विनाशकारी संकट | पुढारी

विनाशकारी संकट

विनाशकारी भूकंपाने तुर्किये आणि सीरियामध्ये प्रचंड प्रमाणावर जीवित, वित्तहानी झाली. सोमवारी 7.8, 7.6 आणि 6 रिश्टर स्केल, असे तीन मोठे भूकंप झाले. दुसर्‍या दिवशी आणखी एक मोठा धक्का बसला. या धक्क्यांनी दोन्ही देशांना नुसते हादरवलेच नाही; तर पुरते उद्ध्वस्त करून टाकले. छोट्या-मोठ्या 120 हून अधिक धक्क्यांनी या देशातील नागरिकांच्या जीवाचा अक्षरश: थरकाप उडाला. हजारो लोकांचे बळी गेले, गावेच्या गावे ढिगार्‍याखाली गाडली गेली. प्रारंभीच्या काळात दोन हजारांच्या घरात असलेला मृतांचा आकडा सतत वाढतच चालला असून, त्याचा निश्चित अंदाज येण्यासाठी तीन-चार दिवस जावे लागतील. तो किती तरी पटीने अधिक असू शकतो.

आताचा भूकंप हा या देशाच्या इतिहासातील दुसरा मोठा भूकंप. यापूर्वी 1939 मध्ये आलेल्या भूकंपाने 32 हजार लोकांचे बळी घेतले होते. नैसर्गिक आपत्ती अनेक प्रकारच्या असल्या, तरी भूकंपामुळे होणार्‍या हानीची तीव्रता आणि त्यानंतरची आव्हाने खूप मोठी असतात. भूकंपामुळे मुळातूनच सगळे जनजीवन उखडले जाते.

ढिगारे उपसण्याचे काम अनेक दिवस करावे लागते आणि त्याखाली गाडलेल्या लोकांचे मृतदेह तोपर्यंत सापडत राहतात. या काळात मानवी जीवनाची जी वाताहत होते, ढिगार्‍याखाली गाडल्या गेलेल्या लोकांचा शोध घेण्यासाठी आप्तांची जी तडफड सुरू असते, ती हृदय पिळवटून टाकणारी असते. उघड्यावरच्या लोकांचे तात्पुरते पुनर्वसन आणि उद्ध्वस्त झालेल्या घरांचे पुनर्निर्माण यामध्ये बराच कालावधी जात असतो. आज अशा प्रतिकूल परिस्थितीत आणि गोठवणार्‍या थंडीत तेथे नागरिकांचा जीवाचा आकांत सुरू आहे. मदतीची याचना होते आहे. हा तुर्किये किंवा तुर्कस्तान काय, शेजारचा सीरिया या दोन्ही देशांचा मोठा भाग उद्ध्वस्त झाला. आपल्याकडे किल्लारीचा, गुजरात किंवा नेपाळमधील भूकंपाच्या निमित्ताने हा विध्वंस सर्वांनी जवळून अनुभवला होता.

पृथ्वीच्या उदरात सातत्याने उलथापालथी सुरू असतात, त्यातूनच भूकंपाचे धक्के बसतात. 2.5 रिश्टर स्केलपर्यंतचे धक्के अनेकदा जाणवत नाहीत. पाच रिश्टर स्केलपुढचे धक्के जाणवत असले, तरी त्यामुळे होणारे नुकसान किरकोळ स्वरूपाचे असते. तुर्कियेमध्ये आलेल्या भूकंपाची तीव्रता 7.8 रिश्टर स्केल होती आणि एवढ्या तीव्रतेचा धक्का विनाशकारी ठरत असतो. 8 रिश्टर स्केलच्या वरचे धक्के मात्र महाभयंकर ठरतात. जपानमध्ये 2011 साली आलेल्या भूकंपाची तीव्रता 9 रिश्टर स्केल होती, त्यामुळे जपानमध्ये मोठा विध्वंस झाला. त्यावेळी आलेल्या सुनामीने जगाच्या अनेक भागांत हाहाकार उडवला. आताचे धक्के तुर्कियेमध्ये बसले असले, तरी त्याचा फटका शेजारच्या सीरियालाही मोठ्या प्रमाणावर बसला. गेल्या दहा वर्षांपासून अधिक काळ सीरिया गृहयुद्धाने त्रस्त असून, त्यात पाच लाखांहून अधिक लोकांचे बळी गेले आहेत. देशाच्या निम्म्या लोकसंख्येला आपले घर सोडून तुर्कियेमध्ये शरणागती पत्करावी लागली. लाखो लोक विस्थापित झाले. प्रारंभीच्या काळात सीरियाच्या यातनांची जगभरात चर्चा होत होती.

