लवंगी मिरची : पुणेरी पाट्या अन् टोमणे!

लवंगी मिरची : पुणेरी पाट्या अन् टोमणे!
Published on
Updated on

'इस्रो' या संस्थेने नुकतेच काही उपग्रह अंतराळात पाठवले. या उपग्रहांमध्ये पुणेरी सॉफ्टवेअरचा वापर करण्यात आल्याची बातमी नुकतीच वृत्तपत्रात झळकली. सर्व अभियंत्यांचे हार्दिक अभिनंदन! पण, त्या त्या गावचा गुण असतो, त्या पाण्याचा गुण असतो आणि त्या मातीचा गुण असतो. या अनुषंगाने काही प्रश्न निश्चित उभे राहतात. एकाच वेळी तीन उपग्रह सोडलेले असतील, तर पुणेरी सॉफ्टवेअरचा वापर केलेला उपग्रह इतर दोन उपग्रहांना सातत्याने टोमणे मारीत राहील काय, हाही एक महत्त्वाचा प्रश्न आहे. पुणेरी माणसाचा सर्वत्र अधोरेखित केला गेलेला गुण म्हणजे कमीत कमी शब्दांत अपमान करणे. हा उपग्रह इतर उपग्रहांना पुरे झाले, जास्त उडू नकोस, माहिती आहे, जेमतेम दहा किलोचा आहेस; पण मिजास शंभर किलोसारखी करू नकोस असे टोमणे मारले जातील काय, अशी शंका वाटते.

पुण्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे दुपारी एक ते चार जेव्हा जमेल तेव्हा येथील जनता झोप काढत असते. अगदी नामांकित दुकानेही या वेळात बंद असतात. मग, हे जे सॉफ्टवेअर जेनस वन या उपग्रहात वापरले आहे ते सॉफ्टवेअरसुद्धा दुपारी एक ते चार बंद राहिले, तर उपग्रहाची कार्यप्रणाली कसे काम करणार, याचा संबंधित अभियंत्यांनी विचार केला आहे काय? शिवाय पुण्यातील नागरिक या उपग्रहावर झालेल्या पंचवीस कोटी रुपयांच्या खर्चावर प्रश्न उपस्थित करतीलच. पंचवीस कोटी रुपयांत पाच उड्डाण पूल तयार करून वाहतुकीचा प्रश्न मिटवता आला असता, विनाकारण फिजुल खर्च करण्याची काही गरज नव्हती, असे ते म्हणू शकतात. नेमके आणि काटेकोरपणे खर्च करणे आणि तोही आवश्यक तिथेच करणे हे समस्त पुणेकरांचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे पंचवीस कोटी खर्च करून उपग्रह सोडणे पुणेकरांना मानवेल असे वाटत नाही.

बरे, हा उपग्रह अंतराळात स्वतंत्र फिरताना तिथे पुणेरी पाट्या लावणार काय, याचे अद्याप कोणी उत्तर दिलेले नाही. नमुनेदार पाट्या हे पुण्याचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. 'चौदाव्याचा, गोड जेवणाचा चविष्ट स्वयंपाक ऑर्डरप्रमाणे करून मिळेल, अ‍ॅडव्हान्स बुकिंग आवश्यक' अशा पाट्या अन्य कोणा शहरांत लागल्याचे ऐकिवात नाही किंवा 'न वाजलेल्या फुसक्या फटाक्यांना वाती लावून मिळतील' ही पाटी पण फक्त पुण्यातच असू शकते.

त्यामुळे हा उपग्रह अंतराळात झेपावल्यानंतर जागोजागी 'इथे उपग्रह पार्क करू नयेत, लावल्यास पोकळ बांबूचे फटके देण्यात येतील' किंवा 'पत्ता विचारू नका, विचारल्यास अपमान केला जाईल' किंवा 'उपग्रह आहात कृपया ग्रहासारखे वागू नका' किंवा 'उपग्रहांच्या दुरुस्तीची कामे काळजीपूर्वक केली जातील' अशा विविध पाट्या अंतराळात दिसायला लागल्या, तर आश्चर्य वाटू देऊ नका. शिवाय, जी संस्था उपग्रह सोडते त्या 'इस्रो'ला पण शहाणपणा शिकवायला हे सॉफ्टवेअर कमी करणार नाही. पुणेकर कधी कोणाचे ऐकत नसतात.

पुण्यामधील प्रत्येक दुसरा व्यक्ती हा विद्वान असून प्रत्येक महिला ही विदुषी असते. त्यामुळे या सॉफ्टवेअरने पुणेकरांचे सगळे गुण घेतले, तर अंतराळातसुद्धा गोंधळ होऊ शकतो. पुणेरी सॉफ्टवेअर वापरण्यापूर्वी 'इस्रो'ने पुन्हा पुन्हा विचार केला पाहिजे हे नक्की! 'पुणे तेथे काय उणे' अशी म्हण प्रचलित आहे. पण, एखाद्याला टोमणे हा पुणेकरांचा एक विशेष गुण आहे. जेथे जातील तेथे ते आपली वेगळी छाप पाडण्यात ते पटाईत आहेत. मग, त्याला उपग्रह तर कसे अपवाद ठरतील; मात्र उपग्रह तंत्रज्ञानाने परिपूर्ण असतात. विनोदाचा भाग सोडला, तर ते नक्कीच चांगल्या प्रकारे काम करून आपले काम नक्कीच पार पाडतील, असा आम्हा भारतीयांना आत्मविश्वास आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news