कोकणात ठाकरे-शिंदे आमनेसामने

उद्धव ठाकरेंच्या खेड येथील सभेला मोठी गर्दी झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा घेण्याची घोषणा रामदास कदम यांनी केली आहे. ही सभा 19 मार्चला होईल. कोकणात यानिमित्ताने ठाकरे विरुद्ध शिंदे, असे नवे राजकीय समीकरण पाहायला मिळणार आहे.
कोकण हा शिवसेनेचा गेल्या 30 वर्षांपासूनचा बालेकिल्ला. या बालेकिल्ल्यात शिवसेनेमधील मोठ्या फुटींनंतर पहिल्यांदाच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची जाहीर सभा खेडमध्ये रामदास कदमांच्या होम पीचवर झाली. मोठ्या संख्येने असलेली उपस्थिती आणि माजी आमदार संजय कदम यांचा वाजतगाजत ठाकरे गटात प्रवेशही झाला. त्यामुळे आगामी विधानसभेला रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम विरुद्ध माजी आमदार संजय कदम यांच्यात सामना रंगणार हे आता निश्चित झाले आहे.
ठाकरे यांच्या सभेनंतर कोकणात राजकीय शिमगा सुरू झाला आहे. कोकणात प्रथम शिवसेनेतून बाहेर पडलेले नारायण राणे आणि त्यानंतर आता रामदास कदम हे दोन्ही शिवसेनेचे ताकदवान नेते होते. दोघांनाही शिवसेनेने राजकीय लाभाची पदे दिल्याने त्यांचे कोकणात वर्चस्व मोठ्या प्रमाणात निर्माण झाले. सिंधुदुर्गात नारायण राणे, रत्नागिरीत रामदास कदम, ठाण्यात एकनाथ शिंदे, असे शिवसेनेचे नेते या पक्षासाठी आधारवड ठरल्याचे गेल्या 20 ते 30 वर्षांतील चित्र आहे.
आज हे तिन्ही नेते उद्धव ठाकरेंपासून दुरावले आहेत. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर समर्थक असलेले नेते सध्या वेगवेगळ्या पक्षात स्थिरावले आहेत. नारायण राणे यांची शिवसेनेतील कारकीर्द जवळपास 35 वर्षांची होती. नगरसेवक ते मुख्यमंत्री अशी त्यांची चढती राजकीय कारकीर्द. त्यानंतर सात वर्ष विरोधी पक्षनेते. काँग्रेसमधील प्रवेशानंतर महसूलमंत्री, उद्योगमंत्री, भाजप प्रवेशानंतर केंद्रीय मंत्री अशी त्यांची राजकीय कारकीर्द आहे. दुसर्या बाजूला रामदास कदम यांनी 1995 मधील युती सरकारमध्ये गृहराज्यमंत्रिपद भूषवले. त्यानंतर 2014 च्या फडणवीस सरकारमध्ये ते कॅबिनेट मंत्री होते. त्यापूर्वी राणे काँग्रेसमध्ये गेल्यानंतर विरोधी पक्ष नेतेपदही त्यांनी भूषविले होते.
राणेंना टक्कर देण्यासाठी रामदास कदम असे त्यावेळी कोकणातील समीकरण होते. आता हे दोन्ही नेते उद्धव ठाकरेंविरोधात एकत्र आले आहेत. उद्धव ठाकरेंच्या बाजूने उभे आहेत ते माजी मंत्री भास्कर जाधव, माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते आणि रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत. ठाकरेंच्या खेड येथील सभेला मोठी गर्दी झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा घेण्याची घोषणा रामदास कदम यांनी केली आहे. ही सभा 19 मार्चला होईल. कोकणात यानिमित्ताने ठाकरे विरुद्ध शिंदे असे नवे राजकीय समीकरण पाहायला मिळणार आहे. आव्हाने आणि प्रतिआव्हाने यामुळे कोकणातील शिमगा राजकीय धुळवडीच्या वाटेने जाणार हे आता स्पष्ट आहे.
विद्यमान राजकीय स्थित्यंतराचे अवलोकन केले असता सिंधुदुर्गात दीपक केसरकर, रत्नागिरीत उदय सामंत, रामदास कदम, रायगडमध्ये भारत गोगावले, महेंद्र दळवी, महेंद्र थोरले हे आताच्या शिवसेनेत आहेत. त्यांना टक्कर देण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून आघाडीची रसद घेऊन उमेदवार दिले जाणार आहेत. रामदास कदमांना शह देण्यासाठी राष्ट्रवादीने माजी आमदार संजय कदम यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत पाठविले आहे. त्यामुळे खेडमध्ये कदम विरुद्ध कदम, असा जोरदार सामना होणार आहे.
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका म्हणजे शिंदे आणि ठाकरे यांच्यासाठी अस्तित्वाची लढाई असणार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कोकणातील दौरे वाढले आहेत. यापूर्वी त्यांनी रत्नागिरीतही जाहीर सभा घेतली होती. आता दुसरी जाहीर सभा खेड येथे होत आहे. उद्धव यांच्याबद्दल असलेली लोकांची सहानुभूती कमी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रयत्नशील आहेत. गेल्या विधानसभेला शिवसेनेचे कोकणातून 14 आमदार आणि 3 खासदार निवडून आले होते. आता ही ताकद कमी करण्याचे आव्हान भाजपने शिंदेंकडे अलगद सोपविले आहे. त्यामुळे कोकणपट्ट्यातील पुढचा राजकीय प्रवास अधिक रोमहर्षक असणार यात संदेह नाही.
– शशिकांत सावंत