बाजरी उत्पादनात घट | पुढारी

बाजरी उत्पादनात घट

भारतात ज्वारीच्या खालोखाल येणारे पीक म्हणून बाजरीची ओळख आहे. ज्वारी-बाजरी या धान्यांमध्ये केवळ उच्चाराच्या बाबतीत नव्हे, तर गुणधर्माच्या बाबतीतही साम्य आढळते. भारतासारख्या देशात जिथे ऐंशी कोटींहून अधिक लोकांना मोफत अन्नधान्याचा पुरवठा केला जातो, अशा देशात लोकांची पोषक तत्त्वांची गरज प्रामुख्याने हीच धान्ये भागवत असतात. अशा या बाजरीच्या उत्पादनात यंदा सात टक्क्यांची घट नोंदविण्यात आली आहे. भारताच्या पुढाकाराने आंतरराष्ट्रीय पातळीवर भरड धान्य वर्ष साजरे केले जात असताना बाजरीच्या उत्पादनात घट होणे चिंताजनक म्हणावे लागेल. महाराष्ट्र राज्य एकेकाळी बाजरीच्या उत्पादनात देशात अग्रेसर होते. परंतु, आता ते तिसर्‍या स्थानावर फेकले गेले आहे. बाजरी हे बारीक तृणधान्य भारत, आफ्रिका आणि मध्यपूर्वेतील काही देशांत पिकते. भारतात ते ज्वारीच्या खालोखाल महत्त्वाचे असून, त्याची लागवड प्रामुख्याने महाराष्ट्रासह राजस्थान, पंजाब आणि मध्य प्रदेशात होते. ज्वारीपेक्षा बाजरीमध्ये प्रथिनांचे प्रमाण अधिक असल्यामुळे त्याचे महत्त्व वाढते. नॅशनल बल्क हँडलिंग कॉर्पोरेशनकडून (एनबीएचसी) सातत्याने देशांतर्गत धान्यस्थितीचा आढावा घेतला जातो. त्याआधारे कृषी मंत्रालय आणि ग्राहकसंबंधी व्यवहार मंत्रालयाकडून धान्य पुरवठ्याची फेररचना केली जाते. याच संदर्भाने ‘एनबीएचएसी’ने बाजरी पिकाबाबतचा अहवाल सादर केला आहे. एकेकाळी आहारातील एक महत्त्वाचा घटक असलेल्या बाजरीचे महत्त्व कमी होत गेले आणि हरित क्रांतीनंतरच्या काळात तिची जागा गहू आणि तांदूळ यांसारख्या इतर पिकांनी घेतली. बाजरीच्या उत्पादनात घट होत जाण्याचे ते प्रमुख कारण असल्याचे ‘एनबीएचसी’चे म्हणणे आहे. बाजरीचे उत्पादन वाढविण्याची गरज असल्याचेही ‘एनबीएचसी’ने आग्रहपूर्वक सांगितले आहे. 2013-14 नंतर म्हणजे गेल्या आठ-नऊ वर्षांत बाजरीच्या हमीभावात 80 टक्क्यांवरून 125 टक्क्यांपर्यंत वाढ झाली. एकीकडे हमीभाव वाढत असताना उत्पादनात सात टक्क्यांची घट होऊन ते 1.55 कोटी टनांवर आले. बाजरीच्या उत्पादनात महाराष्ट्राची एकेकाळी मक्तेदारी होती. परंतु, राजस्थान आणि कर्नाटकने आता बाजरी उत्पादनात महाराष्ट्राला मागे टाकले आहे. 50.15 लाख टन उत्पादनासह राजस्थान देशात पहिल्या क्रमांकावर आहे. देशातील एकूण उत्पादनात राजस्थानचा वाटा 28.6 टक्के आहे. 20.56 लाख टन उत्पादनासह कर्नाटक दुसर्‍या स्थानी आहे. देशाच्या उत्पादनात कर्नाटकचा वाटा 14.26 टक्के आहे. यानंतर 20.51 लाख टन उत्पादनासह महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक येतो. देशाच्या उत्पादनातील महाराष्ट्राचा वाटा 13.95 टक्के आहे. उत्तर प्रदेश, हरियाणा व गुजरातमध्येही बाजरीचे पीक घेतले जाते. परंतु, त्यात सातत्याने घट झाली आहे. आपल्या देशात उपजीविका प्रदान करण्याची तसेच शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढवून अन्न आणि पौष्टिक सुरक्षिततेची हमी देण्याची क्षमता बाजरीमध्ये आहे. बाजरी उत्पादनाला चालना देण्यासाठी सरकार प्रयत्न करत असूनही बाजरी पिकाचे वास्तविक क्षेत्र आणि उत्पादन घटले आहे. याबाबत गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याचे ‘एनबीएचसी’चे मत आहे.

