काश्मीर : काश्मीरचे दुखणे! - पुढारी

काश्मीर : काश्मीरचे दुखणे!

देशाला स्वातंत्र्य मिळून पंचाहत्तर वर्षे पूर्ण होतानाही काश्मीरची जखम भळभळतेच आहे. काश्मीर मध्ये पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी डोके वर काढले असून तो मोठ्या चिंतेचा विषय बनतो की काय, अशी गंभीर स्थिती तयार होत आहे. गेल्या दहा दिवसांत काश्मीरमध्ये झालेल्या हिंसक घटनांनी केंद्र सरकार आणि जम्मू- काश्मीर पोलिसांसमोर नवे आव्हान निर्माण केले असून काश्मीर मधून बाहेर पडलेले काश्मिरी पंडित परतण्याच्या तयारीत असतानाच दहशतवाद्यांनी हिंसाचार सुरू केला आहे. या घटनांमुळे काश्मीरमधील दहशतवादी संघटनांचे भ्याड रूप पुन्हा एकदा पाहायला मिळाले. श्रीनगरमधील सरकारी शाळेच्या मुख्याध्यापिकेसह एका शिक्षकास दहशतवाद्यांनी गोळ्या घालून मारले. नव्वदच्या दशकात काश्मिरी पंडित आपली भूमी सोडून जाताना ठामपणे दहशतवाद्यांसमोर उभे राहिलेल्या माखनसिंग बिंद्रू यांच्या हत्येने तर खळबळच उडाली. दहशतवादी संघटनांनी एका अर्थाने काश्मीरमध्ये परतणार्‍यांना इशाराच दिला. अर्थात, गेली अनेक वर्षे दहशतवाद्यांचा मुकाबला करणार्‍या जनतेला त्याचा कितपत फरक पडेल, हे आगामी काळात लक्षात येईलच. काश्मीरमध्ये घडलेल्या हिंसाचाराची चौकशी राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून केली जात आहे. प्राथमिक माहितीनुसार दहशतवाद्यांनी ओळखपत्र तपासूनच या हत्या केल्या आहेत. मुस्लिमेतर नागरिकांना लक्ष्य करण्याचा त्यांचा इरादा अगदी स्पष्ट आहे. हिंसाचाराच्या काळात काश्मीरमध्ये दगडफेकही झाली. त्यातील पाचशे तरुणांची तपास यंत्रणेने चौकशी केली. काश्मीरचा विशेष अधिकार काढून घेतल्यानंतर तेथील स्थानिक विकास परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका कडेकोट बंदोबस्तात पार पडल्या. पुन्हा सारे काही सुरळीत होऊ नये, या उद्देशाने फुटिरतावादी नेते आणि अन्य दहशतवादी संघटनांनी पुन्हा चाल केली. जैश- ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तोयबाशीसंबंधित दहशतवाद्यांनीच नावे बदलून हा हिंसाचार घडवून आणल्याचे निवृत्त लष्करी अधिकार्‍यांचे म्हणणे या घटनांचे गांभीर्य आणखी वाढवते. याचाच अर्थ या संघटना पुन्हा वेगाने सक्रिय झाल्या आहेत. गेल्या चार वर्षांपासूनच त्यांनी हा डाव आखल्याचेही स्पष्ट झाले आहे. जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटची स्थापना 1990 मध्ये झाली तेव्हा पहिल्यांदाच दहशतवादी संघटनेला गैरइस्लामी नाव देण्यात आले होते. आता पुन्हा तोच डाव आखला जात असल्याचे सुरक्षा तज्ज्ञांचे म्हणणे आहे. नावे बदलत राहणे आणि दहशतवादी कारवायांना सतत वेगळे वळण देत राहणे ही एक रणनीती आहे. सध्या एके-47 ऐवजी छोट्या पिस्तुलांचा वापर करून दहशतवादी कारवाया केल्या जात असल्याचे दिसते. अर्थात, दहशतवादी संघटना मोठा हल्ला करण्याच्या तयारीत आहेत का, यावरही सुरक्षा यंत्रणा लक्ष ठेवून आहेतच. आत्मघातकी हल्ले, दगडफेक, पठाणकोटसारख्या घटना ही दहशतवादी संघटनांची काम करण्याची वेळोवेळी बदललेली चाल असते. सध्या सर्वसामान्य नागरिकांना लक्ष्य करून दहशतवादी काश्मीरमध्ये त्यांची ताकद दाखविण्याचा प्रयत्न करीत आहेत. