लवंगी मिरची : बंडोबांचा विजय असो! | पुढारी

लवंगी मिरची : बंडोबांचा विजय असो!

कर्नाटक विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत मित्रा. रोज पेपरमध्ये वाचतो आहे की, प्रत्येक पक्षामध्ये तुफान बंडखोरी आहे. हे बंडखोरी प्रकरण नेमके काय आहे?

बंडखोरी म्हणजे फक्त राजकारणात असते हा तुझा गैरसमज आधी काढून टाक. बंडखोरी काही नवीन नाही आणि ती अत्र, तत्र, सर्वत्र आहे. म्हणजे बघ, मुलगा बापाचं ऐकत नाही म्हणजे बंडखोरीच आहे. सासू सुनेला दोडक्याची भाजी करायला सांगते आणि ती न करता सून कोबीची भाजी करते हीसुद्धा एक प्रकारची बंडखोरीच आहे.
अरे, काय सांगतोस काय? घरातल्या घरात कुठं बंडखोरी असते का?

मी सांगितलं ना तुला बंडखोरी सर्वत्र असते म्हणून. कार्यालयात साहेबाने सांगितलेले काम कर्मचार्‍याने न करणे हीसुद्धा एक प्रकारची बंडखोरीच आहे. त्यामुळे बंडखोरी फक्त राजकारणात असते हा विचार आधी मनातून काढून टाक. ती सर्वत्र असते.
हो, पण राजकारणात बंडखोरीचे प्रमाण जास्त आहे हे नक्की.

संबंधित बातम्या

साहजिक आहे. एखादा कार्यकर्ता किंवा स्थानिक भागातील एखादा नगरसेवक सातत्याने गेले कितीतरी वर्षे जनतेची सेवा (?) करत असतो. त्याच्या डोळ्यापुढे या भागातून आमदार होणे हे एकमेव लक्ष्य असते. मग तो त्या मतदारसंघावर लक्ष केंद्रित करतो. त्या भागातील प्रत्येक कार्यक्रमाला, अगदी मयती पासून ते डोहाळ जेवणापर्यंत प्रत्येक कार्यक्रमाला तो हजेरी लावत असतो. म्हणजे त्याचा प्रयत्न जनसंपर्क वाढवण्याचा असतो. वाढलेल्या जनसंपर्काच्या जोरावर पुढील निवडणुकीत आपण शंभर टक्के आमदार होऊ याची त्याला खात्री असते. त्यासाठी त्याने पाण्यासारखा पैसा खर्च केलेला असतो. कार्यकर्ता म्हटल्यानंतर त्याचा कोणता तरी पक्ष असतो. पक्षाचे तिकीट मिळविण्यासाठी हा आपले हाय कमांडमध्ये असलेले संबंध वापरून पाहतो. हाय कामांडचा पण कधी-कधी नाईलाज होतो. काही विशिष्ट निकषांमध्ये हा कार्यकर्ता बसला नाही, तर पक्ष दुसर्‍याच व्यक्तीला तिकीट देतो.

निवडणूक लढवण्याची पूर्ण शारीरिक, मानसिक आणि आर्थिक तयारी करून बसलेला हा कार्यकर्ता मग नाराज होतो आणि फुटकळ पक्षाकडून तिकीट घेऊन किंवा थेट अपक्ष म्हणून मैदानात उतरतो.. मग मूळ पक्षातले आणि इतर लोक त्याने बंडखोरी केली, असे म्हणू लागतात. अमुक इतके बंडखोर मैदानात अशा बातम्या यायला लागतात. बरेचदा तगड्या उमेदवारांपैकी कोणीतरी बंडखोरांना मैदानात उतरवतात. अशा बंडखोरांना निवडणुकीला उभे राहून विशिष्ट उमेदवारांचे विजयाचे गणित बिघडवण्याचे काम दिलेले असते. त्यासाठी त्यांना आर्थिक पाठबळही भरपूर मिळते. दिलेली कामगिरी पूर्ण करून, स्वतः पराभूत होऊन, भरपूर कमाई करणारे बंडखोर पण आपल्या देशात भरपूर आहेत. म्हणजे बंडखोरी हा स्वतः पराभूत होऊन, दुसर्‍याला पराभूत करून यश मिळवण्याचा एक मार्ग आहे, असे म्हणायचे आहे.

– झटका

Back to top button