लवंगी मिरची : नमस्कार! निर्मला काकू

तात्या : बबन, तुझ्या मोबाईलमध्ये काय काय आहे ते सांग. तात्या, काय नाही ते विचार. रील आहेत, फेसबुक आहे, व्हॉटस्अॅप आहे, इंस्टाग्राम आहे, ट्विटर आहे. तुम्हाला काय पाहिजे ते सांगा.
तात्या : मला काही नाही पाहिजे. एक मेल पाठवायचा आहे. मेल पाठवायची सोय आहे का तुझ्या मोबाईलमध्ये? हो आहे. कुणाला पाठवायचाय मेल?
तात्या : आपल्या देशाच्या अर्थमंत्री आहेत ना निर्मलाकाकी, त्यांना पाठवायचा आहे. सांगा.
तात्या : लिही, लहान तोंडी मोठा घास घेतो आहे म्हणावं. पण देशासाठी जीव तुटतो म्हणून लिहीत आहे. आता दोन-तीन दिवसांत तुम्ही अर्थसंकल्प मांडणार तेव्हा विचार केला की, तुम्हाला चार गोष्टी सांगाव्यात. त्यांना म्हणावं, सगळ्यात प्रथम म्हणजे आपला देश कृषिप्रधान आहे हे विसरू नका. मला कवा कवा वाटते, देश कुणाचा आहे ते समजत नाही? तुम्ही आल्यापासून घोटाळे मात्र बंद झालेत. नाहीतर शेकडो, हजारो कोटींच्या घोटाळ्याने बजेटचं काही खरं नसायचं. ‘आले वारे, गेले वारे’ तसा ‘आला पैसा, गेला पैसा’ अशी परिस्थिती होती. पण आता सगळं ठीकठाक आहे. बजेट जरूर मांडा, सगळ्यांची काळजी घ्या. पण नंबर एकला शेतकरी ठेवा. शेतकरी सुखी तर देश सुखी हे विसरू नका, म्हणून सांगतो. सगळ्या जगात मंदीची लाट आली होती तेव्हा पण आपल्या शेतकर्यांनीच आपल्याला वाचवलं होतं. तात्या, आपल्या शेतमालाचे भाव फार खालीवर होतात. त्याच्याविषयी लिहायचं का काही?
तात्या : लिही. म्हणावं प्रश्न जुनेच आहेत, तुम्ही प्रयत्न पण केला. पण काहीतरी करून शेतकर्याचा माल ग्राहकाच्या दारात कसा जाईल याचा विचार करा. निर्यात धोरण असे ठरवा की, बारा महिने शेतकर्याला भाव मिळाला पाहिजे. आता कांद्याचे बघा ना! कधी पाच रुपये किलोने येतो मार्केटमध्ये; तर कधी शंभर रुपये किलोने जातो. पिकवणार्याला कळत नाही की आपण काय पिकवायचे ते. दुसरं अजून एक लिही. म्हणावं, कोरडवाहू शेतकर्यांची परिस्थिती वाईट आहे. निव्वळ निसर्गाच्या लहरीवर कारभार चालतो त्यांचा. काहीतरी तरतूद बजेटमध्ये करा म्हणजे कसं, प्रत्येक शेतात पाणी खेळलं पाहिजे. पाणी खेळलं की, पिकं टरारून वर येतात आणि शेतकरी खूश राहतो. मेकअप करणारे, तंबाखू खाणारे, सिगारेटी फुकणारे, दारू पिणारे यांच्यावर जबर टॅक्स लावा आणि त्यांच्या टॅक्समधून आलेला पैसा सिंचनासाठी वापरा म्हणजे आपला अर्थव्यवस्थेचा मूळ कणा शेतकरी मजबूत होत राहील. शिवाय हे व्यसन करणारे लोक पण आटोक्यात राहतील. म्हणजे फायदा दोघांचा होईल. अजून काय लिहायचं?
तात्या : लिही, म्हणावं असं काहीतरी करा की, आपण जगामध्ये अमेरिकेनंतरची दोन नंबरची अर्थव्यवस्था व्हायला पाहिजे. आधी त्या चीनला मागे टाका. पाकिस्तान तर भिकेला लागलेलेच आहे. बारीक डोळ्याच्या चिन्यांची एकदा आर्थिक गठडी बांधली तर तो आपल्या देशाच्या सीमेवर चुळबुळ करणार नाही. ज्याच्याकडे पैसा जास्त, त्याची जगात ताकद असते. आपली ताकद वाढलेली आहे. आता एकदा अर्थव्यवस्था अजून मजबूत करा आणि मग वाजवा डंका भारताचा संपूर्ण जगात.
आपल्या देशातून हुशार लोक दुसर्या देशात चाललेत. असं काही बजेट करा की, येत्या पाच वर्षांत दुसर्या देशातल्या लोकांना आणि त्यात हुशार लोकांना आपल्या देशात यावं वाटलं पाहिजे. आपल्या देशाचा व्हिसा मिळण्यासाठी रांगा लागल्या पाहिजेत. पण एक लक्षात ठेवा. अर्थव्यवस्था मजबूत करायची तर शेतकरी मजबूत करावा लागेल. बबन, झाला असेल तर दे पाठवून मेल. सीसीमध्ये मोठ्या साहेबाला म्हणजे पीएमना ठेव. आपला राम राम सांग त्यांना. खाली माझं नाव लिही, तात्या शिर्शी बुद्रुककर. कर क्लिक आणि दे पाठवून. काही उत्तर आलं तर मला सांग. येतो मी.
– झटका