीसा चिंतीत होतो. कारण, यशस्वी उमेदवार उत्तर देताना अनेकदा बडेजाव मारतात. यशस्वी उमेदवार यशाच्या प्रभावाखाली असल्याने त्यांची उत्तरे वास्तवापासून थोडी दूर असतात; पण म्हणून चिंता बाळगण्याचे कारण नाही. कारण, दुसर्‍याचे हुबेहूब अनुकरण करणे अवघड असते आणि असे करताना अंदाज चुकल्याने आपली फसगत होऊ शकते. असा प्रयत्न तुमच्या करिअरसाठी घातक ठरू शकतो.

प्रत्येकाचे एक वेगळे वैशिष्ट्य असते. प्रत्येकाची कार्यपद्धती इतरांपेक्षा वेगळी असू शकते. प्रत्येक आयएएस अधिकारी हा टी. एन. शेषन होऊ शकत नाही की प्रत्येक आयपीएस अधिकारी के. पी. एस. गिल किवा वेद मारवा बनू शकत नाही. इतरांचेही तसेच आहे. तुमच्या सहनशक्तीस पचेल, आवडीला रुचेल आणि मनास पटेल तेच तुम्ही करावयास हवे. कारण, जे तुम्हाला मानवेल तीच पद्धती अवलंबली, तर तुमच्या प्रयत्नास योग्य दिशा मिळू शकते. त्यासाठी स्वत:च्या प्रयत्नातील कच्चे दुवे तुम्ही शोधले पाहिजेत. संकुचित वृत्तीचा त्याग करून ज्ञानाचे आदानप्रदान करण्यास व शिक्षकांचे मार्गदर्शन घेण्यास तत्पर असले पाहिजे. असंख्य अयशस्वी विद्यार्थ्यांनी या तत्त्वांचा अंगीकार करून नंतर यशाची पताका फडकावली आहे.

ज्याला आपल्या मेहनतीवर मोठे बनण्याची जिद्द आहे, तो गरीब असल्याची बतावणी कधीच करणार नाही. ज्याला ज्ञानाची प्रचंड भूक असते तो अंगमेहनत करून पैसे कमावतो आणि उत्कृष्ट पुस्तके खरेदी करून ती भूक भागवतो. तुमचा प्रामाणिकपणा जेवढा तुमच्या कुटुंबीयांना प्रिय असतो तेवढाच तो तुमच्या शिक्षकाला व मुलाखत घेणार्‍या मंडळालाही आवडतो.

तुमच्या ज्ञानभांडारात किती अष्टपैलुत्त्व आहे, ते एका झटक्यात अनुभवी शिक्षक ओळखतात. माहीत नसलेल्या गोष्टी माहित असण्याचा आव आणणे अथवा खोटे संदर्भ आणि माहिती सांगून मुलाखतकारांची तुम्ही दिशाभूल करूच शकत नाही, एवढे मंडळावरील सदस्य विद्वान असतात. मुलाखत देताना तुमची देहबोलीच सांगत असते की, तुम्ही खरे बोलता की खोटे? म्हणून तुम्ही स्वतःला जेव्हा दुसर्‍यासमोर प्रकट करता तेव्हा तुम्ही ढोंग, अप्रामाणिकपणा अथवा खोटेपणाचे कवच धारण करून स्वतःचे संरक्षण करू शकत तर नाहीच; पण भविष्यात काहीच साध्य करू शकत नाही. आजच्या स्पर्धेच्या युगात कठोर परिश्रमाला पर्याय नाही. तुमच्या ज्ञानाची कक्षा जेवढी भव्य असेल तेवढी स्पर्धा परीक्षा तुम्हास सोपी जाईल. ज्ञान वाढविणे हीच जेव्हा तुमची करमणूक होईल तेव्हा तुम्ही समजायचे की, तुम्ही जिंकलात! कोणत्याही क्षेत्रातील अधिकारीपद, राजपत्रितपद तुमच्यासाठी रिकामे असेल. त्यामुळे काय घ्यायचे आणि काय त्यागायचे याची निवड आताच करावी. एवढा चोखंदळपणा तुमच्यात नक्कीच असायला हवा.

Back to top button