लवंगी मिरची : भटक्या श्वानांना आवरा! | पुढारी

लवंगी मिरची : भटक्या श्वानांना आवरा!

यार, तुला खरंच सांगतो, आपला देश म्हणजे सर्वात उच्च प्रतीचा विरोधाभास जागोजागी भरलेला दिसून येतो. आता हेच बघ ना, नुकतीच एक घटना घडली त्याचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाला आहे. यात एक छोटीशी तीन-चार वर्षांची मुलगी रस्त्यावर उभी आहे आणि सात-आठ भटक्या कुत्र्यांनी तिच्यावर हल्ला केला आहे. तिला त्यांनी खाली पाडले आणि तिचे लचके तोडले ते इतके भीषण होते की, त्यातच तिचा जीव गेला. लगेच सगळीकडून मागण्या सुरू झाल्या की, भटक्या कुत्र्यांना मारून टाका. श्वानप्रेमी किंवा प्राणिप्रेमी लोकांनी लगेच विरोधी बाजूने आवाज उठवला की, भटके प्राणी अजिबात मारता कामा नये नयेत.

पण, मला एक समजत नाही, कुणी खाऊ घालत नाही, जेवू घालत नाही, प्यायला पाणी मिळत नाही, तरीही या भटक्या कुत्र्यांची संख्या सारखी वाढतच असते, काय कारण असेल?

विशेष काही नाही, या भटक्या कुत्र्यांना भूतदयेला जागून खाऊ घालणारी असंख्य माणसे आजूबाजूला असतात. ते जे काय खाऊ घालतील त्यावर ही भटकी कुत्री जगतात. नुसती जगली तर प्रश्न नव्हता, ती प्रजनन करतात आणि त्यांच्यातील माद्या एकाचवेळी पाच-सहा पिल्लांना जन्म देतात. यातील तीन पिल्ले जरी जगली, तरी अवघ्या सहा महिन्यांत ती मोठी होऊन भटक्या कुत्र्यांच्या संख्येत भर घालतात. भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत जाते.

संबंधित बातम्या

हो, पण मग महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायती या भटक्या कुत्र्यांची संख्या कमी करण्यासाठी त्यांना पकडून नेतात, त्यांचे ऑपरेशन करतात आणि परत त्याच वस्तीत सोडतात, तरीही संख्या वाढते हे कसे काय?

कुणी कितीही प्रयत्न केले तरी गावांतील, शहरांतील सर्व भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण करून त्यांचे प्रजनन थांबवणे केवळ अशक्य आहे. त्यातील जे उरतात ते झपाट्याने संख्या वाढवायला कारणीभूत असतात, म्हणजे कितीही प्रयत्न केले तरी ते तोकडेच पडणार आहेत.

सोपे आहे. कुत्री ही मुळातच मांसाहारी जमात आहे. शिकार करून खाण्याचा त्यांचा गुणधर्म आहे. त्यामुळे आपल्यापेक्षा कमी उंचीची आणि विरोध न करू शकणारी लहान मुलं त्यांच्यासाठी अत्यंत सोपे टार्गेट होते. साहजिकच, सर्वत्र लहान मुलांवर जास्त आक्रमण केले जाते.

मला असे वाटते की, सध्या राजकारणात प्रत्येकाला कोणते ना कोणते पद हवे आहे. नागरी भागात तर नगरसेवकपदाचा बिल्ला आपल्या गळ्यात पडावा म्हणून लोक पाच-पाच, दहा-दहा वर्षे कार्य करत राहतात, निवडणुका जिंकतात आणि थाटात मिरवतात. हा नगरसेवकपदाचा बिल्ला आपल्या गळ्यात अडकवण्यापेक्षा या लोकांनी पाळीव प्राण्यांना आणि त्यांच्या मालकांना आपल्या कुत्र्याला बिल्ला घालण्यासाठी प्रबोधन केले, तर फार मोठे काम होईल. किमान प्रत्येक नगरसेवकाने आपल्या वॉर्डातील भटक्या कुत्र्यांची संख्या कमी होण्यासाठी अहोरात्र ध्यास घेतला पाहिजे. अरे, असे भरीव कार्य करतील ना तर त्यांना निवडणुकीसाठी प्रचार करण्याचीही गरज राहणार नाही. परंतु, संपूर्ण महाराष्ट्रात असे एकही उदाहरण नाही की, एखादा वॉर्ड, एखादे गाव भटके कुत्रे मुक्त झाले आहे.

हो, तू म्हणतोस ते खरे आहे. अशाप्रकारचे बॅनर कुठे दिसले नाहीत. म्हणजे गावात प्रवेश करतानाच, ‘भटके कुत्रे मुक्त गावात आपले सहर्ष स्वागत आहे,’ असे बॅनर मी तरी अजून पाहिलेले नाहीत. तसे बॅनर पाहायला मिळतील तो सुदिनच म्हणावा लागेल. शिवाय, शहरातील प्रत्येक कुत्र्याचे लसीकरण केले तर रेबीज म्हणजेच श्वानदंश हा आजार फैलावण्याचा धोका कमी होईल.

प्रत्येक श्वानमालकाने आपल्या कुत्र्याची नोंदणी करून घेणे अनिवार्य केले पाहिजे, म्हणजे मग पाळीव कुत्रे कोणते आणि भटके कुत्रे कोणते, याचे वर्गीकरण करणे सोपे होईल. काहीही म्हण यार, या भटक्या कुत्र्यांच्या चावण्यामुळे दगावणारे जीव वाचवले पाहिजेत आणि या अक्राळविक्राळ होत चाललेल्या समस्येचा तत्काळ निपटारा केला पाहिजे, हे नक्की!

– झटका

Back to top button