साडी हा स्मार्ट कॅज्युअल ड्रेसकोड : मानसिकता बदलणार कधी ? | पुढारी

साडी हा स्मार्ट कॅज्युअल ड्रेसकोड : मानसिकता बदलणार कधी ?

- प्रा. शुभांगी कुलकर्णी, समाजशास्त्र अभ्यासक

साडी हा स्मार्ट कॅज्युअल ड्रेसकोड नसल्याचे सांगून एखाद्या महिलेला रेस्टॉरंटमध्ये जाण्यापासून रोखले जात असेल, तर आपण गंभीर आत्मचिंतन केले पाहिजे. परदेशी पेहरावाचा त्याग करणार्‍या गांधीजींच्या देशात असे प्रकार निंदनीय आहेत.

दिल्लीतील एका रेस्टॉरंटमध्ये एका महिलेला तिने साडी परिधान केलेली असल्यामुळे प्रवेश नाकारण्यात आला. साडीचा समावेश स्मार्ट कॅज्युअल ड्रेसकोडमध्ये होत नाही, असे रेस्टॉरंटच्या मॅनेजरने संबंधित महिलेला सांगितले. हा व्हिडीओ संंबंधित महिलेने व्हायरल केला. रेस्टॉरंटने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, संबंधित महिलेने कर्मचार्‍यांशी भांडण केले. कारण, महिलेस आत जाण्यासाठी प्रतीक्षा करण्याची विनंती केली होती. या महिलेने आधी आरक्षण केले नव्हते. रेस्टॉरंटने माफीही मागितली असून, संबंधित महिला तेथून निघून जावी आणि परिस्थिती आटोक्यात यावी, यासाठी कदाचित मॅनेजरने तिला तसे सांगितले असावे. यावर महिलेचे उत्तर होते की, आपल्या देशात साडी हे स्मार्ट आऊटफिट मानले जात नसेल, तर ते गंभीर आहे. महिलेच्या मते, ही केवळ तिची एकटीची लढाई नसून, साडी आणि त्याविषयीच्या मानसिकतेविरुद्धची लढाई आहे. या घटनेबद्दल लोकांमध्ये तीव्र नाराजी आहे, हे सोशल मीडियावर दिसून आले. राष्ट्रीय महिला आयोगाने या प्रकाराची दखल घेतली असून, दिल्ली पोलिस आयुक्तांना एक पत्र लिहिले आणि रेस्टॉरंटच्या अधिकार्‍यांनाही नोटीस धाडली.

हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये अनेकदा पुरुषांनाही या साम्राज्यवादाच्या काळातील मानसिकतेचे बळी ठरावे लागते. इंग्रज निघून गेले; परंतु मानसिक गुलामगिरीची चिन्हे आजही देशात दिसून येतात. ही केवळ एक घटना नसून मानसिकतेशी संबंधित मुद्दा आहे. आपण एकीकडे इंग्रजांच्या गुलामगिरीच्या काळातील प्रथांपासून मुक्त होण्याचा प्रयत्न करीत आहोत; परंतु आपल्याकडील एक वर्ग आजही याच विचारांना चिकटून बसलेला दिसतो. काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध युवा लेखक साहित्य अकादमी युवा पुरस्कार सन्मानित नीलोत्पल मृणाल यांना दिल्लीच्या राजीव गांधी चौकातील (ज्याचे नाव पूर्वी कनॉट प्लेस होते) एका रेस्टॉरंटमध्ये जाताना खांद्यावर गमछा असल्यामुळे रोखले गेले होते. मृणाल हे झारखंडमधील आहेत. या घटनेवर सोशल मीडियात बरीच टीका झाली होती. स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरही मानसिकतेत आजही काही साम्राज्यवादाचे अंश आहेत. त्यापासून आपण अद्याप मुक्त होऊ शकलेलो नाही.

संबंधित बातम्या

आपल्याकडील अनेक विद्यापीठांनी दीक्षान्त समारंभाच्या वेळी गाऊन परिधान करण्याऐवजी कुर्ता-पायजमा आणि साडी आदी वापरण्यास सुरुवात केली. आयआयटी, जेएनयूतही दीक्षान्त समारंभासाठी कुर्ता आणि विद्यार्थिनींसाठी साडी हाच पेहराव निश्चित केला आहे. संपूर्ण दक्षिण आशियातील महिलांचा साडी हा आवडता पेहराव आहे. बांगलादेश असो, श्रीलंका वा पाकिस्तान असो, सर्व देशांमध्ये साडी मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. सुमारे दहा वर्षांपूर्वी भारतीय प्रतिनिधी मंडळाबरोबर पाकिस्तानला जाण्याचा योग आला. तेथील बहुसंख्य महिला सलवार सूट वापरतात; परंतु तेथील महिला साडीही वापरत असल्याचे दिसले. इस्लामाबादच्या ज्या पंचतारांकित सेरेना हॉटेलात हे प्रतिनिधी मंडळ वास्तव्यास होते, तेथे कार्यरत महिलांना साडी हाच ड्रेसकोड होता.

आपण गांधीजींच्या परंपरेतील देशात वास्तव्यास आहोत आणि नुकतीच आपण गांधीजींची 150 वी जयंती साजरी केली. 1888 मध्ये ते विद्यार्थी असताना इंग्लंडमध्ये सूट वापरत. परंतु, भारतात आल्यावर त्यांनी धोतर हेच कायमचे वस्त्र बनविले. आपला पंचाही त्यांनी एका निर्धन महिलेला दिला आणि त्यानंतर पंचा वापरणे बंद केले. 1918 मध्ये जेव्हा अहमदाबाद येथील मजुरांच्या लढ्यावेळी त्यांच्या लक्षात आले की, पगडीसाठी जेवढे कापड लागते, तेवढ्या कापडात चार लोकांचे अंग झाकता येऊ शकते. त्यानंतर त्यांनी पगडी वापरणेही सोडून दिले. राजकारणातील नवीन पिढीची पसंती आता पँट-शर्ट किंवा सूट-बूट हीच बनली आहे. बहुतांश महिला नेत्या मात्र आजही साडीलाच पसंती देतात. आपण देश, काळ आणि परिस्थितीनुसार पेहरावाबाबत निर्णय घेतले, तर ते अधिक चांगले ठरेल. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात दिल्लीत घडलेल्या घटनेने चिंतेत भर टाकली आहे. स्वातंत्र्यानंतर एवढ्या वर्षांनीही आपण गुलामगिरीच्या मानसिकतेतून बाहेर आलो नाही, असे या घटनांमधून दिसून येते.

Back to top button