लवंगी मिरची : डेटा विकणे आहे | पुढारी

लवंगी मिरची : डेटा विकणे आहे

अरे मित्रा, काल एक गंमत झाली. किरकोळ काहीतरी कामासाठी प्लंबर घरी आला होता. मी त्याचा नंबर माझ्या मोबाईलमध्ये सेव्ह केला. दुसर्‍या दिवशी माझे फेसबुक मी पाहत होतो, त्यावेळी ‘पीपल यू मे नो’मध्ये त्याचा चेहरा दिसला. मला एक समजत नाही, कुणाचाही मोबाईल नंबर सेव्ह झाल्याबरोबर सोशल मीडियाला कसे कळते की, यांचा काहीतरी संबंध आलेला आहे आणि त्यावरून लगेच नोटिफिकेशन यायला कशी सुरुवात होते?

अगदीच सांगायचं म्हणजे साधारण एखाद्या मॉलमध्ये तू गेलास आणि एखाद्या रॅकजवळ काही सेकंद रेंगाळलास तर दुसर्‍याच दिवशी तुझ्यावर त्या प्रकारच्या वस्तूंच्या जाहिरातींचा मारा सुरू होतो. समजा तेलाच्या बाटल्या तू पाहत असशील, तर तुझ्यावर तेलांच्या जाहिरातींचा मारा करायला सुरुवात करतात. समजा, तू कुत्र्याचे फूड घेण्यासाठी गेलास त्या बॅगला हात लावलास तरी दोन मिनिट नव्हे तीस सेकंद रेंगाळलास तर दुसर्‍या दिवसापासून तुला कुत्र्याच्या अंघोळी, कुत्र्याचे दवाखाने या सगळ्यांचा जाहिरातींचा मारा व्हायला सुरुवात होते. ही सोशल मीडियाची कमाल आहे.

सुरुवातीला जेव्हा सोशल मीडिया आला तेव्हा मला वाटायचे यांची प्राप्ती काय असेल? तर अशा माध्यमातून लाखो रुपये ते कमवतात आणि असंख्य लोकांना त्यातून रोजगार मिळतो. कारण आता जाहिरातीचे माध्यमच बदलले आहे. तुम्ही इन्स्टाग्राम पाहा, सर्व तरुण पिढी त्यावर आहे. वयस्कर लोक फेसबुकवर असतात आणि फार मोठे-मोठे लोक हे ट्विटरवर असतात. इन्स्टाग्रामच्या माध्यमातून एक रील जर तुम्ही टाकली, तर ती शेकडो लोकांपर्यंत एकाच वेळी पोहोचण्याचा चमत्कार हे माध्यम करत असते. सहज म्हणून तू एखादी प्रॉपर्टी बघायला गेलास आणि तिथे तुझा मोबाईल नंबर दिलास, तर बरोबर दुसर्‍या दिवशी समाज माध्यमातून सोशल मीडियातून तमाम जनतेला कळते की, याच्याकडे पैसे आहेत आणि हा काहीतरी प्रॉपर्टी बघत आहे. धडाधड तुला कॉल यायला सुरुवात होते. ही सगळी डेटा एकमेकाला पोहोचण्याची कमाल आहे. आपला डेटा विकला जातो.

संबंधित बातम्या

म्हणजे आपलं काहीच आता सिक्रेट राहिलेले नाही. फक्त आता मनात विचार आल्याबरोबर ती जाहिरात पुढे येणे एवढेच फक्त बाकी आहे, होईल होईल, तेही होईल. तुझ्या माझ्या मनात आलेले विचार पण विकले जातील. तो दिवस दूर नाही हे नक्की. आता प्रत्येक गोष्टीत बाजारीकरण आले आहे, मग त्यातून बक्कळ पैसा कमवला जातो.

काहीवेळा डेटा चोरी करण्याचेही प्रकार वाढले आहेत. त्यात देशातील सिक्रेट डेटाचाही समावेश होतो. पैसा मिळवण्याचा शॉर्टकट म्हणून काही लोक विकले जातात आणि देशाशी गद्दारी करतात.

– झटका

Back to top button