

पाकिस्तानात सध्या माजी पंतप्रधान इम्रानखान यांच्या अटकेवरून सुरू झालेला घनघोर संघर्ष विकोपाला जाताना दिसत आहे. विशेष म्हणजे एखाद्या व्यक्तीवर कारवाई करण्यावरून पाकिस्तानी लष्करात फूट पडल्याचे प्रथमच अनुभवास येत आहे. इम्रानसमर्थकांना आणखी एक भीती वाटते की, अटक झाल्यानंतर त्यांची हत्या होऊ शकते किंवा एखादे बनावट प्रकरण तयार करून त्यांना सक्रिय राजकारणातून कायमस्वरूपी बाहेर काढले जाऊ शकते. अशी शंका येण्यामागे प्रमुख कारण म्हणजे सरकार आणि सैनिकांनी इम्रानखान देशातील लोकशाहीसाठी धोका असल्याचे गृहीत धरले आहे.
काही वर्षांपूर्वी इम्रानखान सत्तेत नव्हते तेव्हा त्यांचा एक व्हिडीओ खूपच व्हायरल झाला होता. त्यात ते म्हणताना दिसतात की, आपल्या (पाकिस्तान) लष्कराचे जनरल एवढे भित्रे आहेत की, एखाद्या व्यक्तीने पाकिस्तानच्या कोणत्याही शहरात 25 ते 30 हजार लोक जमविले, तर जनरल साहेबांची सलवार ओली होईल. कालांतराने हे वक्तव्य इम्रानयांनी खरे करून दाखविले. गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानचे पोलिस त्यांना अटक करण्यासाठी आकाश पाताळ एक करत आहेत. परंतु, इम्रानत्यांच्या हाती लागत नसल्याचे दिसून येत आहे. अलीकडेच शेकडो संख्येने पोलिसांची कुमक त्यांच्या दारात पोहोचली; पण त्यांच्या समर्थकांनी पोलिसांना पुढे जाण्यास अटकाव केला. मानवनिर्मित साखळी केली आणि परिणामी पोलिसांना माघारी जाण्यास भाग पाडले. यावेळी दोन्ही गटांत धुमश्चक्री झाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. त्याचवेळी पेालिसांना दगडफेक, पेट्रोल बॉम्बचा सामना करावा लागला. अखेर 'रेंजर्स'ना पाचारण करावे लागले. रेंजर्स म्हणजे पाकिस्तानचे निमलष्करी दल. मात्र, त्यांच्यावर पाकिस्तानी सैनिकी अधिकार्यांचे नियंत्रण आहे. याचा अर्थ रेंजर्स आले म्हणजे सैनिक आले; पण त्यांंच्याही हाती काही लागले नाही. या कारवाईच्या विरोधात इम्रानयांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले; पण त्यांच्या पदरी निराशा पडली. इस्लामाबादच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयाने अजामीन अटक वॉरंट रद्द करण्याची इम्रानयांची याचिका फेटाळून लावली. तरीही इम्रानने एक प्रकारे आपला दबदबा दाखवून दिला. एकंदरीतच पाकिस्तानात सध्या जी स्थिती दिसत आहे, ती पाहता यात पाकिस्तानचे सैन्य आणि सरकार यांचा विजय होतो की, इम्रान जिंकतात. याविषयी सर्वांनाच उत्कंठा आहे; पण एक गोष्ट निश्चित ती म्हणजे या साठेमारीत लोकशाही काही वाचणार नाही.
प्रश्न असा की, इम्रानयांच्या अटकेत अडथळे कोठे येत आहेत? इम्रानहे मूळचे पंजाबचे आहेत. त्यांना तेथे प्रचंड पाठिंबा आहे. पाकिस्तानचे सैन्य आणि पोलिसांवर पंजाबी नागरिकांचे वर्चस्व आहे. म्हणून एखाद्या अस्वस्थ प्रांतात कायदा आणि सुव्यवस्था लागू करताना म्हणजेच बलूच, सिंधी किंवा पश्तून यांच्याविरुद्ध ज्या रितीने कृतियोजना आखली जाते, ती इथे दिसत नसल्याचे दिसून येते. पंजाबीविरुद्ध कारवाई केल्यास तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे. ती सांभाळणे पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांच्या आवाक्याबाहेर राहू शकते. एवढेच नाही तर पंजाबमध्ये इम्रानखान यांचे समर्थक सामान्यांपासून उच्चभ्रू नागरिकांपर्यंत आहेत. मध्यमवर्गीयांचे मोठे पाठबळ आहे. व्यापारी वर्गदेखील इम्रान यांच्या भूमिकेला पाठिंबा देत आहे. या कारणांमुळे पंजाब पोलिसांचे हात बांधले गेले आहेत. त्याचवेळी गेल्या काही वर्षांत इम्रान यांनी न्यायालयावर एवढा प्रभाव निर्माण केला आहे की, जेव्हा त्यांच्याविरुद्ध कारवाईची वेळ येते तेव्हा न्यायालयाच्या हस्तक्षेपातून त्यांना दिलासा मिळतो. म्हणूनच अशा प्रकारचा पेच निर्माण होण्याची पहिलीच वेळ असावी. एखाद्या व्यक्तीवर कारवाई करण्यावरून पाकिस्तानी लष्करात फूट पडल्याचेे प्रथमच अनुभवास येत आहे. देशातील बडे अधिकारी हे इम्रानखान यांना मोठा धोका म्हणून पाहतात. परंतु, त्यांच्या कुटुंबीयाला त्याची काही भीती वाटत नाही.
