श्रेय शिवसेनेचेच! | पुढारी

श्रेय शिवसेनेचेच!

आधी औरंगजेब आणि नंतर निजामाच्या अधिपत्याखाली असलेल्या मराठवाड्याला या शासकांनी शहरे, तालुके किंवा गावांना दिलेल्या नावांत कधीच काही गैर वाटले नव्हते. स्वातंत्र्य मिळाले अन् भारतात समावेश झाला, हेच या भागासाठी महत्त्वाचे होते, अन्यथा निजामाने या भागाला पाकिस्तानाशी जोडण्याची पूर्ण तयारी केलीच होती. त्यामुळे पाऊणशे वर्षे मराठवाडाकरांनी या परकीय नावांची झूल अंगावर तशीच ठेवली. त्यांची अस्मिता जागवली, ती शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी!

1988 च्या महानगरपालिका निवडणुकीत या मुंबईकर पक्षाला घवघवीत यश आले आणि त्या निवडणुकीच्या विजयी सभेत बाळासाहेबांनी शहराचे नाव संभाजीनगर ठेवले. त्या क्षणापासून प्रत्येक शिवसैनिकाने आणि शिवसेनेचा विचार मानणार्‍याने शहर आणि जिल्ह्याचेही नामकरण संभाजीनगर करून टाकले होते. भाजपच्या कार्यकर्त्यांनीही हेच नाव रूढ केले. त्याचबरोबर बाळासाहेबांनी उस्मानाबाद जिल्ह्याचे नामकरण धाराशिव केले होते. औरंगाबाद शहरातील औरंगपुरा परिसराला संभाजी पेठ, तर औरंगजेबची कबर असलेल्या खुलताबाद शहराला रत्नपूर हे नाव शिवसेनेनेच दिले.

24 फेब्रुवारी 2023 च्या राजपत्रात (गॅझेट) छत्रपती संभाजीनगर जिल्हा औरंगाबाद असा उल्लेख करण्यात आल्यामुळे पुन्हा गदारोळ उठला आहे. जिल्ह्याचे नाव का बदलले गेले नाही, असा सर्वसामान्यांचा प्रश्न आहे; परंतु नामांतर ही एक प्रक्रिया आहे आणि विविध विभागांनी या राजपत्राप्रमाणे छत्रपती संभाजीनगर या नवीन नावाचा स्वीकार केल्यानंतर जिल्ह्यालाही छत्रपती संभाजीनगर जिल्हा संबोधले जाईल, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. नामांतराच्या या प्रक्रियेचे आपण सगळेच साक्षीदार आहोत; पण पहिल्यांदा बाळासाहेबांनी पुढाकार घेतला. त्यामुळे हे श्रेय त्यांनाच जाते.

हिंदुत्ववादी विचारांच्या पक्षांमध्ये मतांचे विभाजन नको, म्हणून बाळासाहेब ठाकरे यांनी भाजपशी युती करण्याचा निर्णय घेतला होता. युती करून निवडणुका जिंकायच्या आणि सत्ता दोन्ही पक्षांनी आपापल्या बळानुसार वाटून घ्यायची, हेच या युतीचे मूळ सूत्र होते. त्याप्रमाणे महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये सत्ताकारण चालत आले. जी महानगरपालिका कधीही काँग्रेसच्या ताब्यातून गेली नाही, ती एकदा युतीच्या ताब्यात आली आणि कायमची ताब्यात राहिली. ही युती तुटेल आणि दोन्ही पक्ष आपापली वाट धरतील, असे मतदारांनाही कधी वाटले नव्हते.

या शहराला दंगलींची पार्श्वभूमी असल्यामुळे हिंदुत्ववादी मतदार आपल्या वॉर्डात उमेदवार भाजपचा आहे की शिवसेनेचा, इतकेच बघत आला. त्यामुळे युतीला बहुमत मिळत गेले. नामांतराला या राजकारणाची पार्श्वभूमी असली, तरी पहिला हातोडा मारण्याचे धाडस दाखवले, ते बाळासाहेबांनी. ज्या औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांचा छळ केला, त्याचे नाव कशासाठी, हा त्यांचा प्रश्न होता. आठव्या शतकापासून चालत आलेले धाराशिव हे नाव तर निजामाने 19 व्या शतकात बदलले होते. त्याचीही झूल कशासाठी मिरवायची, असा सवाल बाळासाहेबांनी केला. तेथूनच नामांतरासाठी आंदोलने झाली. राज्य आणि केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविले गेले आणि शेवटी 35 वर्षांनी केंद्र सरकारची मान्यता मिळाली.

दरम्यानच्या काळात संभाजीनगर या नावाला विरोध असलेल्या मंडळींनी न्यायालयातही धाव घेतली. नामांतराची गरज नाही, असे म्हणणार्‍यांनी त्या काळात नामांतरे का झाली, याचेही उत्तर दिले पाहिजे. कोणत्याही शहराचा, परिसराचा इतिहास नावावरूनच ओळखला जातो. काही राजे-रजवाड्यांनी त्यांचे नाव अजरामर व्हावे म्हणून आपली नावे शहरांना दिली होती, तर काहींचे कार्य दंडवत घालण्या जोगे होते म्हणून लोकांनी त्यांची नावे दिली होती. मराठवाड्यातील या दोन्ही शहरांची नावे पहिल्या वर्गात मोडतात. औरंगाबाद आणि धाराशिवच्या बाबतीत तसे घडले नाही. मराठवाड्यात काही काळ निजामाची राजवट होती; पण अनादिकाळापासून निजामच राज्यकर्ता होता, असे चित्र दाखविले गेले. निजामाने आधीचा इतिहास पुसून टाकला आणि आपल्या अत्याचारांची बखर लिहून ठेवली. अभिमानाने घ्यावे, असे नाव आता दोन्ही शहरांना मिळाले आहे.

– धनंजय लांबे

Back to top button