लवंगी मिरची : बिब्बा घालणारा व्हिलन! | पुढारी

लवंगी मिरची : बिब्बा घालणारा व्हिलन!

जगन : तो ‘वेड’ पिक्चर पाहिलास का रे मदन? त्यातलं ते ‘वेड लागलंय’ गाणं खूप गाजत आहे.

मगन : खरं सांगतो यार तुला, मी आजकाल चित्रपट पाहणे सोडून दिलेले आहे. बिनाव्हिलन म्हणजे खलनायक नसलेला पिक्चर मी पाहूच शकत नाही. पिक्चर म्हणजे हिरो पाहिजे, व्हिलन पाहिजे आणि शेवटी तुफान मारामारी होऊन व्हिलनचा खात्मा झाला पाहिजे.

जगन : अद्भूत चित्रपट आणि त्यात अफाट व्हिलन असायचे पूर्वीच्या काळी, अशात ती मजा राहिली नाही. व्हिलन हा गरीब असो की श्रीमंत; पण अजिबात न शिकलेला असायचा. ज्याला मोठेपणी स्मगलर, डाकू किंवा टोळीचा दादा व्हायचे आहे त्याने शाळेत जायचेच कशाला, अशी काहीशी त्यांच्या पालकांची भूमिका असणार बहुदा.

संबंधित बातम्या

मगन : हो ना यार! कोणीही व्हिलन हा कधीही चिकण्या-चोपड्या चेहर्‍याचा नसायचा. त्याची पडद्यावर एन्ट्री झाली की, पाहताच कळायचे की, हा व्हिलनच आहे म्हणून. बाकी पात्र परिचय चित्रपटाच्या कथेच्या ओघात होत असे. शक्ती कपूर, रणजित, प्रेम चोप्रा हे नामांकित व्हिलन पडद्यावर दिसले की, प्रेक्षकांमधील बाया-बापड्यासुद्धा आपले पदर सावरून घेत असत. त्यांचा लौकिक किंवा सोप्या मराठीत सांगायचे, तर रेपुटेशनच तसे होते त्यांचे. सर्वसाधारण प्रत्येक चित्रपटात व्हिलनचे काम सारखेच असायचे. हिरो आणि हिरोईनचे सूत जुळले की, त्यात बिब्बा घालणे आणि हिरोच्या जीवावर उठणे या दोन घटनादत्त जबाबदार्‍या व्हिलनवर असायच्या आणि प्रत्येक सुजाण भारतीय नागरिकाप्रमाणे तो या जबाबदार्‍या लिलया पार पाडायचा.

जगन : शिवाय गरीब हिरोची कॉलेजला जाणारी धाकटी बहीण असेल आणि दोन वह्या हातात घेऊन ती जर विधवा आईला, ‘मां, मैं कॉलेज जा रही हूं, तुम दवाकी गोलीयां वक्तपे खा लेना’ असे म्हणून घराबाहेर पडत असेल, तर पुढची सगळी गोष्टी करून जायची. तिला बाहेर पडताना व्हिलनने पाहिले, तर पुढे नेमके काय करायचे आहे, याचे त्याचे नियोजन सुरू होत असे. घरात किंवात गावात डाके टाकणे आणि आया-बहिणींच्या अब्रूवर डाका टाकणे यात आपल्या काळचे व्हिलन लोक पारंगत असायचे.

मगन : व्हिलन हे कधीच एकांडे शिलेदार नसायचे. त्यांची भलीमोठी टोळी असायची. हे चित्रपट त्या काळाचा आरसा आहेत, असे मानले, तर व्हिलन हा बेरोजगारीशी लढा देणारा हिरोच म्हणावा लागेल. त्याच्यासाठी जान कुर्बान करणार्‍या निष्ठावंत अशा कार्यकर्त्यांची टोळीच असायची त्याच्यासोबत. त्यात पुन्हा डाकूपट असेल, तर क्रूर चेहर्‍याच्या लोकांची घाऊक भरतीच होत असावी. काही डाकूपट असे असायचे की, वाटायचे या सगळ्या डाकूंनी वर्गणी, सोप्या मराठी भाषेत कोंट्री करूनच पिक्चर काढलाय की काय?

मगन : म्हणजे दहा मिनिटांचा एखादा प्रसंग झाला की, धाड धाड करीत डाकूंची टोळी घोड्यांवरून येणार आणि लूटमार करून पहाडी के पिछे, घने जंगलोंमे श्रम परिहार करण्यासाठी निघून जाणार हे ठरलेले असायचे. डाकूंच्या टोळीत फक्त दोन पोस्ट असायच्या, एक म्हणजे मुख्य सरदार आणि दुसरी म्हणजे त्याच्या विश्वासातील उपमुख्य सरदार. उप हे पद ही हिंदी चित्रपटसृष्टीने आपल्या राजकारणाला दिलेली देण आहे का, यावर संशोधन झाले पाहिजे.

जगन : एक प्रेक्षक म्हणून मला नेहमी डाकूंचा हेवा वाटायचा. कोणतेही शिक्षण न घेता, श्रम न करता,व्यवसाय अथवा व्यायाम न करता एव्हढेच काय; पण महिनोमहिने आंघोळ व ब—श न करतासुद्धा मजेत आयुष्य जात असेल, तर कुणाला आवडणार नाही? डाकूपटातील डाकू हीच पाहण्याची बाब असे.

Back to top button