लवंगी मिरची : जगण्यातील थरार… | पुढारी

लवंगी मिरची : जगण्यातील थरार...

जगन : दोस्ता, आयुष्य फार कंटाळवाणे आणि बेचव वाटत आहे यार! आयुष्यात काही थरार यावा अशी फार इच्छा आहे. ट्रेकिंगला किंवा स्कीयिंगला जावे असे म्हणतो. काय करू सांग?

मगन : अजिबात कुठे लांब जाण्याची गरज नाही. तुझ्या गावाजवळच अत्यल्प खर्चात ही सुविधा उपलब्ध आहे. प्रत्येक शहराच्या बस स्थानकाजवळ पुकारा करणार्‍या आणि धाडसी स्वभावाला आमंत्रित करणार्‍या अवैध प्रवासी वाहतुकीच्या जीपमध्ये बस आणि खुशाल तीस- चाळीस रुपयांत अंगावर काटे आणणारा रोमांच अनुभव!

जगन : म्हणजे काय ते समजले नाही यार!

संबंधित बातम्या

मगन : मी काल एका शहराच्या बस स्थानकावर उतरलो आणि चवकशी केली असता गावी जाण्याची बस अजून तासभर नाहीये, असे कळाले. बाहेर आलो तो एकाने आधी आणि नंतर 4-5 जणांनी आवाज दिला, चला साहेब, बसा! क्षणभर विचार केला. देवाचे म्हणजे पांडुरंगाचे नाव घेतले आणि त्यातल्या त्यात बर्‍यापैकी कंडीक्षन असणार्‍या वडाप म्हणजे काळी-पिवळीत बसलो. आधीच चार-पाच जण विराजमान झालेले होते आणि बाकी सीटा भरण्यासाठी प्रशासनाचे जोरदार प्रयत्न सुरू होते. हे छोटेखानी प्रशासन म्हणजे स्वतः ड्रायव्हर एम.डी. आणि सीईओ किन्नर साहेब! थोड्याच वेळात समोरच्या सीटवर ड्रायव्हरसहित पाच जण स्थानापन्न झाले. मी ड्रायव्हरच्या बरोबर मागे अंग चोरून बसलो होतो. कारण, मी बसलेल्या मधील सीटवर एकूण पाच जण बसले होते. अंदाजे वय सव्वीस-सत्तावीस असणार्‍या ड्रायव्हरने जीप सुरू केली आणि सुरू झाला एक विलक्षण थरार.

जगन : अरे बाप रे! मग, पुढे काय झाले?

मगन : मला समोरचा रस्ता आणि वाहतूक, ड्रायव्हरच्या खांद्यावरून दिसत होती. भरधाव वेगाने जीप धावायला लागली. वेगाचा काटा खराब असल्यामुळे नाही, तर घाबरूनच थरथरत होता. रस्त्यात येण्याची कुणीच हिम्मत करीत नव्हते. कट मारत, हिसके देत इतर वाहनांना मागे टाकीत त्याच वेगाने जीप चाललीच होती. नाही म्हणायला फक्त एक वाहन आम्हाला ओव्हरटेक करून गेले आणि ते म्हणजे असलीच एक अवैध प्रवासी वाहतुकीची जीप होती. मी सोडून सगळे निवांत होते. ड्रायव्हरने काही एक खटखट करून टेप चालू केला. दरम्यान, समोरून येणार्‍या एका कारला कलात्मक असा कट मारून जीप त्याच वेगान पुढे धावत होती. किन्नर महोदय जे जीपच्या मागील पायरीवर उभे राहून अत्यंत नैसर्गिक वातावरणात प्रवास करीत होते त्यांनी गाडीच्या टपावर बुक्की मारून ‘डूम्म’ आवाज काढला आणि ड्रायव्हरने गाडी बाजूला न घेता जागेवरच थांबविली. कोणत्या तरी गावाची पाटी होती आणि दूरवरून 3-4 इसम हाताने थांबण्याचा इशारा करीत होते. ते धावत धावत आले आणि मग त्यांना बसविण्याची खटपट सुरू झाली. एक-दोघे कसेबसे आत शिरले. मागील भागात पण आणखी दोघे आत जाईचनात. मग, एम.डी. साहेबांनी सीईओ साहेबांना आदेश दिला, अरे, ब्यागा आन पिशव्या टाक टपावर. खाली उभे असलेले दोन तरुण मागे लटकून पायरीवर उभे राहिले आणि मग पुन्हा ‘डूम्म’ आवाज झाला आणि रथाने पुन्हा गती धारण केली.

जगन : किती माणसे कोंबतात यार ते?

मगन : पुढील एक-दोन स्टॉपवर माणसे हात दाखवीत होती; पण जागा खाली न्हाई असे अत्यंत सुहास्य वदनाने सांगून ड्रायव्हर महोदय आनंद घेत होते. एक-दोनदा करकचून ब—ेक लागला का ते माहीत नाही. गाडीने अचानक वेग घेतला आणि ती आणखी सुसाट वेगाने धावायला लागली.

– झटका 

Back to top button