शेतीमध्ये अनेक प्रकारचे प्रश्न निर्माण झाले असून, त्यामुळे शेतीवर अवलंबून असलेले घटक उपजीविकेसाठी किंवा अधिक चांगल्या जीवनशैलीसाठी अन्य पर्यायांकडे वळत आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये शेतकर्‍यांचा कल नगदी पिकांकडे वाढत चालला आहे. जलसिंचन योजनांमुळे जिथे-जिथे पाणी पोहोचले तिथे-तिथे शेतकर्‍यांनी नगदी पिकांकडे मोर्चा वळवला, त्याचा परिणाम भरड धान्यांच्या उत्पादनावर झाला. बाजरीच्या उत्पादनात झालेली घट हा त्याचाच परिणाम असल्याचे म्हटले जाते. बाजरीच्या पिकाला कमी पाऊसपाणी (वार्षिक सरासरी पर्जन्यमान 200 मिलिमीटर) लागते. बाजरीचे उत्पादन भारत आणि आफ्रिका येथील काही देशांत मोठ्या प्रमाणावर खाण्यासाठी केले जाते, तर अमेरिकेत त्याचे उत्पादन मुख्यत्वेकरून पशु-पक्ष्यांच्या खाद्यासाठी केले जाते. बाजरीमध्ये प्रथिनांचे प्रमाण तुलनात्मकद़ृष्ट्या जास्त असल्याने भारतात बाजरीचा उपयोग खाद्यासाठी – प्रामुख्याने भाकरी बनविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो. बाजरीचे मूलस्थान पश्चिम आफ्रिकेतील असून, भारतात ती प्राचीन काळापासून लागवडीखाली आहे. इ.स.पू. 2500 ते 2000 या कालावधीत भारतामध्ये बाजरी लागवडीखाली आली असावी, असे संशोधकांचे म्हणणे आहे. उच्च तापमान, कमी सुपीक जमीन तसेच आम्लयुक्त किंवा क्षारयुक्त जमीन असली तरीही बाजरीची वाढ होते. दुष्काळासारख्या परिस्थितीत हे पीक तग धरून राहते. ज्या परिस्थितीत गहू व मका ही पिके येत नाहीत, अशा परिस्थितीत बाजरीचे पीक वाढू शकते, हे त्याचे वैशिष्ट्य. एकूणच भरड धान्ये ही कमी पाण्यात येणारी पौष्टिक पिके आहेत. भरड धान्याच्या जगातील एकूण उत्पादनापैकी 40 टक्क्यांहून अधिक भरडधान्ये भारतात पिकवली जातात. याला फारशी मशागतीची गरज नसते, त्यावर रोग पडण्याचे प्रमाणही कमी असते शिवाय त्यांची खते आणि पाण्याची गरजही माफक असते. आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष साजरे केले जावे, यासाठी भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये दिलेल्या प्रस्तावाला 72 देशांनी पाठिंबा दिल्यानंतर संयुक्त राष्ट्रांनी 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून घोषित केले. भारतीय भरड धान्यांच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने 16 आंतरराष्ट्रीय व्यापार प्रदर्शने तसेच खरेदीदार-विक्रेता भेटींच्या माध्यमातून निर्यातदार, शेतकरी आणि व्यापार्‍यांचा सहभाग वाढविण्यासाठी विविध योजना आखल्या. धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा, शिरपूर, जळगावमधील चाळीसगाव, यावल, जळगाव, पाचोरा या भागांतील बाजार समित्यांमध्ये बाजरीची आवक खरीप आणि उन्हाळी हंगामात जोमात सुरू असते. खानदेशात उन्हाळी बाजरीचे क्षेत्र 15 ते 17 हजार हेक्टर आहे. बाजरीत लोह अधिक असल्याने शहरातील अनेक कुटुंबांनी बाजरीचा समावेश अलीकडील काळात आहारात केला आहे. यामुळे बाजरीला उठाव कायम आहे. बाजरीची पाठवणूक खानदेशातून राजस्थान, नाशिक, छत्तीसगड, नगर या भागांत केली जाते. मागणी वाढत असताना बाजरीच्या उत्पादनात झालेली घट चिंताजनक म्हणावयास हवी.

संबंधित बातम्या
Back to top button