लवंगी मिरची : मगच माझा पिच्छा सोडला

अरे, किती धावत येत आहेस? काय भूत मागे लागले की काय? दोन मिनिट बस, पाणी पी आणि शांत हो.
अरे, भूत मागे लागलेले परवडले असते; पण इथे भटका कुत्रा मागे लागला होता. सकाळी सहज फिरायला म्हणून बाहेर पडलो. आजूबाजूला दहा-बारा भटकी कुत्री रेंगाळत काहीतरी खात होती. त्यापैकी एका कुत्र्याला काय मूड आला माहीत नाही, धावत-धावत माझ्या मागे आला. मी पुढे पळायला लागलो. आयुष्यात कधी पळालो नाही इतका म्हणजे चक्क अर्धा किलोमीटर पळालो तेव्हा कुठे त्याने माझा पिच्छा सोडला.
आमच्या कॉलनीत रोज सकाळी एक बाई येते. अर्ध पोतं भरून बिस्किटाचे पुडे तिच्याकडे असतात. ती आली की, तिच्याभोवती आसपासचे 25-30 भटकी कुत्री गोळा होतात. ती त्यांना बिस्किटे खाऊ घालते. काय तर म्हणे, भूतदया. भटक्या कुत्र्यांना रोज सकाळी खाऊ घालण्यात ती कधीच चूक करत नाही. पाऊस असो, ऊन असो, ती त्यावेळेला येणार म्हणजे येणारच. अर्धा पोते बिस्किटे ती रस्त्यावर टाकते. कधी खायला न मिळणारे ते त्या बिस्किटांवर तुटून पडतात. आता मला प्रश्न पडतो की, ही बाई जी भटक्या कुत्र्यांना खाऊ घालते ही घरच्या लोकांना खाऊ घालते की नाही काय माहीत?
या भटक्या कुत्र्यांचा उच्छाद मोठ्या-मोठ्या शहरांमध्ये इतका वाढला आहे की, मुंबईत तर एका तीन वर्षांच्या मुलीला भटक्या कुत्र्यांच्या एका टोळीने अक्षरशः लचके घेऊन मारून टाकले. अत्यंत भयानक द़ृश्य होते ते. हे असे भूतदया जागृत असणारे लोक भटक्या कुत्र्यांना जगवतात आणि मग कुत्र्यांच्या संख्येमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ होत जाते. बरं ही भटकी कुत्री अत्यंत हुशार असतात. नसबंदी करण्यासाठी महानगरपालिकेची गाडी त्या एरियात आली की, ही गाडी कशासाठी आली आहे हे ते आधीच ओळखतात आणि तिथून पसार होतात.
होय ते खरे आहे; पण भटक्या कुत्र्यांची संख्या आणि महानगरपालिका करत असलेल्या शस्त्रक्रियांची संख्या यांचे फार व्यस्त प्रमाण आहे.
पण तू काही म्हण या कुत्र्यांचे लाड करणार्या लोकांचे भलतेच काहीतरी चालले आहे हे नक्की. मी म्हणतो करा ना लाड. जितके करायचे तितके करा; पण तुमच्या घरी नेऊन ठेवा ना ती कुत्री.
भटक्या कुत्र्यांना किंवा एकंदरीतच सर्व प्राणिमात्रांना समाजामध्ये जगण्याचा अधिकार आहे, असा निर्वाळा न्यायालयांनी पण दिला आहे. त्यांचा तो अधिकार मान्य केला तरी त्यांची संख्या आटोक्यात ठेवण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी तातडीने काहीतरी केले पाहिजे.
शहरांमध्ये हीच परिस्थिती आहे. गावाशेजारच्या प्रत्येक हॉटेलच्या बाहेर दहा-बारा भटक्या कुत्र्यांच्या टोळ्या बसूनच असतात. तब्येतीने ते सगळे चांगले मजबूत असतात कारण टाकून दिलेले अन्न यथेच्छ खाऊन त्यांच्या तब्येती सुधारलेल्या असतात. साहजिकच पायी किंवा सायकलवर किंवा मोटारसायकलवर जाणारा माणूस दिसला की, ते त्याच्या मागे धावतात.
त्या कुत्र्यांच्या मनामध्ये आपला एक एरिया ठरवलेला असतो, त्यांच्या सीमा असतात. जसे आपले शेताचे धुरे असतात ना किंवा प्लॉटची जागा खाणाखुणा करून ठरवलेली असते तशी कुत्र्याने स्वतःच्या मनात आपल्या सीमेची पक्की खूणगाठ बांधलेली असते. त्यांच्या सीमेत कोणी आला की, आपल्या सीमेचे रक्षण करण्यासाठी ते त्याच्यावर आक्रमण करतात. ते काहीही असो यार, ही समस्या सुटली पाहिजे हे नक्की.
– झटका