आरोग्य यंत्रणेचा बोजवारा | पुढारी

आरोग्य यंत्रणेचा बोजवारा

अधिकारी येतात अन् जातात. बदलीवर किंवा सेवानिवृत्तीनंतर. काही मात्र असे असतात, ज्यांच्या जाण्याने संपूर्ण यंत्रणेवर परिणाम होतो. आपल्या कामाची छाप पाडून ते पुढची वाट धरतात; पण लोक त्यांचे नाव घेतात आणि प्रशासनाला हेच नको असते.

रुग्णांच्या पिण्याच्या पाण्यात जेव्हा बेडकाची पिले आणि गाळ आढळला, तेव्हा हिंगोली जिल्ह्यातील जनतेला आरोग्य विभागाचे माजी आयुक्त तुकाराम मुंडे यांची आठवण झाल्याशिवाय राहवले नसेल. हिंगोली शहरातील सामान्य रुग्णालयात पिण्याच्या पाण्याचे फिल्टर कित्येक दिवसांपासून बंद आहे. रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक याच फिल्टरचे पाणी पीत होते. एक जागरूक नागरिक कपिल धबडगे आपल्या एका नातेवाईक रुग्णाला भेटायला या रुग्णालयात गेले आणि त्यांना हा प्रकार दिसला. या पाण्यात गाळ होता अन् त्याला दुर्गंधीही येत होती. कपिल यांनी हे पाहिले आणि संबंधितांना जाब विचारला. मग धावपळ झाली, फिल्टर स्वच्छ करून सगळे पुरावे नष्ट करण्यात आले; पण तोपर्यंत कपिल यांनी आपल्या मोबाईलचा सदुपयोग केला होता. गलिच्छ फिल्टरचे फोटो त्यांनी घेऊन ठेवले होते; अन्यथा असे काही घडलेच नाही, अशी सारवासारव रुग्णालयाने केली असती. अर्थात, हे फक्त एक उदाहरण. राज्यातील कित्येक सरकारी रुग्णालयांत अशीच अनास्था दिसून येते.

आवाक्याबाहेर गेलेली खासगी आरोग्यसेवा अनुभवलेले गरीब रुग्ण असहायतेतून सरकारी रुग्णालयाची वाट धरतात. सुविधा तर दूरच; पण त्यांना चांगली वागणूकही मिळत नाही. डॉक्टर-कर्मचार्‍यांचे प्रश्न आहेतच; पण भौतिक सुविधांचीही वानवा आहे. अशा परिस्थितीत ऑक्टोबर 2022 च्या सुरुवातीला धडाकेबाज ‘आयएएस’ अधिकारी तुकाराम मुंडे यांची आरोग्य सेवा आयुक्त म्हणून नेमणूक करण्यात आली होती. रुजू होताच त्यांनी खासगी व्यवसाय करणार्‍या सरकारी डॉक्टरांना फैलावर घेतले.

रुग्णालयात गैरहजर राहणारे डॉक्टर आणि कर्मचार्‍यांवरही कारवाया सुरू केल्या. त्यामुळे अल्पावधीतच ते जनतेचे लाडके, तर कामचुकारांचे कर्दनकाळ बनले. लगेच काही डॉक्टरांचे राजकीय हितसंबंध ताजे झाले आणि व्यवस्था सुधारण्याचे काम करीत असलेल्या मुंडे यांनाच हटविण्याच्या हालचाली मंत्रालयात सुरू झाल्या. या हालचालींना राजकीय वरदहस्तही लाभला. खुद्द आरोग्य मंत्र्यांनीच मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली. त्यामुळे राज्याच्या आरोग्यसेवेला लागलेली कीड नाहीशी होणार, असे वाटत असताना दोनच महिन्यांत मुंडे यांची अज्ञात स्थळी बदली करण्यात आली. आजतागायत ते कोणत्या पदावर आहेत, हे राज्याला कळलेले नाही. वास्तविक कोणत्याही रुग्णाला बरे करायचे असेल, तर कडू औषधे, इंजेक्शन आणि प्रसंगी शस्त्रक्रियेसारखे उपायही करावे लागतात.

मुंडे यांनी फक्त औषधोपचार सुरू केले होते. कठोर उपायांना सुरुवातही केलेली नव्हती, तरीही ते या रोगट यंत्रणेला असह्य झाले. त्यांच्या आधी आणि नंतरही आलेल्या अधिकार्‍यांनी यंत्रणा आहे तशीच राबविण्यात धन्यता मानली. त्यामुळे यंत्रणेला लागलेला रोग कायम आहे. रुग्णांच्या पिण्याच्या पाण्यात बेडकांच्या उड्या सुरूच आहेत. मुंडे यांनी फक्त नियमानुसार काम करण्याचा आग्रह धरला होता. डॉक्टरांनी रुग्णालयापासून 2 किलोमीटरच्या परिघातच राहावे, खासगी प्रॅक्टिस केल्यास त्यासाठी मिळणारा भत्ता घेऊ नये, वेळेवर रुग्णालयात जावे, कर्मचार्‍यांनीही वेळा पाळाव्यात या नियमांची आठवण करून दिली होती.

डॉक्टरांशी दर सोमवारी व्हिडीओ कॉलवर संवाद सुरू केला होता. रुग्णालये स्वच्छ ठेवा, रुग्णांशी प्रेमाने वागा, शिस्त पाळा हेच ते सांगत होते. तरीही त्यांची बदली करण्यात आली. त्यामुळे सरकारी रुग्णालयांमधील अनागोंदी आता नित्याचीच झाली आहे. पुन्हा एकदा राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत चालले आहेत. एच3 एन2 एन्फ्लुएन्झा, स्वाईन फ्ल्यूनेही डोके वर काढले आहे. अशा वेळी आरोग्य यंत्रणा सज्ज नसेल, शिस्तीत काम करत नसेल, तर रुग्णांची अवस्था काय होईल? मुंडे यांनी ज्या जबाबदारीने कामे करण्याचा प्रयत्न सुरू केला होता, ती जबाबदारी त्यांच्या जागेवर आधी आणि नंतर आलेल्या अधिकार्‍यांची नाही काय, अशा किती अधिकार्‍यांची दोनच महिन्यांत बदली करण्यात आली. एका कर्तबगार, शिस्तप्रिय अधिकार्‍याला पदावरून पायउतार होण्यास भाग पाडण्याइतका कोणता गुन्हा त्यांनी केला होता. हे प्रश्न प्रशासनाला विचारण्याची वेळ आली आहे. मुंडे यांची बदली होताच आरोग्य खात्याची यंत्रणा सुखावली; पण ज्यांच्यासाठी ही यंत्रणा निर्माण करण्यात आली, त्यांचे काय?

– धनंजय लांबे

Back to top button