एवढेच नाही तर निम्न आणि मध्यम वर्गातील अधिकारीदेखील इम्रानसमर्थक आहेत. निवृत्त सैनिकी अधिकारीही इम्रानखान यांनाच पसंती देतात. एकूण पाकिस्तानच्या राजकारणावर आणि प्रशासनावर इम्रानखान हे वरचढ ठरले आहेत, असे तरी सध्या पाहवयास मिळते. त्यांना अटक केली, तर लोकांची प्रतिक्रिया काय असेल, याची कल्पनाच न केलेली बरी. प्रतिक्रिया तीव्र राहिल्या, तर पाकिस्तानात यादवी युद्धाची शक्यता नाकारता येत नाही. इम्रानसमर्थकांना आणखी एक शंका वाटते की, अटक झाल्यानंतर त्यांची हत्या होऊ शकते किंवा एखादे बनावट प्रकरण तयार करून त्यांना सक्रिय राजकारणातून कायमस्वरुपी बाहेर काढले जाऊ शकते. अशी शंका येण्यामागे प्रमुख कारण म्हणजे सरकार आणि सैनिकांनी पाकिस्तान तेहरिक ए इन्साफ पक्षाचा अध्यक्ष हा देशातील लोकशाहीसाठी मोठा धोका असल्याचे गृहीत धरले आहे. म्हणूनच इम्रानयांनी सत्ताधार्यांविरुद्ध संघर्ष सुरू केला आहे. त्यांचे समर्थकही धमक्या देत आहेत. त्यांना हात लावला, तर पकिस्तानात यादवी युद्ध माजेल, याची शक्यता आहे. कारण गेल्या तीन दिवसांचा घटनाक्रम पाहिला, तर त्याची प्रचिती येत आहे. साहजिकच इम्रानयांना अटक झाली किंवा ते विजयी होत असतील तरीही दोन्ही बाजूंनी लोकशाहीला धोका मात्र कायम राहणार आहे. पाकिस्तानातील स्थिती पाहता आपण सजग राहिले पाहिजे का? चिंता व्यक्त केली पाहिजे का?
सध्या तरी भारताला थेट असा कोणताही धोका नाही. पाकिस्तान जेवढा दुबळा होईल, त्याप्रमाणात भारतातील त्याच्या कुरापती कमी राहतील. पाकिस्तानातील अस्थैर्य भारतासाठी शांतता प्रदान करणारे आहे. परंतु, यातही काही अडचणी आहेत. सध्याची बिकट स्थिती पाहता पाकिस्तानातील दहशतवादी संघटना सक्रिय होऊ शकतात आणि ते भारतात उपद्रव करू शकतात; पण देशात अस्थिरता असल्याचे सांगून पाकिस्तान मात्र या जबाबदारीतून पळ काढेल. देशांतर्गत ताण-तणावामुळे, अंतर्गत वादामुळे 'नॉन स्टेट अॅक्टर्स'वर नियंत्रण ठेवता आले नाही, असे वेळकाढू उत्तर दिले जाईल; पण भारताची डोकेदुखी वाढावी म्हणून पाकिस्तान नेहमीप्रमाणे अपप्रवृत्तींना हवा देईल किंवा पाकिस्तानातील ऐक्य वाढविण्यासाठी नवी दिल्लीसमवेत तणाव वाढविण्याचा देखील प्रयत्न करू शकते; पण या गोष्टी वाटतात तेवढ्या सोप्या नाहीत. कारण पाकिस्तानात आर्थिक अडचणींचा डोंगरदेखील आहे. अशा स्थितीत भारताने उत्तर दिले, तर ते पाकिस्तानला परवडणारे नाही. परंतु, एका द़ृष्टीने पाकिस्तानचे अस्थैर्य हे भारतावर दूरगामी परिणाम करू शकते. तेथील ढासळणारी स्थिती पाहून नागरिकांनी देश सोडण्यास सुरुवात केली, तर मोठ्या संख्येने पाकिस्तानचे नागरिक भारतीय सीमेवर येऊ शकतात. त्यांना अफगाणिस्तान आणि इराणकडे जाणे कठीण आहे. म्हणून भारताच्या जमिनीवर प्रवेश करण्याचा त्यांचा प्रयत्न राहील. यावर आपल्या शासनकर्त्यांना लक्ष ठेवावे लागेल.
– सुशांत सरीन, सामरिक तज्ज्ञ