प्राचीन वारसा जपायला हवा

प्राचीन वारसा जपायला हवा

भारतात शेकडो वर्षांपूर्वी बांधल्या गेलेल्या पक्क्या वास्तू उपेक्षेमुळे अद़ृश्य झाल्या आहेत. ज्या दिसतात, त्यांची दुरवस्था झाली आहे. या वास्तूंबाबत त्या-त्या परिसरातील लोकांमध्येच कमालीची उदासीनता आहे. या वास्तू अस्वच्छ तर आहेतच; शिवाय त्यांच्या परिसरात अतिक्रमणेही झाली आहेत.

अमेरिकेत कायुगा तलावालगत एक जुनाट झोपडीवजा घर आहे. 1890 च्या काळात कोणी तरी बांधलेले. ज्याने ते विकत घेतले, त्याने त्याची डागडुजी केली; सभोवताली वृक्ष लावले. आता ते एक लोकप्रिय पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध झाले आहे. भारतात मात्र शेकडो वर्षांपूर्वी बांधल्या गेलेल्या पक्क्या वास्तू उपेक्षेमुळे अद़ृश्य झाल्या आहेत. ज्या दिसतात, त्यांची दुरवस्था झाली आहे. या वास्तूंबाबत त्या-त्या परिसरातील लोकांमध्येच कमालीची उदासीनता आहे. या वास्तू अस्वच्छ तर आहेतच; शिवाय त्यांच्या परिसरात अतिक्रमणेही झाली आहेत. अमेरिकेसारख्या मानसिकतेतून त्या जपल्या असत्या, तर चांगले उत्पन्न मिळाले असते.

मराठवाड्यातील 33 संरक्षित स्मारकांना अतिक्रमणांनी वेढा घातला आहे आणि ऐतिहासिक किल्ल्यांमध्ये तर दफनविधीही केला जातो, असे उत्तर त्यांना मिळाले. छत्रपती संभाजीनगर विभागात 98, तर नांदेड विभागात अशी 180 स्मारके आहेत. यातील पाणचक्की, धारूर किल्ला, तुळजाभवानी मंदिर, नळदुर्ग किल्ला यासारख्या महत्त्वाच्या स्मारकांभोवती अतिक्रमणे वाढली आहेत. पुरातत्त्व विभाग अशा अतिक्रमणांची माहिती जिल्हा प्रशासनाला कळवतो आणि नियमानुसार प्रशासन स्थानिक स्वराज्य संस्थांना अतिक्रमणे हटविण्याचे निर्देश देते. परंतु, हा कागदोपत्री पत्रव्यवहार ठरतो. प्रत्यक्षात अतिक्रमणे कधीच हटविली जात नाहीत. हळूहळू त्यांचा पर्यटकांना त्रास होऊ लागतो आणि त्यांचा ओघ रोडावत जातो. मराठवाड्यातील बीबी-का-मकबरापासून वेरूळपर्यंत आणि घृष्णेश्वर मंदिरापासून तुळजाभवानी मंदिरापर्यंत अतिक्रमणांनी उच्छाद मांडला आहे.

एकदा भेट देणारा पर्यटक श्रद्धेपोटी केवळ धार्मिक स्थळांनाच पुनःपुन्हा भेट देतो. इतर पर्यटनस्थळांकडे ढुंकूनही पाहत नाही. या अतिक्रमणांनी पर्यटनस्थळांना विद्रूप करून ठेवले आहे. स्थानिकांना त्याची तमा नाही अन् पालिकांनाही सोयरसूतक नाही. सर्वच पालिकांनी पर्यटनस्थळांभोवतालच्या अतिक्रमणांवर बुलडोझर चालवावा, असा आदेश मंत्रालयातूनच काढला जायला हवा. अतिक्रमणे केलेल्या व्यावसायिकांना पर्यटनस्थळांपासून काही अंतरावर पर्यायी जागा द्यावी आणि ते बांधकामही कलात्मक, पर्यटनस्थळाला साजेसे असावे; अन्यथा बहुतेक पर्यटनस्थळांवर पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, गुटखा-तंबाखूच्या पुड्यांमुळे जागोजागी उकिरडे तयार झाले आहेत.

गोदावरी ही मराठवाड्याची जीवनवाहिनी. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून ती मराठवाड्यात प्रवेश करते आणि नांदेडपर्यंतचा प्रदेश सुजलाम् करून पुढे तेलंगणात जाते. वाटेत बीड, परभणी या जिल्ह्यांचीही तहान भागवते. या चारही जिल्ह्यांमध्ये या नदीवर प्राचीन घाट आहेत. या घाटांचे रेखीव बांधकाम कोणाचेही लक्ष वेधून घेते. नदीकिनारी शेकडो हेमाडपंथी मंदिरे आहेत. काही मंदिरे तर पात्रातही आहेत. एकेका मंदिराला, घाटाला शेकडो वर्षांचा इतिहास आहे. असे प्रत्येक ठिकाण उत्कृष्ट पर्यटनस्थळ म्हणून विकसित करता आले असते; पण हा ठेवा जतन करण्याचा प्रयत्न कधीही झाला नाही.

त्यामुळे नवे बांधकाम तर दूरच; पण घाटांचे कोरीव दगडही चोरून लोकांनी घरे बांधली. पात्रातील वाळूदेखील उपसण्यात आली. त्यामुळे या नदीकाठचे सौंदर्यच हरपले आहे. आळंदीतील इंद्रायणी नदी पंचवीसेक वर्षांपूर्वी अशीच उपेक्षित होती. प्रशासनाने लक्ष घातले अन् त्या परिसराचा कायापालट केला. काही अंशी पैठण, नांदेड येथे गोदावरी नदीवरही नवे घाट बांधले गेले, परिसर विकसित केला गेला; पण त्याचे पावित्र्य जपले गेले नाही. ही ठिकाणे अंत्यविधीसाठीच महत्त्वाची ठरली. त्यामुळे सर्वदूर अस्वच्छता पसरली. जसे लोक, तसा परिसर. प्रशासनाने कितीही विकास केला, तरी त्याचे लोकांकडून जतन झाले पाहिजे.

– धनंजय लांबे

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news