खरी लढाई निवडणूक आखाड्यातच

पाच आमदारांवरून दोन आमदारांवर, तसेच दोन खासदारांवरून शून्य खासदारांवर घसरलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसला ईडीच्या कारवाईने हादरा बसला आहे. कारवाईतून काय निष्पन्न होणार, हे येणार्या काळात स्पष्ट होईल; मात्र त्यावरून जिल्ह्यात राजकीय लढाया सुरू झाल्या आहेत. आरोप-प्रत्यारोपांची मालिका रंगली आहे. खरी लढाई आहे ती निवडणुकीच्या आखाड्यातच आहे.
1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली. त्यापूर्वी शरद पवार यांनी कोल्हापुरात येऊन निष्ठावंतांची बैठक घेतली. स्वतंत्र पक्ष स्थापन केल्यास आपल्या हाताला नेमके कोण लागेल, याचा आढावा घेतला. अनेक मातब्बरांनी काँग्रेसचा त्याग केला. स्थापनेच्या वर्षात राष्ट्रवादीला जिल्ह्यात चांगले यश मिळाले. पाच आमदार आणि दोन खासदार असा भरभक्कम पाठिंबा मिळाला. अंतर्गत कलह, नेत्यांतील गटबाजी यामुळे पक्ष पोखरला गेला. आता केवळ दोन आमदार आहेत. त्यांचेही एकमेकांशी पटत नाही, अशी स्थिती आहे. त्यांचे जर पटत असते, तर विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांना चंदगडला येऊन राष्ट्रवादीचे आमदार राजेश पाटील यांच्यासमवेत बैठक घेण्याची वेळच आली नसती. विधानसभेचे अध्यक्ष राहिलेले बाबासाहेब कुपेकर यांच्या कुटुंबीयांनी केलेल्या तक्रारींची दखल घेऊन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना त्यांची नाराजी दूर करण्यासाठी यावे लागले होते. हे राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील वास्तव आहे.
गोकुळ आणि केडीसीसी या बलाढ्य आर्थिक संस्थांवर मित्र पक्षांच्या मदतीने राष्ट्रवादीने झेंडा फडकविला. हसन मुश्रीफ यांची केडीसीसी बँकेवर एकहाती सत्ता आली. अनेक नाराजांना मागे टाकून त्यांनी सत्तेवरील आपली पकड कायम ठेवली आहे; मात्र ईडीच्या कारवाईने राष्ट्रवादीला हादरा दिला आहे. या कारवाईतून पुढे काय येणार, हे स्पष्ट होईलच. बँकेचा कारभार उत्तम असल्याचा निर्वाळा मुश्रीफ यांनी दिला आहे; मात्र ईडीने याबाबत अद्याप काहीही स्पष्ट केलेले नाही. ते स्पष्ट होईल तेव्हा जिल्हा बँकेच्या कारभारावर प्रकाश पडेल. तोवर या धक्क्यातून सावरण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांना बर्याच गोष्टींना सामोरे जावे लागणार आहे.
जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या निवडणुकांचे वातावरण आहे. कुंभी-कासारी सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या माध्यमातून वेगळेच राजकारण आकाराला येत आहे. आमदार पी. एन. पाटील व गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण नरके हे पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा मित्रही नसतो आणि शत्रूही नसतो, हे पाटील-नरके युतीवरून स्पष्ट झाले आहे. सुरुवातीला हे दोघे एकत्र होते. नंतर पाटील यांच्या विरोधात नरके यांनी आपले पुतणे चंद्रदीप यांना बळ दिले. ‘कुंभी-कासारी’चे अध्यक्ष असलेले चंद्रदीप नरके आमदार झाले; मात्र आता काका विरुद्ध पुतण्या असा संघर्ष जिल्हा पाहणार आहे. पाटील – नरके युती पुढच्या सर्व निवडणुकीसाठी एकत्र असणार आहे.
लोकसभेसाठी चेतन नरके तयारी करत आहेत, तर हसन मुश्रीफ यांनी व्ही. बी. पाटील यांचे नाव रिंगणात आणले आहे. लोकसभेसाठी जोर-बैठका सुरू झाल्या आहेत. आता महाडिक गट भाजपमध्ये आहे. ते पाटील – नरके गटाबाबत कोणती भूमिका घेणार, यावर जिल्ह्यातील राजकारणाची पुढील दिशा ठरणार आहे. यापूर्वी मुश्रीफ यांच्या निवासस्थानी आयकर खात्याने छापा टाकला तेव्हा त्यांनी समरजित घाटगे यांना नाव न घेता त्यांना या वादात ओढले होते, तर घाटगे यांनी पलटवार करताना आता जाती-धर्माचा आधार का घेता, अशी टीका केली होती. आरोप-प्रत्यारोपांची मालिका चांगलीच रंगली. आता राजकीय आखाड्यात ईडीच्या छाप्यानंतर जाणवत असलेली शांतता काही काळापुरती आहे. या शांततेत अंतर्गत खदखद खूप आहे. ही निरनिराळ्या माध्यमातून बाहेर पडेल तेव्हा त्याचे स्वरूप स्पष्ट होईल.
चंद्रशेखर माताडे
कोल्हापूर वार्तापत्र