लवंगी मिरची : पुस्तक कम वही? | पुढारी

लवंगी मिरची : पुस्तक कम वही?

काय रे मित्रा, एवढी बारकाईने कोणती बातमी वाचत आहेस?
अरे तेच रे ते. काहीतरी गदारोळ सुरू आहे ना. ते पुस्तकालाच वहीची पाने जोडायचे प्रकरण. त्याचं पुढे काय झालं ते वाचत होतो.
होय तर, पहिल्यांदा ही आयडिया ऐकली तेव्हा मला फार आवडली की, वेगळी वही आणि वेगळे पुस्तक घ्यायचं कामच नाही. पुस्तकाचा धडा संपला की वहीची तीन-चार कोरी पाने जोडलेली असणार. त्याच्यावरच प्रश्न सोडवायचे, उत्तरे लिहायची, गृहपाठ पूर्ण करायचा. सोपे आहे; पण यासंबंधी एका सातवीच्या विद्यार्थ्याला बोललो. त्याचे डोके भलतेच वेगळे चालले. तो म्हणाला, पुढे कॉप्या करायला पण खूप सोपे जाईल. पुस्तकातली उत्तरे लिहिलेली वहीची पाने फाडली की, झाली कॉपी तयार. अजब डोक्याचे लोक आहेत यार आपल्याकडे. कोण कसा विचार करेल काही सांगता येत नाही. कुणाला अभ्यासाचे पडले आहे, कोणाला शिक्षणाचे पडले आहे, तर कुणाला कॉप्याचे. विविधतेत महानता म्हणजे हेच आहे बहुतेक.

मला काय वाटतं, पुस्तकाला वहीची पाने जोडली तर पुस्तक जाडजूड होईल ना? त्याचं ओझं पुन्हा विद्यार्थ्यांनीच वहायचं? एकीकडे आपण म्हणतोय ओझे कमी करा आणि दुसरीकडे दप्तराचे ओझे वाढत जाते, हा प्रश्न कसा काय सुटणार?

ते सोड. समजा एखाद्या विद्यार्थ्याने पुस्तकातल्या वहीच्या पानावर काहीच गृहपाठ केला नाही, तर ते कागद वाया जातील की नाही? शिवाय तपासायला शिक्षकांनाही अवघड जाईल. जाडजूड पुस्तक घेऊन त्यातले वहीचे पान काढायचे आणि त्यावरचा गृहपाठ तपासायचा, त्यावर शेरा मारायचा, सही करायची, सूचना द्यायच्या. मग असं का नाही करत की, धडा संपला की वहीची पानं आणि ती संपली की, शिक्षकांसाठी सूचना देण्याचे एक पान. तुझ्या डोक्यात पण आयडिया येण्यास सुरुवात झाली की काय? फार हुशार लोक आहेत रे बाबा आपल्या राज्यात. मानलं पाहिजे तुझ्या डोक्यालिटीला. कधी-कधी विद्यार्थी गृहपाठ करत नाहीत, तर त्यांच्या आयाच गृहपाठ पूर्ण करून देतात. मग त्यांच्यासाठी पण वेगळी पाने जोडायची का, याचा विचार करायला काय हरकत आहे.

संबंधित बातम्या

अरे सर्रास चालू आहे हे. कार्टी मोबाईल खेळत बसतात आणि आई-बाप यांचे गृहपाठ पूर्ण करून देतात. शिक्षक पालक मिटिंगला विद्यार्थ्यांचा उत्साह शून्य असतो. पालक मात्र अति उत्साही असतात.

हो, म्हणजे पुस्तकाला वहीची पाने जोडायची का वहीला पुस्तकाची पाने जोडायची याचाही विचार करता आला असता. शिवाय प्रत्येक धड्यापाठोपाठ दिलेला गृहपाठ विद्यार्थ्यांना लिहायला लावल्यापेक्षा तो पण छापून घेतला असता, तर सगळ्यांचा त्रास मिटला असता. म्हणजे विद्यार्थ्याने छापलेला धडा वाचायचा त्या पाठोपाठ प्रश्न आणि त्याची उत्तरे वाचायची. हे सर्व एकाच पुस्तकं कम वहीत किंवा वही कम पुस्तकात असेल. धमाल येईल ना?

कधी-कधी वाटते या काळात आपण विद्यार्थी असायला पाहिजे होतो. सगळे काही रेडिमेड हातात असते. आपल्या काळात असे काही नव्हते. पाढा चुकला, तर शिक्षक लोक छडीने मारायचे आणि त्यांच्या धाकानेच पाढे पाठ व्हायचे.

अरे पण त्याच्याच जोरावर मी आज माझ्या पोरांना हरवतो ना. म्हणजे बघ पंधरा गुणिले सात करायचे असेल, तर माझ्या पोराला कॅल्क्युलेटर लागतो किंवा मोबाईल मधला कॅल्क्युलेटर वापरून तो हा गुणाकार करतो. मी पंधराचा पाढा सातपर्यंत म्हणून काही सेकंदात पंधरा गुणिले सात बरोबर एकशे पाच हे उत्तर देतो. म्हणजे मला सांग शिक्षण पद्धती आजची चांगली की, पूर्वीची चांगली? याचाही कुठेतरी विचार करावा लागेल.

– झटका

Back to top button