चिनी कम्युनिस्ट पक्ष (सीसीपी) : चीनला कशाची धास्ती? | पुढारी

चिनी कम्युनिस्ट पक्ष (सीसीपी) : चीनला कशाची धास्ती?

- जयदेव रानडे, निवृत्त रॉ अधिकारी

चिनी कम्युनिस्ट पक्ष सध्या संभाव्य उलथापालथींविषयी चिंतीत झाला आहे. पीएलए बळकट करण्यासाठी आणि सैनिकांचे मनोबल वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू असतानाच माजी सैनिकांची सुरू झालेली निदर्शने ही लष्करी नेतृत्वासाठी चिंतेची बाब ठरू शकते.

चिनी कम्युनिस्ट पक्ष (सीसीपी) आणि विशेषतः सांस्कृतिक क्रांतीनंतर चिनी नागरिक अराजकतेविषयी (डोंग्लुआन) किंवा सामाजिक उलथालापथींविषयी खूपच भयभीत आहेत. विशेषतः विद्यार्थी, कामगार आणि निवृत्त सैनिक आपल्या राजवटीविरोधात एकवटू शकतात, अशी भीती चिनी कम्युनिस्ट पक्षाला वाटते. लष्कराची पुनर्रचना आणि शी जिनपिंग यांनी अंमलात आणलेल्या सुधारणा यामुळे सुमारे 3 लाख सैनिक पदच्युत झाले आणि त्यामुळे लाखोंच्या संख्येने असलेल्या बेरोजगारांमध्ये भर पडली. आर्थिक मंदीचे सावट कोरोना साथरोगाने आणखी गडद केल्यामुळे कम्युनिस्ट चीनमध्ये विषमतेची पातळी जगात सर्वोच्च झाली. पीपल्स लिबरेशन आर्मीमध्ये (पीएलए) सेवा देणारे जे हजारो सैनिक दरवर्षी निवृत्त होतात, त्यांच्यात असंतोष असल्यामुळे चीनच्या नेतृत्वाची चिंता वाढली आहे.

कमी पेन्शन आणि अपुरे आर्थिक पाठबळ मिळत असल्याबद्दल येत असलेल्या तक्रारींबाबत चिनी कम्युनिस्ट पक्ष (सीसीपी) नेतृत्व जागरुक असते. चीनच्या राष्ट्रीय संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्‍ते कर्नल वू कियान यांनी अगदी अलीकडेच लष्करी जवानांसाठी भरीव आर्थिक लाभांची घोषणा केली आहे. 29 जुलै रोजीच त्यांनी असे जाहीर केले की, दि. 7 जुलै 2021 रोजी केंद्रीय लष्करी आयोगाच्या अधिसूचनेनुसार, यावर्षी ऑगस्ट महिन्यापासून पात्र लष्करी कर्मचार्‍यांना दरमहा 60 रेन्मिन्बी (आरएमबी) एवढा पालकत्व सहाय्य निधी मिळू शकेल. 60 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या पालकांसाठी ही योजना लागू आहे. सक्रिय लष्करी कर्मचार्‍यांच्या जोडीदाराला (पती/पत्नी) 500 आरएमबीचे आर्थिक सहकार्य देणारे अन्य एक अनुदान जाहीर केले आहे.

संबंधित बातम्या

चीनमधील 57 दशलक्ष प्रभावशाली व्यक्‍ती आणि माजी सैनिक आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याच्या ज्या चर्चा हलक्या आवाजात सुरू होत्या, त्यांना बळ मिळाले आहे. कोणत्याही वेळी निदर्शने होतील आणि तत्क्षणी कारवाई करावी लागेल, यासाठी सार्वजनिक सुरक्षा अधिकारीही अत्यंत सतर्क आहेत. याचिकाकर्ते किंवा कोणत्याही प्रकारच्या तक्रारी असलेल्या लोकांना संवेदनशील काळात बीजिंगला जाण्यास सार्वजनिक सुरक्षा अधिकारी मज्जाव करतात. तरीदेखील कामावरून कमी केलेल्या आणि अनुभवी सैनिकांच्या एका दुर्मीळ आणि मोठ्या निदर्शनाचे दृश्य या महिन्यात बीजिंगमध्ये पाहावयास मिळाले. 13 सप्टेंबर रोजी संपूर्ण चीनमधून 300 पेक्षा अधिक दिग्गजांनी सार्वजनिक सुरक्षा अधिकार्‍यांचे अडथळे आणि शोधमोहिमांपासून स्वतःचा बचाव केला आणि बीजिंगला पोहोचले. जिनपिंग यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय लष्करी आयोगाच्या मुख्यालयाबाहेर ते जमले आणि लष्करातून निवृत्त झालेल्यांच्या मागण्यांसाठी घोषणाबाजी केली. अपुर्‍या सेवानिवृत्ती लाभांविषयी त्यांनी तक्रारही केली.

