सौरऊर्जेविन नाही गत्यंतर… | पुढारी

सौरऊर्जेविन नाही गत्यंतर...

अपर्णा देवकर

जलविद्युत आणि औष्णिक वीजगृहे उभारूनही विजेची गरज भविष्यात पूर्ण होऊ शकणार नाही, म्हणून सौरऊर्जे चा स्वीकार जास्तीत जास्त प्रमाणात करणे आवश्यक आहे. सौरउर्जा साठवून ठेवू शकलो तर आपण आपल्या गरजा पूर्ण करू शकतोच; शिवाय पृथ्वीसारखे शेकडो ग्रह उजळून टाकू शकतो.

पाच वर्षांपूर्वी म्हणजे 2015 मध्ये पॅरिस जलवायू परिवर्तन संमेलनात शंभर सूर्यपुत्र देशांची एक सौर आघाडी तयार करण्याची घोषणा केली होती. सौरऊर्जे च्या दृष्टीने श्रीमंत देशांची मोट बांधणे आणि आंतरराष्ट्रीय सौरऊर्जा बाजारपेठ वाढविणे तसेच भारतातही सौरऊर्जेच्या निर्मितीत उल्लेखनीय वाढ करणे हाही यापाठीमागे उद्देश होता. त्यावेळी पुढील सात वर्षांत (म्हणजे 2022 पर्यंत) एक लाख मेगावॅट (100 गीगावॅट) सौरऊर्जेची निर्मिती भारतात करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. भारत या दिशेने पुढे वाटचाल करीत आहे. गेल्या महिन्यात गुजरातमधील कच्छमध्ये 72 हजारांहून अधिक हेक्टरवर जगातील सर्वांत मोठ्या रिन्युएबल एनर्जी पार्कची मुहूर्तमेढ रोवण्यात आली.

ऊर्जानिर्मितीच्या सर्व स्रोतांची क्षमता आणि त्यांच्या सकारात्मक-नकारात्मक पैलूंचा अभ्यास केला असता एक निष्कर्ष असा निघतो की, भविष्यात सूर्यच आपले सर्वाधिक कल्याण करू शकतो. विशेषतः विषुववृत्तापासून कर्कवृत्तापर्यंतच्या प्रदेशातील सुमारे शंभर देशांनी जर
सौरऊर्जेचा वापर वाढविला तर आपल्या बहुतांश गरजा ते अक्षय ऊर्जेच्या माध्यमातून पूर्ण करू शकतातच; शिवाय त्यामुळे जगातील कार्बन उत्सर्जनात मोठी घट झाल्याचेही यामुळे पाहायला मिळेल. पृथ्वीवर सूर्याकडून येणार्‍या प्रकाशाच्या शक्‍तीचा अंदाज घेऊन इंटरनॅशनल एनर्जी एजन्सीने (आयईए) 2014 मध्ये एक अहवाल प्रकाशित केला होता. त्यात असा अंदाज व्यक्‍त केला होता की, सन 2050 पर्यंत सौरऊर्जेच्या माध्यमातूनच जगात सर्वाधिक प्रमाणात वीजनिर्मिती केली जात असेल.

संबंधित बातम्या

या अंदाजानुसार, सोलर फोटोवोल्टिक (पीव्ही) या सौरऊर्जा निर्मितीच्या एका तंत्रज्ञानाच्या माध्यमातून 2050 पर्यंत जगाच्या एकंदर गरजेच्या 16 टक्के वीज बनविली जात असेल. सोलर थर्मल इलेक्ट्रिसिटी (एसईटी) या सौरऊर्जा निर्मितीच्या अन्य एका तंत्रज्ञानाच्या माध्यमातून 11 टक्के वीज स्वतंत्रपणे मिळू लागली असेल. या दोन्ही सौर ऊर्जानिर्मिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सन 2050 पर्यंत इतकी वीज निर्माण होऊ शकेल, ज्याद्वारे सुमारे सहा अब्ज टन कार्बनडाय ऑक्साईडचे उत्सर्जन दरवर्षी रोखण्यात यश येईल. हे प्रमाण सध्याच्या काळात परिवहनाच्या माध्यमातून सोडल्या जाणार्‍या एकंदर कार्बनडाय ऑक्साईडएवढे आहे. सध्या भारतात सर्वाधिक म्हणजे 59 टक्के वीज कोळशाच्या ज्वलनातून बनविली जाते. याला आपण ‘थर्मल पॉवर’ असे म्हणतो. या विजेचे उत्पादन सर्वाधिक असण्याचे कारण असे की, कोळशाच्या ज्वलनातून मिळणारी वीज स्वस्त पडते. देशात 17 टक्के वीज जलविद्युत योजनांमधून, 9 टक्के वीज नैसर्गिक वायूच्या ज्वलनातून तर तीन टक्के अणुभट्टीच्या माध्यमातून तयार केली जाते. अपारंपरिक स्रोतांमधून म्हणजे हवा आणि सूर्यप्रकाशापासून सध्या 12 टक्के अक्षय ऊर्जा तयार केली जाते.

तज्ज्ञांच्या मते, जसजसा सौरऊर्जे चा विस्तार होईल, तसतशी तिची किंमत कमी होत जाईल आणि निकटच्या भविष्यात हाच ऊर्जेचा सर्वांत किफायतशीर पर्याय असेल. सध्या आपल्या देशात निर्माण होणारी सौरऊर्जा प्रतियुनिट 6.50 रुपये दराने मिळते. कोळशापासून तयार होणार्‍या विजेच्या तुलनेत ही किंमत 14 टक्के अधिक आहे. भारतात सौरऊर्जा अद्याप एवढी महाग असण्याचे कारण असे की, तिच्या उत्पादनाशी संबंधित योजनांवर आपण खूप उशिरा काम सुरू केले. जर्मनीत 2001 पासून सौरऊर्जेचे उत्पादन सुरू झाले आणि आता तेथे 36 हजार मेगावॉट वीज तयार केली जाते. भारतात उत्पादनाची सुरुवात 2012 मध्ये झाली आणि त्यावेळी 25 मेगावॅट होणारे उत्पादन आजतागायत केवळ 1760 मेगावॅटपर्यंत पोहोचू शकले आहे. सौरऊर्जा हळूहळू स्वस्त होत जाईल, म्हणूनच केवळ जगाने सौरऊर्जेला प्राधान्य दिले पाहिजे असे नाही तर धरणे बांधून निर्माण होणारी जलविद्युत आणि औष्णिक वीजगृहे उभारूनही विजेची गरज भविष्यात पूर्ण होऊ शकणार नाही, म्हणून सौरऊर्जेचा स्वीकार जास्तीत जास्त प्रमाणात करणे आवश्यक आहे. त्याऐवजी पृथ्वीवर दरवर्षी सुमारे एक लाख वीस हजार टेरावॅट (सौरऊर्जा मोजण्याचे एकक) सौरऊर्जा तयार होते आणि जगभरात सौरऊर्जेची गरज दरवर्षी सुमारे 15 ते 50 टेरावॅटच आहे. एका अंदाजानुसार, माणसाला जेवढ्या विजेची आवश्यकता संपूर्ण वर्षभराच्या कामकाजासाठी असते, तेवढी सौरऊर्जा तर अवघ्या एका दिवसातच पृथ्वीपर्यंत पोहोचते.

Back to top button