अवघे विश्वचि माझे घर! | पुढारी

अवघे विश्वचि माझे घर!

पारतंत्र्यात होतो तेव्हा स्वातंत्र्यासाठी भाषेची तलवार उपसणारे विष्णुशास्त्री चिपळूणकर म्हणाले होते की, इंग्रजी वाघिणीचे दूध पिऊन मराठी जास्त धष्टपुष्ट होईल. आता तर आपण स्वतंत्र आहोत, समृद्धही होत आहोत. अशा वेळी नव्या आत्मविश्वासाने आपण जगभरच्या इंग्रजीचे काय, सर्व वाघिणींचे दूध पिऊन, वैश्विक संस्कृतीतले उत्कट भव्य तेचि घेऊन, मिळमिळीत अवघेचि टाकून देऊन आपण अधिक समृद्ध होऊ शकतो. जगाला अधिक समृद्ध करू शकतो. कारण, अवघे ‘विश्वचि माझे घर’ हीच मराठीपणाची, मराठी भाषेची मूळ धारणा आहे.

आपण भारतीय (मराठी) म्हणून जन्माला आलो, तर मागच्या आणि पुढच्या सात जन्मांचे माहीत नाही; पण या जन्मात तरी ते मराठी-भारतीयपण आपल्याशी एकरूपच आहे आणि मागच्या-पुढच्या सात जन्मांचे सांगता येत नसले, तरी मागच्या आणि पुढच्या सात पिढ्यांचे सांगता येते. हे आता विज्ञानाने, जेनेटिक्स्ने सप्रमाण सिद्ध केले आहे की, ज्या कुटुंब-भाषा-प्रदेशात आपण जन्माला आलो त्याचे प्रभाव-परिणाम पुढच्या सात पिढ्यांमध्ये प्रकट होत राहतात. त्या पिढ्या जर मुळे उखडलेल्या, आधारहीन व्हायच्या नसतील, तर आपल्या स्वत्वाची भाषा-इतिहास-संस्कृतीची पाळेमुळे पक्की समजावून घेऊन, आपल्या स्वतंत्र बुद्धीने त्यामध्ये नवी भर घालून आपली भाषा-इतिहास-संस्कृती अधिक समृद्ध करतच विश्वाच्या एकात्म स्वत्वाकडची वाटचाल करायला हवी. आपल्या प्रादेशिकतेच्या तीव्र भानामधूनच वैश्विकतेचा अनुभव घेता येणार आहे. तसे आपण मराठी-भारतीय कुटुंबामध्ये जन्माला आलो ना, तर आता आपल्या खांद्यावर तो मराठी-भारतीय झेंडा आहेच. तो जन्मजात आहे, जन्मभर आहे. तो खाली ठेवू म्हटले तरी ठेवता येत नाही. कारण, आपले अस्तित्व हाच आपल्या संस्कृतीचा झेंडा आहे. नॉम चॉम्स्कीसारखा भाषाशास्त्रज्ञ सांगतो की, भाषेचे सर्किट आपल्या मेंदूमध्ये जन्मजातच आहे. कॉम्प्युटरच्या जमान्यात त्याला कोणी शब्द वापरेल की, आपल्या मेंदूतच भाषेचे प्रोग्रॅमिंग करणारे सॉफ्टवेअर आहे. या सर्किट किंवा प्रोग्रॅमची मोडतोड करून आपण नव्या मातीत, नव्या भाषेचे सर्किट तयार करत गेलो, तर हेही नाही अन् तेही नाही अशी ‘ना अत्र ना परत्र’ अशी स्थिती होईल. हे शास्त्रीय सत्य दुसर्‍या, तिसर्‍या, दहाव्या, पन्नासाव्या पिढीलाही लागू आहे. आपल्या मूळ भाषेचे सर्किट कायम ठेवत नव्या नव्या भाषा संस्कृतीकडून ऊर्जाग्रहण करत गेलो, तर समृद्ध, प्रतिभाशाली व्यक्तित्व घडेल.