‘दि एपोच टाईम्स’च्या बातमीनुसार घटनास्थळी मोठा फौजफाटा होता आणि 200 पैकी 137 आंदोलकांना अटक झाली. उर्वरित आंदोलक पळ काढण्यात यशस्वी झाले. अटक केलेल्या माजी सैनिकांची रवानगी जिऊजियांगझुआंग येथील अनधिकृत कोठडीत केली आणि अद्याप त्यांची सुटका झालेली नाही. इतरांना जरब बसावी, यासाठी अटक केलेल्यांना कठोर शिक्षा सुुनावली जाण्याची शक्यता आहे. 2019 मध्ये झेजियांग प्रांतात अशाच प्रकारे निदर्शने करणार्‍या दिग्गजांना लोकांना गोळा करून सामाजिक सुव्यवस्था बिघडविल्याच्या आरोपावरून दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली होती.

पॉलिटिकल वर्क ब्यूरो, नॅशनल डिफेन्स

मोबिलायझेशन डिपार्टमेन्ट, सेंट्रल मिलिटरी कमिशनचे लिऊ गुओशुन यांचा एक लेख ‘पीपल्स डेली’ने 15 ऑगस्ट रोजी प्रकाशित केला. लिऊ यांनी असे निदर्शनास आणून दिले की, पक्षाच्या 18 व्या काँग्रेसपासून सैनिकांची स्थिती आणि हक्कांसंबंधी कायदे, तसेच धोरणांची मालिकाच सरकारकडून सुरू आहे. सहाय्यभूत सुविधांमध्ये सुधारणा केली. त्यामुळे सैनिकी पेशा हा संपूर्ण समाजासाठी एक आदरणीय पेशा ठरला. ही अनुकूल धोरणे आणि नियमांची योग्यप्रकारे प्रसिद्धी केल्यास उच्च दर्जाच्या सैनिकांची भरती करणे शक्य होईल, असे आवाहन त्यांनी केले. अशा प्रकारच्या लेखांना दिलेली प्रसिद्धी हेच दाखवून देते की, पीएलएच्या युनिटस्मध्ये बरीच घुसमट आहे.

20 मे 2021 रोजी नॅशनल डिफेन्स युनिव्हर्सिटीच्या पॉलिटिकल कॉलेजमधील दोन पीएलए अधिकारी आणि जॉईंट लॉजिस्टिक सपोर्ट फोर्स लोंग्यान कॉम्प्रिहेन्सिव्ह वेअरहाऊस सपोर्ट टीमने संयुक्‍तपणे एक लेख लिहिला आणि तो ‘चायनीज अ‍ॅकॅडमी ऑफ सोशल सायन्सेस’ या चिनी सरकारच्या सर्वांत मोठ्या थिंक टँकने प्रकाशित केला. त्यांनी लेखात म्हटले आहे की, लष्करावर पक्षाचे निरपवाद नेतृत्व हे आपल्या पक्षाच्या सैन्य उभारणीचे आणि लष्करावर नियंत्रण ठेवण्याचे मूलभूत तत्त्व आहे. परंतु, आज त्यापुढे नवीन आव्हाने उभी आहेत. याकामी योगदान देणार्‍या घटकांमध्ये लष्करी आधुनिकीकरणाच्या गतीबरोबरच सैन्याला नवचैतन्य देणे, प्राथमिक स्तरावर सैन्य तयार करण्याच्या नवीन पद्धती, मोहिमांच्या आवश्यकतांमध्ये सखोल बदल आणि त्याअंतर्गत अधिकारी आणि सैनिक तसेच लष्करी संघटनेच्या रचनेचा आणि बाह्य सामाजिक वातावरणाचा समावेश त्यांनी केला आहे. ‘विचारांचे धुके’ दूर करण्याची गरज लेखात व्यक्‍त केली आहे. लिबरेशन आर्मी डेलीच्या पीएलए युनिट 31006 च्या एका सदस्याने व्यक्‍त केलेल्या भावना अप्रत्यक्षपणे हेच ध्वनित करणार्‍या आहेत. पक्षाच्या सदस्यांनी त्यांच्याबद्दल सन्मानाची भावना वाढविली पाहिजे आणि पक्ष संघटनेचा सदस्य म्हणूनही अभिमानाची भावना असली पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे.

पीएलए बळकट करण्यासाठी आणि सैनिकांचे मनोबल वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू असतानाच माजी सैनिकांची सुरू झालेली निदर्शने ही लष्करी नेतृत्वासाठी चिंतेची बाब ठरू शकते. आज माजी सैनिकांमध्ये धुमसत असलेला असंतोष पीएलएमधील सक्रिय सैनिकांपर्यंत पसरू शकतो, अशी भीती नेतृत्वाला आहे. कारण, चिनी लष्करात सेवाकाळ अत्यंत कमी आहे आणि दरवर्षी हजारो लोक सेवामुक्‍त होतात.

Back to top button