गोव्याच्या चिमुकल्या प्रदेशात पश्चिम बंगालचा तृणमूल काँग्रेस राजकीय अवकाश शोधतो आहे. त्यासाठी चार-सहा महिने त्यांचे अभ्यास पथक गोव्यात ठाण मांडून आहेत. त्यांनी यापूर्वी गोव्यात राजकीय प्रयोग केला होता, तेव्हा हाताला काही लागले नाही. आता ते पुन्हा आलेत.
गोव्यात येत्या फेब्रुवारीत विधानसभेच्या चाळीस जागांसाठी निवडणुका आहेत. त्यामुळे सर्वांनीच 'अमूक-तमूक मोफत देतो' अशा घोषणांचा पाऊसच पाडला आहे. तो दक्षिणेच्या राजकारणाची आठवण करून देतो. 'श्वासही घ्यायचे कष्ट घेऊ नका, तीही व्यवस्था करतो मोफतच', एवढीच घोषणा व्हायची आता बाकी आहे. भाजपसह 'आप', महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष (मगोप), काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, युगोडेपा सत्तेच्या लढाईत गुंतलेत. या मांदियाळीत तृणमूल ने उडी मारली. त्यामुळे पाणी चांगलेच ढवळले. माजी मुख्यमंत्री, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते लुईझिन फालेरो काँग्रेस सोडून तृणमूलवासी झाले. त्यामुळे 'आप'क्रियावादी आणि अन्य पक्ष प्रतिक्रियावादी असे चित्र थोडसे हलले. चर्चेच्या केंद्रस्थानी तृणमूलही आला.
तृणमूलचा गाजावाजा होण्यापूर्वी भाजपच्या पराभवासाठी सर्व विरोधक एकत्रित लढू, भाजपविरोधी मत विभागणी टाळू असे गोवा फॉरवर्ड, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आदींना वाटत होते. त्यासाठी काँग्रेसने युती करावी, असा त्यांचा वारंवार आग्रह होता. काँग्रेस मात्र लाथाळ्यांमध्ये मदमस्त. त्यांचा 'पीळ जळत नाही' हा अनुभव देशभर येतोच आहे. 'सर्व चाळीसही जागा स्वबळावरच,'असाच त्यांचा हेका. '2017 मध्ये सर्वाधिक 17 जागा जिंकूनही सरकार स्थापन केले नाही. 'आम्ही अशा चुका पुन्हा करणार नाही, जनतेने आम्हाला माफ करावे', यासारखी आर्जवे काँग्रेसचे गोवा निवडणूक निरीक्षक पी. चिदम्बरम, गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव आता करत आहेत.
2022 साठी निवडणूकपूर्व युतीबाबत मात्र त्यांची नकारघंटाच होती. तिला तडाखा दिला तो तृणमूलच्या प्रवेशाने. झाले, यू टर्न घेत युतीसाठी काँग्रेस तयार आहे, असे जाहीर केले. त्यावेळी त्यांचेच ज्येष्ठ नेते लुईझिन कोलकोता येथे ममता दिदींचा पाहुणचार झोडत होते. अंतर्गत पेचप्रसंगावर भलत्याच वेळेत म्हणजेच साडेचार वर्षांत तोडगा न काढल्याचाही हा एक परिपाक.
गोव्यात पन्नास-साठ ते दीडशे-दोनशे मतांनी उमेदवाराचा जय-पराजय ठरू शकतो. याला इतिहास साक्ष आहे. प्रत्येक मतदारसंघ आहे, सुमारे पंचवीस हजार मतांचा. असे असले तरी क्षेत्रफळ आणि मतदारसंख्येवरून जनमानस समजणे गुंतागुंतीचेच. महाकठीण. दुसरीकडे नेत्यांबाबतही तेच. कोण, कोठे, कोणाबरोबर आणि का असेल, याचा काही भरवसा नाही. याला साक्ष नेत्यांच्या राजकीय इतिहासातील माकडउड्या. जी गोव्याची राजकीय प्रकृती होऊन मोठा काळ लोटला. 'मेरी कोई नीती नही, यही मेरी नीती है' हीच राजकीय नाट्याची वनलाईन. ती समजून घेण्यासाठी तृणमूल आणि 'आप' धडपडत आहेत.
दोघांच्याही राजकारणाच्या पद्धतीत साम्यस्थळे मात्र सापडतात. पंचवीस टक्के ख्रिश्चन लोकसंख्येला चुचकारण्याचे तृणमूलचे प्रयत्न स्पष्ट आहेत. त्यासाठी 'मोदीविरोधी ममता' या सूत्राचा वापरही ते करतात. गोव्यातील चर्च संस्थेशी तृणमूलतर्फे सल्लामसलत होते. त्यांचे नियोजन 'रणनीतीकारांचे' आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर सक्षम, एकसंध विरोधकच नसणे, ही भाजपसाठी कमालीची जमेची बाजू. रानोमाळ विखुरलेले विरोधक आणि एकसंध भाजप असे सध्याचे चित्र. भाजपविरोधी मतांच्या विभागणीचा फैसला ठरेल तो विरोधकांच्या संभाव्य युतीच्या चेहर्यावर. विरोधक पश्चिम बंगालच्या निवडणुकीपासून काही धडा घेणार का, हा प्रश्नही तूर्त तरी अनुत्तरीतच. मग, सध्याचे भरतवाक्य काय? तर, 'मतविभागणीमुळे भाजपच्या गोटात खुशी आणि तृणमूलने काँग्रेसला आणले ताळ्यावर!'