लवंगी मिरची : कुटुंबातही रोबो!

लवंगी मिरची : कुटुंबातही रोबो!
Published on
Updated on

पत्नी : अहो, ऐकलत का? अंध व्यक्तींना मार्गदर्शन करण्यासाठी रशियातील शास्त्रज्ञांनी एक रोबोटिक कुत्रा तयार केला आहे म्हणे! हा रोबोटिक कुत्रा रस्ता ओलांडणे, फोन पे, जीपे स्कॅन करणे, पेमेंट करणे, फिरायला नेणे, सुरक्षित घरी परत घेऊन येणे इत्यादी सर्व कामे करणार आहे म्हणे! किती छान नाही? शिवाय त्याला खाऊपिऊ घालण्याची भानगड पण नाही.
पती : हो, शिवाय तो येता-जाता कोणावर भुंकणार पण नाही आणि अंगावर धावून पण जाणार नाही. म्हणजे जे काय काम असेल, तर ते करून घेण्यासाठी मालकाला रिमोटवरील बटन फक्त दाबावे लागेल.
पत्नी : मी काय म्हणते, रशियात तुमच्या कोणी ओळखीचे आहेत का बघा ना?
पती: वेड लागले की काय तुला? इथे सांगोल्यापलीकडे मला कोणी ओळखत नाही आणि तू रशियाच्या गोष्टी करत आहेस? काय काम होतं तुझं रशियात?
पत्नी : अहो, काही नाही आपल्या घरी कामाला येते ना ती कामवाली, फार त्रास देत आहे. एक तर काम धड करत नाही. शिवाय महिन्याला तीन-चार वेळा दांड्या मारते, म्हणजे फरार होते. पाहुणे आले असतील, तर चक्क मी येऊ शकत नाही म्हणून फोन करते. तिचे नखरे सहन करून वैतागले आहे मी. त्यापेक्षा धुणी, भांडी, लादी पुसणे, साफसफाई यासाठी एक रोबो तुम्ही मागवलात, तर सगळे प्रश्नच मिटतील. चार्जिंग करायचे आणि आदेश द्यायचा त्याप्रमाणे तो कामे करणार. काय येईल ते लाईट बिल पण भरूयात ना आपण!
पती : काय बोलतेस काय? सगळं आयुष्य यंत्रमय करून टाकायचे की काय? उद्या तू म्हणशील, माझी आई म्हणजे तुझ्या सासुबाई यांच्या ऐवजी एक रोबोटिक सासुबाई आणून द्या म्हणून! म्हणजे सासू-सुनांचा भांडणाचा विषय मिटून जाईल. मानवी भावभावना जर अस्तित्वात नाही राहिल्या, तर जगणे अत्यंत कृत्रिम आणि यंत्रवत होईल.
पत्नी : यंत्रामुळे सुख मिळतेच ना! आता हेच बघा ना, वॉशिंग मशिन घेण्याआधी माझ्या हाताचे तळवे घासून जायचे तुमच्या सगळ्यांचे कपडे बडवता बडवता. आता काही नाही. कपडे मशिनमध्ये टाकले, साबण, पावडर टाकली, बटन दाबले की, तासाभरात धुऊन वाळून तयार होतात.
पती : प्रत्येक ठिकाणी यंत्र म्हटल्यानंतर उद्या तरुण पोरी रोबोसोबतच लग्न करायचं म्हणून हट्ट धरतील. एक तर आजकाल घटस्फोटांचे प्रमाण वाढल्यामुळे लग्न टिकेल की नाही याची खात्री नाही. त्यामुळे रोबोशी लग्न केले की सोप!
पत्नी : हो खरच ना! किती मजा असेल नाही रोबो नवरा मिळाला तर? नवरा नाही म्हणजे नवर्‍याकडचे नातेवाईक नाहीत. मुख्य म्हणजे सासुबाई नाहीत. दीर, जावा नाहीत. नाते नाहीत म्हणजे कटकटी नाहीत. जी काय असतील ती फक्त माझ्या माहेरची माणसं. माझी आई, माझे बाबा, माझे भाऊ, माझ्या भावाजया, सगळे माझे कौतुक करणारे.
पती : शहाणीच आहेस.असेच रोबो तुझ्या माहेरच्या घरात होणार नाहीत का?
पत्नी : पण काही म्हणा, नवरा म्हणेल ते ऐकतो याचं काही वेगळंच सुख असतं बायकांना. माझं मेलीचं नशीबच फुटकं. तुमच्या ऐवजी एखादा रोबो असता, तर किमान ऐकण्यात तरी राहिला असता.
पती : पाया पडतो तुझ्या. तुझ्या धाकामुळे मी जवळपास रोबो झालेलोच आहे. सांग आज संध्याकाळी काय करायचे आहे? तुला फिरायला न्यायचे आहे की स्वयंपाक करायचा आहे? नाहीतरी माझ्या बुद्धीवर ताबा मिळवून माझा रोबो केलाच आहेस तू.
पत्नी : मग घरची कामे पुरुषांनी करायला नको काय? महिलांनीच घरची कामे करण्याचा मक्ता घेतलाय काय?

– झटका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news