

– रवींद्र सावंत, लघुउद्योजक
गतवर्षी 'फोर्ब्स' या मासिकाने सर्वात वयोवृद्ध अब्जाधीश म्हणून गौरवलेल्या केशब महिंद्रा यांचे निधन झाले आहे. व्यावसायिकता, अचूक अर्थशास्त्रीय धोरणे आणि सामाजिक भान ही कोणत्याही उद्योगयशाची शाश्वत त्रिसूत्री मानली जाते. केशव महिंद्रा यांच्याकडे या तिन्ही सूत्रांची उत्तम सांगड घालण्याची विलक्षण प्रतिभा होती.https://pudhari.news/sampadakiy/512216/सुसंस्कृत-प्रतिभावंत-उद्योगपती/ar
भारताच्या आर्थिक प्रगतीत विकासाच्या चढत्या आलेखात, रोजगारनिर्मितीत देशातील काही प्रमुख उद्योग घराण्यांचे मोठे योगदान राहिले आहे. प्रगत पाश्चिमात्य देशांत औद्योगिक क्रांती होऊन त्याची फळे तिथला समाज आनंदाने चाखत असताना भारत भूमीतही अशाप्रकारे औद्योगिकीकरणाची गंगा वाहिली पाहिजे, या हेतूने अनेक उद्योजकांनी व्यावसायिक कौशल्याच्या, उद्यमशीलतेच्या आधारे नियोजनबद्ध प्रयत्न केले. या नामावलींत महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे माजी अध्यक्ष केशब महिंद्रा यांचा उल्लेख आवर्जून करावा लागेल. अलीकडेच 'फोर्ब्स' या जगविख्यात मासिकाने 1.2 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह त्यांना भारतातील सर्वात वृद्ध अब्जाधीश म्हणून घोषित केले होते.
व्यावसायिकता, अचूक अर्थशास्त्रीय धोरणे आणि सामाजिक भान ही कोणत्याही उद्योगयशाची शाश्वत त्रिसूत्री मानली जाते. केशब महिंद्रा यांच्याकडे या तिन्ही सूत्रांची उत्तम सांगड घालण्याची विलक्षण प्रतिभा होती. उद्योगसमूहाने देशातच नव्हे, तर जगभरात स्वतःची जी ओळख निर्माण केली आहे, त्यामध्ये केशब महिंद्रांचे योगदान मोठे आहे. 1962 ते 2012 अशी 48 वर्षे ते या उद्योगसमूहाचे अध्यक्ष राहिले. अर्धशतकी कार्यकाळात त्यांनी विलीज-जीपला वेगळी ओळख तर दिलीच; पण त्याबरोबरीने या उद्योगसमूहाचा उत्पादन क्षेत्राबरोबरच आयटी, रिअल इस्टेट, वित्तीय सेवा आणि हॉस्पिटॅलिटी या क्षेत्रांतही विस्तार केला.
केशब महिंद्रा हे मूळचे शिमल्याचे. त्यांचा जन्म 9 ऑक्टोबर 1923 रोजी शिमला येथे झाला. शिमल्यात प्रारंभिक शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी अमेरिकेतील व्हार्टनमधील पेनसिल्व्हेनिया विद्यापीठातून पदवी प्राप्त केली. ते सेल, टाटा स्टील, टाटा केमिकल्स, इंडियन हॉटेल्स, आयएफसी आणि 'आयसीआयसीआय'सारख्या मोठ्या कंपन्यांच्या संचालक मंडळावर होते. 2004 ते 2010 पर्यंत ते पंतप्रधानांच्या व्यापार आणि उद्योग परिषदेचे सदस्य होते. वडिलांच्या कंपनीमध्ये दाखल झालेले केशबजी 1963 मध्ये महिंद्रा उद्योगसमूहाचे अध्यक्ष बनले. त्यांच्या नेतृत्वाखाली या समूहाने यशाची नवनवीन शिखरे पादाक्रांत केली. तरही त्यांच्या व्यक्तिमत्त्वात अथवा वर्तणुकीत या यशाचा दंभ दिसला नाही. ते आयुष्यभर साधेपणानेच जगले. व्हार्टन पत्रिकेला दिलेल्या एका मुलाखतीत केशब महिंद्रा यांनी जे. आर. डी. टाटा हे आदर्श असल्याचे म्हटले होते. माझ्या आयुष्यातील गुरूंची नावे विचारल्यास व्यापार-उद्योगजगतातील जे. आर. डी. टाटा आणि सामाजिक आणि राजकीय जगतातील नानाजी देशमुख यांचा उल्लेख मी करेन, असे त्यांनी म्हटले होते. तसेच या दोघांमध्ये एक समान धागा असल्याचेही त्यांनी म्हटले होते. हा समान धागा म्हणजे त्यांच्यातील उत्स्फूर्त उत्साह. अडीअडचणीतील लोकांच्या, शोषितांच्या, निराधारांच्या सेवेसाठी ही दोन्हीही व्यक्तिमत्त्वे सदोदित समर्पित राहिली, असे त्यांचे मत होते. अशा निःस्पृह व्यक्तींचा आदर्श ठेवल्यामुळे आणि कुटुंबातून झालेल्या संस्कारांमुळे केशब महिंद्रा हे दानशूर बनले. समाजाचे आपण देणे लागतो, या भावनेतून त्यांनी विविध व्यक्ती आणि संस्थांना दिलेल्या देणग्यांचा आलेख हा नेहमी उंचावत राहिला. सध्या जगभरातील उद्योगविश्वात कॉर्पोरेट गव्हर्नन्स या शब्दाची चर्चा होत असते. परंतु, केशब महिंद्रा यांनी कॉर्पोरेट गव्हर्नन्सची नव्याने व्याख्या केली आणि उद्योग व्यवस्थापनाचा वापर केवळ नफा मिळवण्यापुरता न करता त्याची व्यापकता वाढवली. त्यांच्याच प्रयत्नांमुळे आज सुमारे 19 अब्ज डॉलर्सचा असणारा महिंद्रा समूह केवळ ट्रॅक्टर आणि स्पोर्टस् युटिलिटी वाहनांसाठीच ओळखला जात नसून, अन्य क्षेत्रांतही या समूहाने यशाचे मानदंड प्रस्थापित केले आहेत. 1987 मध्ये फ्रेंच सरकारने केशब महिंद्रा यांना व्यावसायिक जगतात दिलेल्या योगदानाबद्दल सर्वोच्च नागरी सन्मानाने सन्मानित केले होते.
असा हा परोपकारी मनाचा उद्योगमहर्षी जगाचा निरोप घेऊन अनंताच्या प्रवासाला गेला आहे. काही दिवसांपूर्वी पालोनजी मिस्त्री यांचे निधन झाले. राकेश झुनझुनवाला यांच्यासारखा 'बिग बुल'ही आपल्यातून निघून गेला. सायरस मिस्त्रींचेही अपघाती निधन झाले. राहुल बजाज यांनीही जगाचा निरोप घेतला. 'सुझलॉन'चे संस्थापक तुलसी तांती यांचेही काही महिन्यांपूर्वी निधन झाले. इंडियन स्टील मॅन म्हणून ओळखल्या जाणार्या जमशेद जे. इराणी यांनीही अलविदा केला. भारत 'मॅन्युफॅक्चरिंग हब' बनण्याच्या दिशेने प्रवास करत असताना अशा उद्योगस्तंभांचे जाणे हे पोकळी निर्माण करणारे आहे.