जागतिक महिला दिन विशेष : स्वातंत्र्याबरोबरच कर्तव्य,जबाबदारीचे भान हवे! | पुढारी

जागतिक महिला दिन विशेष : स्वातंत्र्याबरोबरच कर्तव्य,जबाबदारीचे भान हवे!

पूर्वीच्या तुलनेने विचार करता आज स्त्रियांबाबत अनेक सकारात्मक बदल कमी-अधिक फरकाने घडत आहेत, तरीही प्रश्न संपलेले नाहीत. याचे कारण, आजही स्त्रीकडे स्त्री म्हणून आणि पुरुषांकडे पुरुष म्हणून पाहिले जाते. दोघांनी स्वतःकडे आणि परस्परांकडे माणूस म्हणून पाहिले पाहिजे आणि माणूसपणाकडे वाटचाल केली पाहिजे. एकमेकांचे विश्व समजण्यासाठी तसा संवाद चालू ठेवला पाहिजे. हाच जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने एक संदेश होऊ शकेल.

महिला दिन साजरा होऊ लागला त्याला 100 वर्षे उलटून गेली असली, तरीही तो साजरा होण्याची गरज आजही कायम आहे. आता या दिवसाकडे एका वेगळ्या द़ृष्टीने आणि मुख्य म्हणजे सकारात्मक पद्धतीने पाहिले पाहिजे. आज (8 मार्च) महिला दिन आहे. स्त्रीचा सन्मान केला पाहिजे. तिच्या घरकामाला प्रतिष्ठा देणे किंवा त्या दिवशी तिला विश्रांती देणे, निदान अशा गोष्टींचा किमान विचार होताना तरी दिसत आहेे. तिला या दिवशी स्वयंपाकाला सुट्टी अशी अनेक घरांत मानसिकता आता दिसून येते. खरे तर, घरकाम हे स्त्रियांचेच काम आहे आणि गृहव्यवस्थापनाची जबाबदारी तिची आहे, ही गोष्ट लिंगाधिष्ठित असता कामा नये. महिला दिनाच्या निमित्ताने का असेना हे बोलले जात आहे. कधी कधी असेही होते, काही ठिकाणी पुरुष स्वतःहून पुढे येतात आणि म्हणतात, आज बायकोला किंवा आईला सुट्टी आहे तेव्हा मी स्वयंपाक करतो. या पद्धतीनेसुद्धा थोडीशी दिशा बदलू लागली आहे. स्वयंपाकघरात पुरुषांनी जाणे यावरील प्रतिबंध कमी होऊ लागलेला आहे. त्यामुळे अशा अर्थानेसुद्धा हा बदल चांगला घडू लागला आहे. गेल्या 114 वर्षांचा विचार केला, तर या संपूर्ण कालावधीत स्त्री नागरिक म्हणून सजग झालेली दिसत नाही. त्यामुळे इथून पुढे महिलांच्या मागण्यांमध्ये हिंसाचाराचा मुद्दा, घरात वा नोकरीच्या ठिकाणी आणि घराबाहेर कुठेही स्त्रीची प्रतिष्ठा जपलीच गेली पाहिजे, हे मुद्दे राहणारच आहेत. आज कौटुंबिक हिंसाचार, लैंगिक शोषण याबाबतचा कायदा बराच विस्तारला आहे. त्याचे खूप मोठ्या प्रमाणात स्वागत होणे गरजेचे आहे आणि ते होतही आहे. स्त्रीकडे पाहण्याची द़ृष्टी आता काहीअंशी का होईना पण चांगल्या अर्थाने बदलत आहे, हे स्वागतार्ह आहे.

स्त्रीने नोकरी करायला हवी, असे परिसंवादाचे विषय आता मागे पडलेले आहेत. स्त्री नोकरी करते हे स्वीकारले गेले आहे; पण दुसरीकडे असेही चित्र दिसत आहे की, पती-पत्नी दोघेही लाखोंनी पैसे मिळवत असूनही मुलांकडे कोण बघणार, हा विचार करून स्त्रिया घरातच राहण्याचा निर्णय घेताना दिसतात. हे प्रमाण वाढत गेले, तर शेवटी स्त्री घरात राहील. वास्तविक, मी आता घरात राहतो, तू नोकरी कर, असे पुरुष आजही म्हणताना दिसत नाहीत. काही उदाहरणे अपवादात्मक असतीलही; पण त्यांचे प्रमाण नगण्य आहे. त्यातही एखादा पुरुष हे स्वीकारत असेल, तर त्यामागची कारणे वेगळी असतात. त्याला नोकरीचा कंटाळा येतो किंवा इतर काही कारण असू शकते. स्वतःहून नोकरी सोडून घर सांभाळण्याची जबाबदारी स्वीकारणार्‍या पुरुषांचे प्रमाण अत्यल्प आहे; पण ज्या स्त्रिया उच्च शिक्षण घेऊन मुलांसाठी, घराची आबाळ होऊ नये म्हणून स्वतःचे काम सोडतात, त्यामध्ये महिलांनी कुठे तरी एक पाऊल मागे घेतलेले दिसत आहे. ते धोकादायक वाटते. अर्थात, काही ठिकाणी मुले मोठी झाल्यानंतर स्त्रिया पुन्हा नव्या जोमाने या चौकटीतून बाहेर येताना दिसत आहेत. म्हणजे हीदेखील एक सकारात्मक बाजू आहे.

