श्री धान्य की आदिम धान्य! | पुढारी

श्री धान्य की आदिम धान्य!

आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष -2023 संयुक्त राष्ट्र संघातर्फे नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. या निमित्ताने…

‘ग्लोबल सेंटर ऑफ एक्सलन्स ऑन मिलेटस्’चे (बाजरी केंद्र) उद्घाटन झाले. ग्लोबल मिलेटस्चा सचा परिसंवाददेखील पार पडला. इतकेच नाही, तर आंतरराष्ट्रीय श्री धान्य वर्षाचे टपाल तिकीटही जारी करण्यात आले. श्री धान्य केवळ परिसंवाद आणि कार्यशाळेमध्ये दिली जाणारी मोठाली व्याख्याने आणि संशोधनात्मक पेपरपुरता मर्यादित न राहता त्याचे वास्तव पडताळून घेणे आवश्यक आहे. या अन्नाला जरी श्री धान्य नाव दिले असले तरी, आपण पहिल्यांदा श्री किंवा देव अन्न याचा अर्थ समजावून घ्यायला हवा.

भरड धान्यात ज्वारी, बाजरी, राजगिरा, कोद्रो, कुटकी, सावा, राळा, वरई (भगर), नाचणी या पिकांचा समावेश होतो. जागतिक भरड धान्य उत्पन्नाच्या 41 टक्के उत्पन्न भारतात होते. याचे आहारातील महत्त्व जाणून घेऊन त्यांचा वापर दैनंदिन आहारामध्ये होणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी या धान्याचे लाभ जनसामान्यांच्या मनावर विविध स्तरांतून बिंबवणे आवश्यक आहे.

भरड धान्य पिकांची वैशिष्ट्ये म्हणजे ही अल्प पावसाच्या परिस्थितीत शुष्क आणि अर्धशुष्क भागात वाढतात. यांपासून अ‍ॅलर्जीचा धोका नाही. नैसर्गिकरीत्या तयार झालेले अन्न ज्यामध्ये कुठल्याही मानवी गोष्टींचा हस्तक्षेप, अनुवांशिक हस्तक्षेप किंवा आधुनिक अवजारे, कीटकनाशके यांचा वापर न करता पिकवलेले धान्य असा भारतीय अर्थ आहे. जगभरात सेंद्रिय शेती ही संकल्पना राबविली गेली आहे. त्यामुळे भरड धान्यास श्री धान्य ऐवजी बाजरी किंवा पोषक तृणधान्ये हा शब्द वापरण्यास हरकत नाही.

कारण, सेंद्रिय शेती करणे कोणत्या एका देशाची मक्तेदारी नाही आणि शेतीचे केंद्रीकरण करणे तर त्यावरूनही नाही. भरड धान्यांची सगळीच उगमस्थाने भारतातील नसून, अनेक उगमस्थाने ही आफ्रिकेमधील आहेत. जेथे आदिमानव मांसाहाराशिवाय अग्नीवर शिजवलेले गवतवर्गीय भरड धान्य खाऊ लागला.

भरड धान्याचे पोषणमूल्य मिळाल्यामुळे मानवी मेंदूचा विकास होमोइरेक्टस ते होमोसेपियन असा झाला. होमोसेपियन आफ्रिकामधून युरोप आणि आशिया खंडात स्थलांतरित झाले. भरड धान्यांची उगमस्थाने पाहिल्यावर आपल्याला यांचा प्रत्यय येईल. नद्यांच्या खोर्‍यात त्यांनी पशुपालन आणि गवत भरड धान्यांची शेती करण्यास सुरुवात झाली. यातूनच पुढे ऋषी आणि कृषी संस्कृतीचा जन्म झाला. भरड धान्यांमुळे आदिमानवाच्या उत्क्रांतीला सुरुवात झाली. म्हणून भरड धान्यास आदिम धान्यदेखील म्हटले जाते. बर्‍याच भरड धान्यांची उगमस्थाने भारतातील नाहीत.

उदाहरणात, ज्वारी उत्तर पूर्व आफ्रिका, बाजरी दक्षिण आफ्रिका, नाचणी पूर्व आफ्रिका आणि भारत, कांगराळ किंवा राळे पूर्व आशिया, छोटी बाजरी दक्षिण पूर्व आशिया, वरी (प्रोसो मिलेेट) इजिप्त आणि अरब, फिंगर मिलेट म्हणजे नाचणी दक्षिण आफ्रिका आणि भारत. ज्वारी, बाजरी या दोन मुख्य भरड धान्यांचा विचार केला, तर त्यांचे प्रमाण देशात कमी झाले आहे. कारण, सिंचनाच्या सुविधा उपलब्ध झाल्याने गहू आणि तांदूळ उत्पादनात प्रचंड वाढ झाली आहे. विक्रीसाठी आणि उत्पादनासाठी गावरान बाजरीचे पीक घेणे जवळपास नाहीसे झाले आहे. कारण, या पिकाला हवी तशी बाजारपेठ आणि हमीभाव नाही. रब्बीसाठी तयार केलेल्या संकरीत वाणास चव आणि गुणधर्म नाही.

