लवंगी मिरची : किमान भान तरी पाळा! | पुढारी

लवंगी मिरची : किमान भान तरी पाळा!

अख्ख्या जगाला वेठीस धारणार्‍या कोरोनेश्वर महाराजांचे आगमन होत आहे हो, अशी वर्दी येताच दरबारीगण सावध झाले आणि उठून उभे राहिले. मुख्य प्रवेशद्वारातून महाराजांचे आगमन झाले. दोन्ही बाजूला उभ्या असणार्‍या सेविकांनी महाराजांचे स्वागत ब्लिचिंग पावडरचा स्प्रे मारून केले. महाराज रुबाबदार चालीने पावले टाकू लागले तेव्हा दरबार डोळे भरून त्यांचे रूपडे न्याहाळीत होता. महाराज आसनस्थ होताच दरबारी आपापल्या जागेवर स्थानापन्न झाले. महाराजांच्या सिंहासनाशेजारी ठेवलेल्या छोट्या खुर्चीवर राणीसाहेब विराजमान झाल्या होत्या. दरबार सुरू होण्यास काही क्षण उरले असताना राणीसाहेब महाराजांच्या जवळ येऊन कानात काहीतरी पुटपुटल्या आणि अचानक, थोबाडीत ठेवून दिल्याचा खाड्कन आवाज आला. भर दरबारात महाराजांनी राणीसाहेबांच्या कानाखाली ठेवून दिली होती. सरदार, दरकदार, कर्मचारी आणि सामान्य जनता अवाक् झाली. महाराज कडाडले, राणीसाहेब किमान पाच फुटांचे अंतर ठेवा, अशी आज्ञा आम्ही जनतेला केली असताना किमान ती पाळण्याचे भानतरी ठेवायला हवे होते.

दरबार स्तब्ध झाला. राणीसाहेब खाली मान घालून उभ्या होत्या; पण त्यांनी तत्काळ पर्समधून सॅनिटायझर काढले आणि स्वतःच्या गालावर त्याचा स्प्रे मारला. व्यवस्थित स्प्रे झाल्यानंतर त्यांनी महाराजांना हात समोर करण्याची विनंती केली आणि सुहास्यवदनाने महाराजांच्या हातावर दूरवरून सॅनिटायझरचा स्प्रे मारला. मोगर्‍याच्या वासाच्या सॅनिटायझरने महाराजांच्या चेहर्‍यावर प्रसन्नता दिसून आली. चित्तवृत्ती फुलून आल्या. याचा परिणाम म्हणजे जनानखान्याचे प्रभारी यांच्याकडे महाराजांनी एक कटाक्ष टाकला. दरबाराने ओळखले की, आता महाराज चांगल्या मूडमध्ये आहेत.

कारवाई सुरू झाली प्रधानजी, राज्याचे हालहवाल कसे आहेत?
उत्तम आहेत महाराज. महिलावर्ग बर्‍यापैकी त्रासात आहे महाराज. त्यांना कपाळाला झेंडू बाम, नाकाला विक्स, पाठीला आयोडेक्स, कमरेला मूव्ह मलम आणि तळपायाला भेगानाशक लेप स्वतःच लावण्याची वेळ आली आहे, महाराज. कोरोनाचा नवीन व्हेरिएंट आला असल्यामुळे आपण पुन्हा एकदा त्या लॉकडाऊनच्या काळातील सर्व बाबी पाळण्याचे आदेश दिले आहेत.

संबंधित बातम्या

जनता त्रासली तरी चालेल; पण त्यांचे आरोग्य चांगले ठेवण्याची जबाबदारी आमचीच आहे. त्यामुळे नंतरच्या काळात संपूर्ण राज्यातील लोकांना घरामध्ये कोंडून राहावे लागू नये म्हणून आम्ही आधीच काळजी घेण्याचे आदेश दिले आहेत. राजवैद्यांना पाचारण करा.
जी महाराज, मी दरबारात हजर आहे. आज्ञा करावी महाराज.

राजवैद्य, तुमचे मेडिकलचे शिक्षण काय चुलीत घालायचे आहे काय? या नवीन येणार्‍या व्हेरियंटवर तत्काळ संशोधन करा. काम पडल्यास त्याची स्वतंत्र लस तयार करा आणि लसीकरण करणे आवश्यक असेल, तर युद्ध पातळीवर त्याची अंमलबजावणी करा. कोरोनाच्या या नवीन व्हायरसला आमच्या प्रजेतील एकही व्यक्ती बळी पडता कामा नये, एवढे लक्षात असू द्या.

होय महाराज. आपण आणि राणीसाहेब यांच्यासाठी विविध प्रकारचे काढे तयार करून ठेवले आहेत महाराज. तसेच घाऊक प्रमाणावर प्रजेसाठी विविध वनस्पतींपासून तयार केलेले काढे आणि चाटण निर्मितीची प्रक्रिया सुरू आहे महाराज.

– झटका

Back to top button