संबंधित बातम्या

या संपूर्ण कालावधीत कामाचे वेळापत्रक लवचिक असणे ही मागणी छाया दातार यांनी पंधरा-वीस वर्षांपूर्वी केली होती. हीच मागणी आता पुन्हा नव्याने उचल खाऊन पुढे आली पाहिजे. समकालीन महिलांच्या बाबतीत करण्याजोग्या गोष्टींमध्ये कामाचे वेळापत्रक लवचिक असणे, स्त्री-पुरुष दोघांनाही समान पद्धतीने घरातील आणि कामाच्या ठिकाणच्या जबाबदारीची जाणीव असणे, ती जबाबदारी तेवढ्याच तत्परतेने पार पाडणे या गोष्टी आवश्यक आहेत. अलीकडे अनेक पुरुषांना घरकामात महिलांना मदत करण्याची इच्छा असते; पण आम्हाला लहानपणापासून आई-वडिलांकडून असे काही शिकवले गेले नाही, अशी त्यांची तक्रार असते. दुसरीकडे स्त्रियांना पुुरुषांची संथ पद्धतीने काम करण्याची पद्धत स्वीकारण्याइतका संयम नसतो. वास्तविक, महिलांनी याबाबत संयम दाखवणे आवश्यक आहे. पुरुषांना शिकण्यासाठी पुरेसा वेळ व संधी दिली पाहिजे. अनेक ठिकाणी घरातली कामे करताना बायकोच्या सूचना ऐकण्याची पुरुषांना सवय नसल्याचे दिसते. घरातील स्त्रीने सूचना दिल्या, तर पुरुषांना ती कटकट वाटू शकते; पण घरातील काम, स्वच्छता नेटकेपणाने ठेवण्यासाठी किती कष्ट पडतात, हे पुरुषांना प्रत्यक्ष समजणार नाही, तोपर्यंत त्यांना त्याची किंमत कळणार नाही. स्त्रीच्या घरातील कामाची किंमत कळण्याचा जो मुद्दा आहे तो खूप महत्त्वाचा आहे. 24 तास ऑन ड्युटी असणे, सतत घरात काय आहे काय नाही, काय करायचे हा विचार डोक्यात असणे हे अवघड असते. स्वयंपाकाला अर्धा-एक तास लागत असला, तरी त्यासाठी लागणारी सामग्री तपासणे, आणणे त्यात बराच वेळ जातो. या सर्व गोष्टी पुरुषांना समजणे आजही पुरेशा प्रमाणात होताना दिसत नाहीत. पुरुषांनी एखाद-दोन दिवस थोडासा स्वयंपाक केला, तर त्याचे खूप कौतुक होते. ही परिस्थिती पुरुषप्रधान संस्कृतीचे द्योतक आहे. हे बदलणेही आज गरजेचे आहे.

या सगळ्या गोष्टींना धरून पुढे नागरिक म्हणून स्त्रीचे काय योगदान आहे, या प्रश्नाकडेही गांभीर्याने पाहिले पाहिजे. सर्वांत पहिला दोष जाणवतो, तो विधानसभा आणि लोकसभेच्या राखीव जागांबाबत. आज ज्या पद्धतीने राजकारण सुरू आहे ते पाहता राखीव जागांचा मुद्दा बाजूला पडत आहे. प्रत्येकाला आपली जागा टिकवणे अवघड होऊन बसले आहे. त्यामुळे हा मुद्दा कोणाच्या अजेंड्यावरच येताना दिसत नाही. त्यामुळे महिलांनीच याबाबत आता आग्रह धरला पाहिजे. विधानसभेत आणि लोकसभेत स्त्रियांना राखीव जागा मिळाल्याच पाहिजेत. त्यासाठी काही वेगळे प्रयत्न करणे गरजेचे आहे. वेगवेगळ्या सरकारी समित्या, शिक्षण, नगरपालिका, महानगरपालिका यांच्या समित्यांमध्येही महिलांसाठी राखीव जागा असणे आवश्यक आहे. थोडक्यात, आता फक्त नोकरी करून स्त्रीला थांबून चालणार नाही, तर प्रत्येक संस्थेमध्ये कार्यकारी मंडळात 30 टक्के स्त्रिया असल्या पाहिजेत. वास्तविक, स्त्रियांनी आळस झटकून जबाबदारी स्वीकारण्यासाठी पुढे आले पाहिजे. हे माझे कर्तव्य आहे आणि मला जे दुय्यमत्व आलेले आहे, ते माझ्याकडे जबाबदार्‍या नसल्यामुळे आले आहे. त्यामुळे समानता हवी असेल, तर या सर्व गोष्टी मला केल्या पाहिजेत, हे स्त्रीने ओळखले पाहिजे. स्वातंत्र्याबरोबरच कर्तव्य आणि जबाबदारीही येते, हे स्वीकारणे गरजेचे आहे.

– गीताली वि. म., ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या

Back to top button