लवंगी मिरची : गंमतच आहे ना! | पुढारी

लवंगी मिरची : गंमतच आहे ना!

ही बातमी वाचलीस का मित्रा? शाहिद अन्वर नावाच्या पाकिस्तानच्या मोटिव्हेशनल स्पीकर आणि ब्लॉगर असणार्‍या प्रसिद्ध व्यक्तीने आपले पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक विनंती केली आहे. पाकिस्तान हा देश भारताने भाडेपट्टीवर चालवायला घ्यावा, अशी त्यांनी विनंती केली आहे. पाकिस्तानची परिस्थिती वाईट आहे मित्रा! आज ना उद्या दिवाळखोरी जाहीर करून अंतर्गत यादवी तिथे येऊ घातली आहे, हे सर्व जगाला माहीत आहे; पण देशच भाडेतत्त्वावर आपल्याच शत्रू देशाला देण्याची विनंती करणे म्हणजे खरोखरच गंमत आहे.

गंमत काही नाही. दोन्ही देश जवळपास एकच दिवसाच्या अंतराने स्वतंत्र झाले. भारत कुठल्या कुठे निघून गेला आहे आणि पाकिस्तान कुठल्या कुठे फेकला गेला आहे. यामुळे तेथील नागरिकांमध्ये निराशा असणे स्वाभाविक आहे.

ते खरे आहे; पण एवढ्या समस्यांनी ग्रस्त असणारा देश भाडेतत्त्वावर चालवायचे ठरले, तर किमान ते भाडे देण्याची तरी त्या देशाची ऐपत असली पाहिजे. अतिरेक्यांच्या समस्या, भ्रष्टाचार आणि एकंदरीतच डबघाईला आलेला देश चालवणे अजिबात सोपे नाही, हे नक्की! आज आपण सुरक्षा व्यवस्था मजबूत केल्यामुळे अतिरेकी कारवायांवर बर्‍यापैकी नियंत्रण मिळवले आहे. अमरनाथ यात्रा आली की, अक्षरशः 24 तास कुठे बॉम्बस्फोट होईल याची चिंता असायची. आता तशी चिंता वाटत नाही.

संबंधित बातम्या

अगदी काश्मीरमधले पर्यटन खूप वाढले आहे. लोक निर्भयपणे फिरत आहेत. पाकिस्तानमध्ये याच्या अगदी विरुद्ध परिस्थिती आहे. कधी, कुठे, काय होईल काही सांगता येत नाही. अशा वेळेस भारताने पुढाकार घेतला पाहिजे, असे मला वाटते. उदाहरणार्थ, विविध देशांनी तयार केलेले उपग्रह आपल्या रॉकेटद्वारे ‘इस्रो’ अंतराळात पाठवत असते तशीच आपण देश चालवणारी एक यंत्रणा उभी करून खासगी तत्त्वावर ज्यांना स्वतःचा देश चालवणे जमत नाही त्यांचे देश चालवायला घ्यावेत आणि आपल्या देशाचे उत्पन्न वाढवावे, हे एक नवीन स्टार्टअप होऊ शकते.

म्हणजे मेक इन इंडियासारखे ‘रन बाय इंडिया’ किंवा ‘मॅनेजड बाय इंडिया’ असा काहीतरी उपक्रम पंतप्रधान काढतील, अशी शक्यता नाकारता येत नाही.

नजीकच्या काळामध्ये या उपक्रमासाठी आपल्या शेजारी बरेचशे गिर्‍हाईक आहेत. म्हणजे उदाहरणार्थ, श्रीलंका, नेपाळ, बांगला देश आणि येत्या दोन-तीन वर्षांत ढासळला तर चीनसुद्धा आपल्याला चालवायला मिळू शकतो. दरवर्षी भक्कम भाडे आकारायचे आणि तो देश चालवायचा. शिवाय आपल्या देशातील अनेक लोकांना तिथे रोजगार मिळू शकतो. उद्या पुढे चालून युरोप खंडामध्ये इटलीसारखे देश डबघाईला आले, तर ते पण चालवायला घेता येतील. म्हणजे पुढे चालून भारत अशा जाहिराती देऊ शकेल की, ‘देश चालवता येत नसेल तर? आम्ही आहोत ना! वार्षिक भाडे जमा करा आणि उत्तम पद्धतीने आपला देश चालवून घ्या किंवा भाडेतत्त्वावरील देश चालवण्यासाठी उत्तम गुणवत्ता, कौशल्यपूर्ण व्यवस्थापन, सुरक्षातज्ज्ञ, माजी सैनिक अधिकारी उपलब्ध आहेत.’ कधी काळी आपला देश ब्रिटिशांना चालवायला दिला पाहिजेपासून ते लोक आमचा देश चालवा म्हणेपर्यंत आपण प्रगती केली आहे, ही अभिमानाची बाब आहे, हे निश्चित!

– झटका

Back to top button