ज्वारी हे पीक काही ठिकाणी फक्त वैरणीसाठी घेतले जात आहे. या जास्त प्रमाणात वापरात येणार्‍या दोन्ही भरड धान्यांची जागा ऊस, कापूस आणि सोयाबीन यांसारख्या नगदी पिकांनी घेतली आहे, तर मग अन्य भरड धान्यांचे काय भवितव्य असेल, याचा विचार करायला हवा. भरड धान्य म्हणजे कमी पाण्यावर वाढणारे आणि भरपूर पोषणमूल्य आहे असे धान्य. जास्त पाणी आणि कीटकनाशके यांच्या शिवाय भरड धान्य वाढतात, तर मग नाचणी, बाजरी, वरई आणि ज्वारीच्या 50 पेक्षा अधिक जातींमध्ये कोणते गुणधर्म प्रजनन आणि संकर करून आणले आहेत.

भारतामधील काही ठिकाणच्या अनेक जमिनींत आर्सेनिकसारख्या अपायकारक धातूंचे प्रमाण विशेषतः भात पिकांमध्ये वाढत आहे. त्यामुळे कर्करोग आणि हृदय रोगाचे प्रमाण वाढत आहे. भरड धान्य जमिनीमधून आर्सेनिक शोषून घेत नाही. या द़ृष्टीने ते फूड सिक्युरिटीच्या द़ृष्टीने महत्त्वाचे आहे. परंतु, रासायनिक खते आणि कीटकनाशके यांचा वापर न करता भरड धान्यांचे गुणधर्म जपणे हीच आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे; पण मग विक्रमी उत्पादन घेण्यासाठी तणनाशके, भरमसाट रासायनिक खते आणि कीटकनाशके वापरून जर आम्ही भरड धान्य पिकवणार असू, तर त्यास श्री धान्य का म्हणावे? सर्व मानवजातीच्या वंशज असणार्‍या आदिमानवाच्या मेंदूची उत्क्रांती करणार्‍या धान्यास वैश्विक स्वरूप देऊन आदिम धान्य का म्हणू नये? सध्या केलेल्या व्याख्येनुसार श्री धान्य म्हणजे ज्या धान्यात चव, पोषणमूल्य आणि औषधी गुणधर्म आहेत, असे धान्य; पण याबरोबरच ज्या मातीतून ते तयार होतात तीसुद्धा आरोग्यदायी असायला हवी.

खरे तर शेतीला कोणतेही रासायनिक खते आणि कीटकनाशके यांचा वापर न करता अन्नधान्याचे गुणधर्म जपत शेती करणे ही अन्नसुरक्षा, पोषणमूल्य यांच्याबरोबरच जपता आली पाहिजे आणि भविष्यात सेंद्रिय भरड धान्य शेतकरी खरच पिकवेल काय, हा मोठा प्रश्न आहे. कारण, वाढत्या लोकसंख्येला आणि ग्लोबल हब म्हणून खाद्यान्नपुरवठा करायचा आहे. रासायनिक खते आणि कीटकनाशके यांचा मारा करून भरड धान्यांचा ‘ग्लोबल हब’ देशाला बनवण्यापेक्षा भारताने स्वतःचा पहिल्यांदा विचार करायला हवा.

एवढी भरड धान्ये देशात उपलब्ध असताना देखील दुष्काळामध्ये अमेरिकेतून ती धान्ये आयात केली जातात. या आयात केलेल्या धान्यांमध्ये लाल जवारी मिलो हे भरड धान्य आहे. याला उबठ वास येतो. हे भरड धान्य लोकांना सरकारी धान्य दुकानातून वितरित करण्यात आले. अन्नसुरक्षा, हमीभाव, पोषणमूल्य आणि देशातील शेतकर्‍यांची खर्‍या अर्थाने भरभराट आणि त्यातून आर्थिक आवक झाल्यास तरच ही देवधान्ये खर्‍या अर्थाने दैवी ठरणार आहेत.

– प्रा. किशोर सस्ते, वनस्पती आणि जैवविविधता अभ्यासक

Back to top button