आजही तेथील परिस्थितीत फारसा फरक पडलेला नाही; परंतु ‘रोज मरे त्याला कोण रडे’ या उक्तीनुसार जगाची सीरियाच्या दुःखाकडे पाहण्याची नजर बोथट झाली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या म्हणण्यानुसार, तेथे सव्वा कोटी लोकांना अद्याप मदतीची आवश्यकता आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे युक्रेनमधील विस्थापितांचा विषय जगाच्या रंगमंचावर ठळकपणे दिसत असला, तरी सीरियामधील प्रश्नांची तीव्रता त्याहून किंचितही कमी नाही. आजही सीरिया जगभरातील सर्वाधिक विस्थापितांचा देश आहे. इथले 68 लाख लोक शरणार्थी बनले आहेत; तर 62 लाख लोक देशातच विस्थापिताचे जीणे जगत आहेत. एक अख्खी पिढी विस्थापनातच जन्मली आणि विस्थापनातच वाढत आहे. सीरिया हे जगाच्या विस्मरणात गेलेले एक मोठे संकट मानले जाऊ लागले आहे. तिथे आजही लाखो लोक जगण्यासाठी संघर्ष करतात. आर्थिक संकट थांबण्याचे नाव घेत नाही. खाद्यपदार्थ, इंधनाच्या किमती आकाशाला भिडत आहेत आणि त्याचा परिणाम पाणीपुरवठा, स्वच्छता आदी बाबींवरही होत आहे. अशा संकटाने ग्रासलेल्या सीरियावर भूकंपामुळे मोठे संकट कोसळले.

विस्थापितांवर विस्थापित होण्याची वेळ आली आहे. संकटाच्या काळात अनेक संकटांची मालिका निर्माण होत असते. तुर्कियेच्या सीमेवर राजो येथे तुरुंगात दोन हजार कैदी असून, त्यापैकी 1,300 ‘इसिस’चे दहशतवादी आहेत. भूकंपामुळे या तुरुंगाच्या भिंती कोसळल्यानंतर कैद्यांनी गोंधळ माजवला, त्यात वीस दहशतवादी फरारी झाले. भूकंपाने तुर्किये, सीरियामध्ये मोठे संकट निर्माण झाले असून, या संकटाच्या काळात जगाला मदतीची हाक देण्यात आली आहे. जगभरात शत्रू-मित्र राष्ट्रांचे राजकारण सातत्याने सुरू असले, तरी अशा आपत्तीच्या काळात ते बाजूला ठेवून मानवतेच्या भूमिकेतून मदतीसाठी धावून जाण्याची परंपरा आहे. भारतानेही अशा आपत्तीच्या काळात जगाच्या कानाकोपर्‍यात कुठेही धावून जाण्यातून आपल्या मानवतेच्या भूमिकेचे दर्शन घडवले आहे.

आतासुद्धा भारत मदतीसाठी धावून गेला असून, बचावकार्यासाठी सरकारने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) तुकड्या तुर्कियेमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला आणि सोमवारी रात्री त्या तुर्कियेसाठी रवानाही झाल्या. अशा आपत्तीच्या वेळी शेजारच्या गावापासून ते जगाच्या कानाकोपर्‍यातल्या अनोळखी गावांपर्यंतच्या लोकांकडून मदतीचा ओघ येत असतो. परस्परांच्या द्वेषाने, जाती-धर्मातील विद्वेषाने दुभंगलेल्या समाजाला अशा नैसर्गिक आपत्ती धडा शिकवत असतात आणि द्वेषाच्या भिंती पाडून एकत्र येण्यास भाग पाडतात. अर्थात, मानवी प्रवृत्ती त्यातून बोध घेतातच असे नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या नैसर्गिक आपत्ती आणि जीवितहानीबद्दल दु:ख व्यक्त करताना तेथील जनतेच्या पाठीशी देश उभा असल्याचे म्हटले आहे. पाठोपाठ तातडीची मदतही पाठवली. हे संकट तुर्किये किंवा सीरियावरील नाही, ते अखिल मानवतेवरील आहे. या स्थितीत मदतीसाठी धावून जाणे हा खरा धर्म. जगभरातील देशांच्या सहकार्यातूनच त्यांना पुन्हा उभे राहण्याचे बळ मिळू शकेल.

Back to top button