शाळेमध्ये आपल्या मित्र-मैत्रिणींबरोबर खेळताना एखाद्या मुलामुलीला आपले आई-वडील कोण हे सांगता आले नाही, तरी शाळकरी मुलेसुद्धा अजाणतेपणाने, पण उत्स्फूर्तपणे त्या मुलामुलीला चिडवतात. मूलही घरी येऊन कावरंबावरं होऊन, असलेल्या पालकांना विचारतेच की, माझी आई कोण आहे/होती किंवा माझे वडील? आपली भाषा-इतिहास-संस्कृती हे असे आपल्या अस्तित्वाचे आई-वडील आहेत. तुझे वडील लहानपणीच गेले असं सांगून मूल वाढवता येते; पण त्या मुलात एक प्रकारचे हरवलेपण, कावरे-बावरेपण आयुष्यभर राहते, असा अनुभव आहे. पंडित जवाहरलाल नेहरू आधी जगभर भारताचे प्रतिनिधित्व करताना सुटाबुटात जायचे. त्यांना पॅरिसच्या परिषदेत कोणातरी विलायती विद्वानाने विचारले की, तुमच्या देशाला स्वत:ची काही वेशभूषा आहे की नाही? त्यानंतर मुद्दा पटल्यासारखे पंडितजी भारताचे प्रतिनिधित्व करताना कटाक्षाने सलवार-कुडता-जॅकेट परिधान करत असत. गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांनी जपानमधील विद्यापीठात भारतीय संस्कृतीच्या, अध्यात्म विचाराच्या थोरवीबाबत प्रभावी भाषण दिले. जागतिक बंधुता आणि शांतता भारतीय अध्यात्म विचाराच्या अनुकरणामुळे प्रस्थापित होईल, असे सांगितले. ते सर्व मनापासून ऐकून एका जपानी विद्यार्थ्याने नम—पणेच विचारले होते की, गुरुदेव आपले विचार थोर आहेत. आम्ही त्याने प्रभावित झालो आहोत. ज्याला आपले स्वत्व समजते तोच नवेनवे अनुभव घेत, नव्या भाषा-तंत्रज्ञान शिकत स्वत्व समृद्ध करू शकतो. कुसुमाग्रजांच्या स्वातंत्र्यदेवतेची विनवणी या फटक्यामधल्या काही ओळी आहेत-

परभाषेतही व्हा पारंगत
ज्ञानसाधना करा तरी
माय मराठी मरते इकडे
परकीचे पद चेपु नका

ते असं म्हणतात कारण, ते काही इंग्रजी किंवा अन्य कोणत्याही भाषा-संस्कृतीचे शत्रू आहेत म्हणून नव्हे, तर त्यांना हे उमगलेले आहे की,

भाषा मरता देशहि मरतो
संस्कृतीचाही दिवा विझे

आपल्या भाषा-संस्कृतीवर प्रेम करायला दुसर्‍याचा द्वेष करायची आवश्यकता नाही. द्वेष ही नकारात्मक, विघातक भावना आहे. आवश्यकता आहे आपल्या भाषेच्या, संस्कृतीच्या अभ्यासातून तयार होणार्‍या सार्थ जाणिवेची. किंबहुना स्वत्वाच्या अशा सार्थ जाणिवेतूनच आपल्याला अन्य भाषा-संस्कृती-इतिहास-धर्म यांची सुद्धा समज येते, प्रेम वाढू शकते. मराठी (भारतीय) माणूस आता जगभर जातो आहे.
आजही मराठी भाषा बोलणार्‍यांची संख्या लक्षात घेतली, तर संपूर्ण जगात मराठीचे स्थान तेराव्या क्रमांकावर येते. बारा कोटींहून जास्त लोकांची मातृभाषा मराठी आहे. म्हणजे जपानच्या लोकसंख्येएवढी! अमेरिकेतल्या शिकागो आणि कोलंबिया विद्यापीठांत कॅनडातल्या क्विन्स युनिव्हर्सिटीत आणि मॉस्कोसहित काही ठिकाणी मराठी भाषेचे स्वतंत्र विभाग आहेत. आपण पारतंत्र्यात होतो तेव्हासुद्धा स्वातंत्र्यासाठी भाषेची तलवार उपसणारे विष्णुशास्त्री चिपळूणकर म्हणाले होते की, इंग्रजी वाघिणीचे दूध पिऊन मराठी जास्त धष्टपुष्ट होईल. आता तर आपण स्वतंत्र आहोत, समृद्धही होत आहोत. आता तर नव्या आत्मविश्वासाने आपण जगभरच्या इंग्रजीचे काय, सर्व वाघिणींचे दूध पिऊन, वैश्विक संस्कृतीतले उत्कट भव्य तेचि घेऊन, मिळमिळीत अवघेचि टाकून देऊन आपण अधिक समृद्ध होऊ शकतो, जगाला अधिक समृद्ध करू शकतो. कारण, ‘अवघे विश्वचि माझे घर’ हीच मराठीपणाची मराठी भाषेची मूळ धारणा आहे.

– अविनाश धर्माधिकारी, माजी सनदी अधिकारी  

Back to top button