रमजान ईद विशेष : मानवतेची हाक! | पुढारी

रमजान ईद विशेष : मानवतेची हाक!

बेबंद, रानटी, अराजक माजलेल्या अमानुष समूहाला मानवतेच्या वाटेवर आणणे एक दिव्य कार्य होते. विश्व आणि निसर्ग यांच्यातील दिव्यत्वाला एकच एक परमेश्वर प्रमाण मानून मानवतेच्या या प्रवासात जे जे प्रयत्न झाले ते इस्लामी कार्यच होते, असे इस्लामचे म्हणणे आहे. हजरत मोहम्मद (स.) पैगंबर यांचे पूर्वी अनेक प्रेषितांनी मानवतेच्या या कार्यासाठी जीवन अर्पण केले. हेच कार्य हजरत मोहम्मद (स.) पैगंबर यांनी परिपूर्ण केले.

इस्लामची स्थापनाच मुळी मानवतेच्या प्रतिष्ठापनेसाठी सत्य, न्याय आणि नैतिकतेच्या शाश्वत मूल्यांच्या आधारावर झाली. इस्लामच्या स्थापनेपूर्वीचा अज्ञानकाळ (जाहिलियत) अशाच रानटी, बेबंद अराजकाच्या खोल गर्तेत बुडाला होता. अशा पार्श्वभूमीवर ज्ञान, विज्ञान, बुद्धी आणि विवेकवादाच्या कसोटीवर इस्लामने मानवतेची साद घातली. अनेक निर्जीव देव-देवता, प्रतीके, चिन्ह, वस्तू, प्राणी, स्वयंघोषित देव व महात्मे आणि यावर आधारित अंधश्रद्धा, रूढी, परंपरा, चालीरीती यांचा हलकल्लोळ एकाच वैश्विक परमेश्वराच्या जयघोषाने शमवण्यात आला. परमेश्वराच्या औदार्याबद्दल कृतज्ञता आणि भक्ती करावी. स्वतःचा विचार उच्च व उन्नत करावा. विश्वाचे सत्य जाणावे. नैसर्गिक न्यायावर द़ृढ राहावे. शाश्वत नैतिक मूल्ये जोपासावी ज्यामुळे मानवतेची प्रतिष्ठापना होईल, माणसाचा गौरव आणि सन्मान होईल हीच इस्लामची आध्यात्मिकता आणि धार्मिकता होय. धर्माची झुल (पोशाख), प्रतीके, चिन्हं वापरून आणि कर्मकांड करून माणूस धार्मिक होत नाही. त्यासाठी उदार व विशाल अंतःकरण हवे. माणसांप्रती प्रेम, दया, करुणा हवी. अर्थात इस्लामचा हा मार्ग सत्कर्मासह दीनदुबळ्या, गरीब व कमजोर यांचे प्रति दया, परोपकार आणि मानवतेच्या सेवेचा आहे.

आजचे समाज जीवन अमर्याद स्वार्थ, हव्यास आणि परिग्रहाने इतके बरबटलेले आहे की, त्यासाठी माणूस कोणत्याही थराला जाऊ शकतो. श्रेष्ठत्वाची भावना, इतरांना कमी व तुच्छ लेखणे, वर्चस्ववाद, प्रस्थापितांची दांडगाई, इतर धर्म समूहांवर जुलूम, जबरदस्ती, अन्याय, कुरघोडी, वर्चस्व, द्वेष करणे, घृणा पसरवणे आणि यासाठी प्रसंगी अनाचार व हिंसाचार करणे अशा गोष्टी आज राजरोस पाहायला मिळत आहेत. अशाप्रकारे माणसामाणसांत भेदभाव करणारा विचार म्हणजे विकार आणि अशी कृती म्हणजे विकृतीच होय. अशा या हलकल्लोळात दीनदुबळ्या, शोषित, पीडितांचा आर्त आवाज इतका क्षीण झाला आहे की, तो आज ऐकायलाही येत नाही.

रमजानमध्ये माणसाला या सर्व गोष्टींपासून परावृत्त करून मानवतेच्या वाटेवर चालण्याची कसरत केली जाते. सत्य, न्याय आणि नैतिकतेच्या आधाराने एक साधा व सरळ मार्ग इस्लामच्या तत्त्वज्ञानाकडे नेतो. यामध्ये एकच एक परमेश्वराच्या भक्तीबरोबरच आध्यात्मिक उन्नतीस वाव आहे. मानवतेच्या या मार्गात सत्कर्म, सदाचाराबरोबरच दीन-दुःखी,

गोरगरिबांप्रती दया, परोपकार, सेवा, समर्पणाला विशेष महत्त्व आहे. अनिवार्य जकात, फित्रा, खैरात अशा आर्थिक दानधर्माचे कर्तव्यही आपणास जबाबदारीने पार पाडावे लागते. समाजात सामाजिक, आर्थिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान देणे गरजेचे आहे. रमजान महिन्यातील प्रत्येक चांगली कृती ही एक प्रकारे धर्मादाय बाब म्हणावी लागेल. ‘इन्सान बनो, कर लो भलाई’ची शिकवण रमजानमध्ये दिली जाते. एकंदरीत रमजानमध्ये अंत:करणाची शुद्धता (पावित्र्य), इस्लामच्या विचारांची स्पष्टता, इस्लामच्या तत्त्वज्ञानाशी बांधिलकी आणि कर्तव्यातील प्रामाणिकपणा मानवतेच्या वाटेवर घेऊन जातो. याबाबत हजरत मोहम्मद (स.) पैगंबर यांचे साधे व फकिरीचे, परंतु उच्च विचार व ध्येयाने प्रेरित संपूर्ण जीवन म्हणजे इस्लामी जीवन पद्धतीचा एक आदर्श नमुना म्हणावा लागेल.

सन्मान, शांती, सद्भाव, समता आणि सुरक्षिततेचा हा इस्लामी मार्ग आत्मोद्धार व समाजोद्धाराची दारे उघडणारा आहे. आपल्याला अज्ञानाच्या अंध:कारातून बाहेर काढून प्रकाशाकडे आणतो आणि सरळ मार्गाकडे नेतो. ज्ञान, भक्ती, सत्कर्म, सेवेचा (खिदमत) हा मार्ग अंतिमतः समाज आणि मानव कल्याणाकडे घेऊन जातो. सत्कर्म आणि चांगुलपणाचे हे संचित आपल्याला सुखी, संपन्न व यशस्वी भविष्याकडे नेणारे ठरेल. शेवटी एवढेच म्हणावे वाटते.

‘यही है इबादत, यही दिन ओ इमान,
के काम आये दुनिया में इन्सान के इन्सान।’

– शफीक देसाई

Back to top button