मला एक समजत नाही यार, हे आपल्या पब्लिकला सोन्याचं एव्हढं काय आकर्षण आहे? म्हणजे सामान्य माणूससुद्धा दररोजच्या वर्तमानपत्रात दोनच गोष्टी पाहतो. एक म्हणजे स्वतःचं राशिभविष्य आणि दुसरे म्हणजे आजचा सोन्याचा भाव काय आहे ते. मी तर गेल्या चार-पाच वर्षांत पाच ग्रॅमसुद्धा घेऊ शकलो नाही; पण सोन्याचा भाव काय आहे हे मात्र मला अचूक माहीत असते. बरं, आज हा विषय कशासाठी काढलास?
अरे अंतराळातून सोन्याचा वर्षाव होणार आहे म्हणून बातमी आली आहे पेपरमध्ये.
काय सांगतोस काय? अरे कुठल्या भागात होणार आहे? किती वाजता होणार आहे? किती तारखेला होणार आहे?
अरे बातमी आहे; पण अंतराळात सोन्याचा वर्षाव होणार म्हटलं की, लोकांचे लोंढे येणार हे साहजिकच आहे. भारतीय माणसाला सोन्याची प्रचंड लालसा आहे. म्हणजे अगदी लाचलुचपत खात्याने धाड टाकली, तरी कॅशमध्ये पाच-पंचवीस लाख सापडतीलच शिवाय दोन-तीन किलो सोनेसुद्धा सापडेल. महिलावर्गाला तर सोनं म्हणजे जीव की प्राण! त्यांचे अर्धे आयुष्य इतर बायकांनी कोणकोणत्या प्रकारचे सोन्याचे दागिने घातले आहेत, हे पाहण्यात आणि उरलेले आयुष्य स्वतःसाठी दागिने करून खर्च करण्यात जाते. गुप्तधनाचा शोध घेणारे काही महाभाग देशाच्या प्रत्येक भागात सक्रिय असतात. ते जुना वाडा पाहत नाहीत, गढी पाहत नाहीत, जुनी भुयारे पाहत नाहीत, जिथे कुठे तथाकथित मांत्रिक गुप्तधन आहे म्हणून सांगतो तिथे गुपचूपपणे रातोरात खोदकाम करून सोन्याच्या हंड्याचा शोध घेणार्यांची संख्या प्रचंड आहे.
म्हणजे माणसाला कुठल्या ना कुठल्या रूपात सोनं पाहिजे. अरे बायकांचे जाऊदे, त्यांना दागिने नटण्यासाठी लागतात; पण असंख्य लोक ज्यांच्या जमिनी रस्ते कामात किंवा धरण वगैरे प्रकल्पांत जातात त्यांना एकरकमी पैसा मिळतो. या प्रचंड मिळालेल्या पैशातून ते पहिल्यांदा काय करत असतील, तर गळ्यामध्ये सोन्याचा एक जाडसर असा गोफ घेतात, हातामध्ये सोन्याचे कडे असते आणि दहा बोटांत मिळून सोन्याच्या बारा अंगठ्या यांच्या हातात झळकत असतात. मग, सोन्याचा मोह आहे म्हणून फक्त महिलांना दोष कसा देता येईल.
मला तर सोन्याचा काय विशेष मोह नाही बाबा आणि आपल्या आयुष्यात फार मोठ्या प्रमाणावर सोनं घ्यावे लागेल अशी शक्यता अजिबातच दिसत नाही म्हणून मग मी माझ्या मुलाचे नावच सोन्या ठेवले आहे. सोन्या इकडे ये, सोन्या तिकडे जा, सोन्या हे काम कर म्हणता म्हणता सोनं आपल्या हाताशी असल्याचा भास तरी होतो. बरं, मला एक सांग, समजा अंतराळातून खरच सोन्याचा वर्षाव झाला, तर काय होईल?
काही होणार नाही. सोनं काही ग्रॅम पडेल आणि ते गोळा करण्यासाठी झालेल्या गर्दीत चेंगराचेंगरी होऊन पाच-पन्नास जण तरी चिरडून मरतील. तिकडे कुठेतरी मध्य प्रदेशात रुद्राक्ष मोफत मिळणार होते. ते घेण्यासाठी लोक हजारो किलोमीटरचा प्रवास करून तिथे पोहोचले. एवढी प्रचंड गर्दी झाली की, चार-पाच लोक चेंगरून मेले. रुद्राक्षासाठी चेंगराचेंगरी होत असेल, तर सोन्यासाठी काय होईल, याचा विचार न केलेलाच बरा. सोनं भारतीय महिलांच्या सजण्याचा दागिना, कोणताही सोहळा असो, सोन्याचे दागिणे घातल्याशिवाय महिलेच्या सौंदर्यात भर पडत नाही. मग, त्यासाठी काही अटापिटा करावा लागला, तरी चालेल! अरे पण, आता सोन्याचे दर तर गगनाला भिडले आहेत, तरी आपल्या देशातील महिला गाठीला गाठ बांधून पैशांची जमवाजमव करून वर्षाला किमान गुंजभर तरी सोने खरेदी करणार, एवढे मात्र खरे!
– झटका