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने सीमेपलीकडून होणार्‍या दहशतवादी कारवायांचा निषेध नोंदविला आहे.काश्मीरमध्ये नव्याने दहशतवादी संघटनांमध्ये सामील झालेल्या अथवा होऊ पाहणार्‍या दहशतवाद्यांना पाकिस्तानमधून मदत होत आहे. हे अप्रशिक्षित दहशतवादी मोठे हल्ले करण्याऐवजी पिस्तुलाचा वापर करून नागरिकांना लक्ष्य करीत आहेत. हिंदूंच्या हत्यांचा डाव उधळून लावण्यासाठी भारतीय लष्करानेही ऑपरेशन सुरू केले आहे. लष्कराने दहशतवादी संघटनांना घेराव घालताच दहशतवादी संघटनांनी जोरदार गोळीबार केला. त्यात पाच भारतीय जवान धारातीर्थी कोसळले. एकाच वेळी पाच जवानांंना हौतात्म्य पत्करावे लागल्याने आगामी काळात दहशतवाद संघटना हेच लष्कराचे लक्ष्य असतील, हे स्पष्ट आहे. एका बाजूने पाकिस्तानमधून प्रशिक्षित घेऊन आलेले दहशतवादी आणि दुसरीकडे काश्मीरमध्येच अर्धवट प्रशिक्षित दहशतवादी असा दुहेरी डाव पाकिस्तानने आखलेला दिसतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 ऑगस्ट हा फाळणीच्या कटू आठवणींचा दिवस म्हणून ओळखला जाईल, असे जाहीर केल्यानंतर काही दिवसांतच हिंसाचार उफाळला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी संघटनांमध्ये सामील होणार्‍या युवकांची संख्या पुन्हा एकदा वाढत आहे. त्यांच्याशी चर्चा आणि समन्वयाची दारे पुन्हा बंद झाली असून लष्कर आणि स्थानिकांतील दरी वाढतच आहे. त्यातच अफगाणिस्तानातून तालीबानच्या मदतीने या कारवाया घडवल्या जाण्याचा धोका वाढला आहे. अलीकडील घटनांचा मागोवा घेतला जात असून या शक्यता पडताळल्या जात आहेत. दुसर्‍या बाजूला चीनकडून होणारी डोकेदुखी वाढतच आहे. भारत आणि चीनमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील ताब्यासंदर्भात एकमत होऊ शकले नाही. याबाबत सातत्याने चर्चा होते आणि त्यातून काही एक मार्ग निघत नाही, हा आजवरचा इतिहास आहे. अशा चर्चेच्या तेरा फेर्‍या निष्फळ ठरल्या आहेत. आगामी काळातही तात्पुरत्या तडजोडीपलीकडे या दोन देशांत ठोस निर्णय होण्याची सुतराम शक्यता नाही. सध्या काश्मीरमध्ये सुरू असलेला हिंसाचार चीन आणि पाकिस्तानच्या रणनीतीचा भाग असावा, असेही म्हटले जाते. पाकिस्तान, भारत आणि चीन हे तिन्ही देश एकमेकांसोबतचे संबंध जोपासताना वेगवेगळी रणनीती ठरवितात. ती या तिन्ही देशांची अपरिहार्यता आहे की, आपापल्यापरीने दबाव वाढविण्याचा सोपा मार्ग आहे, यावर चर्चा होऊ शकेल. भारताला काश्मीरमधील हिंसाचार निपटताना चीन आणि पाकिस्तानमधील हालचालींवरही लक्ष ठेवावे लागेल, असे जाणकारांचे मत आहे. 370 व्या कलमाची बरखास्ती आणि त्रिभाजनानंतरही खोर्‍यातील परिस्थिती फारशी सुधारलेली नाही. काश्मीरची जखम बरी व्हायला आणखी किती वर्षे लागणार, हाच आपल्यासमोरचा मोठा प्रश्न आहे. राजकीय हस्तक्षेप आणि संवाद-समन्वय आणि दीर्घकालीन योजनेशिवाय हे शक्य नाही.

Back to top button