क्रांतिवीरांगना : हौसाताई पाटील | पुढारी

क्रांतिवीरांगना : हौसाताई पाटील

विजय जाधव

क्रांतिवीरांगना हौसाताई पाटील यांच्या निधनाने स्वातंत्र्यलढ्याचा जिवंत दुवा जसा निखळला, तसेच देशाच्या विशेषत: महाराष्ट्राच्या जडणघडणीचा, सामाजिक बदलांचा, लोकशाही स्वातंत्र्याचा, त्या स्वातंत्र्याच्या आजच्या प्रागतिक टप्प्याचा साक्षीदारही हरपला. देशाचा भूतकाळ आणि वर्तमानाचा दुवा सांधणारी सक्रिय, जाणती माणसे आता दुर्मीळ झाली आहेत. त्यातही हौसाताई यांचे नाव ठळकपणे समोर येते. इतिहासातील स्वातंत्र्यलढ्याचा सारा रोमांच आणि धगधगता काळ डोळ्यांसमोर तरळून जावा, असा हा दुवा. त्या प्रत्येक प्रसंग आणि घटनेला थेट जोडणार्‍या हौसाक्‍कांनी अखेरचा निरोप घेतला. आज नवेपणाचे वेध लागलेल्या आणि आभासी जगाच्या आवरणात वावरणार्‍या पिढीकडून यावर काही प्रतिक्रिया येणे अपेक्षितही नसते. त्यामुळे या विदुषीच्या जाण्याची फारशी चर्चा झाली नाही, की त्याची घेतली जायला हवी तितकी दखलही घेतली गेली नाही. त्या हयात असताना नाही आणि त्या निवर्तल्याचीही नाही.

ब्रिटिशांच्या जुलमी आणि पोलादी राजवटीविरोधात सशस्त्र क्रांतीचा नारा देत धडका देणार्‍या आणि ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडणार्‍या, त्यांना हद्दपार करूनच थांबणार्‍या क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या हौसाताई कन्या. सरकारी नोकरी सोडून क्रांतिलढ्यात उतरलेल्या आणि ब्रिटिशांना कापरे भरवणार्‍या आपल्या बापाचे बोट हाती धरून ही क्रांतिकन्या मोठी झाली. वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षीच आईचे निधन आणि पुढे क्रांतिसिंहांनीच तिला वाढवले. ही लाडकी लेक स्वातंत्र्यलढ्यास आणि स्वातंत्र्योत्तर सामाजिक लढ्यांसाठी, देशासाठी अर्पण केली. वरकरणी सरळ वाटणारी ही घटना खोलात जाऊन विचार केल्यास मोठी चमत्कृत आणि कल्पनातीत वाटावी अशी. परकी सत्तेला आव्हान देत क्रांतिसिंहांनी उभारलेले प्रतिसरकार, सातारा-सांगलीच्या हजार-बाराशे गावांत धगधगत ठेवलेला लढ्याचा क्रांतिकुंड, घरावर ब्रिटिश पोलिसांचा सतत खडा पहारा, कार्यकर्त्यांची धरपकड, घराची जप्ती आणि त्यांनी उभारलेल्या तुफानी सेनेने दिलेले हादरे, असे ध्येयाने भारलेले क्रांतिकार्य. हा लढा आणि त्याचे नेते क्रांतिसिंहांनंतर अनेक क्रांतिवीरांचे प्रेरणास्थान ठरले.

या पराकोटीच्या धगधगत्या कालखंडात या चिमुरडीला याच देशकार्यासाठी घडवण्याची किमया त्यांनी साधली. शस्त्रास्त्रे, सरकारी खजिन्याची लूट, तुरुंगफोडीच्या घटना यासारख्या अनेक प्रसंगांना सामोरे जाण्याचे अचाट धैर्य आणि शक्‍ती त्यांच्या अंगी कुठून आली असावी? वडिलांचे बोट त्यांनी अखेरपर्यंत सोडले नाही. तेराव्या वर्षी स्वातंत्र्यसैनिकाशीच त्यांचा विवाह झाला. सारे आयुष्यच त्यांनी या लढ्यासाठी वाहून घेतले. बाळंतीण असताना बाळाच्या जन्मानंतर सातव्या दिवशी अनवाणी पायाने त्या मोहिमेवर गेल्या. या घटनेला काय म्हणावे? क्रांतिसिंह तुरुंगात असत. अनेकदा दीर्घकाळ त्यांना तुरुंगवास झाला. ब्रिटिशांचा ससेमीरा चुकवण्यासाठी ते भूमिगत राहून आंदोलन चालवत. त्यातील मोठी जबाबदारी हौसाताई पार पाडत. क्रांतिकारकांना जेवण, शस्त्रे पोहोचवणे, रात्री-अपरात्री बैलगाडीचा प्रवास करून वेशांतरात निरोप पोहोचवणे ही कामे त्यांनी केली. हे सारे केवळ आणि केवळ ध्येयाने झपाटलेल्या आणि तितक्याच निस्वार्थी, निरपेक्ष आणि देशासाठी प्राणांची बाजी लावण्याच्या करारी वृत्तीचेच हे ज्वलंत द्योतक.

स्वातंत्र्योत्तर नवभारताच्या उभारणीच्या काळात त्यांनी कष्टकरी, उपेक्षित, पीडितांच्या चळवळींसाठी दिलेले योगदानही मोठे. पती भगवानराव पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून नवभारताच्या उभारणीच्या आंदोलनातही त्या उतरल्या. संयुक्‍त महाराष्ट्र चळवळ, हैदराबादमुक्‍ती संग्राम, गोवामुक्‍ती संग्रामात त्यांनी हिरिरीने भाग घेतला. राजकीय स्वातंत्र्य मिळाले, ब्रिटिश गेले; पण खर्‍या सामाजिक स्वातंत्र्याची लढाई मोठी आहे, असे सांगून त्या समानतेच्या लढ्यासाठी घराबाहेर पडल्या. शेतकरी, कष्टकर्‍यांचे अनेक लढे हिंमतीने लढले. 1965 मध्ये कोल्हापुरात महागाईविरुद्धच्या मोर्चाचे नेतृत्व त्यांनी केले. दुष्काळी भागात जनावरांसाठी चारा छावण्या उभारल्या. कष्टकरी महिलांच्या प्रश्‍नांवर त्या रस्त्यावर उतरल्या. स्वातंत्र्य मिळवले; पण ते टिकवायचे कुणी? त्यासाठी आता पुन्हा चळवळ उभी करावी लागेल, अशी खंत त्यांनी अलीकडेच व्यक्‍त केली होती. ती खंत मनात ठेवूनच त्यांनी देह सोडला. सार्वजनिक जीवनात दुर्मीळ झालेली नीतीमत्ता, मूल्य हरवलेले सध्याचे राजकारण, झुंडशाही, जातियवाद, धार्मिक वाद, भ्रष्टाचार यावर त्यांना चिंता वाटे. हे चित्र पाहता स्वातंत्र्य गमावले जाण्याचा धोका त्यांना वाटे. माणसाच्या धार्मिक आणि जातवर्गीय संवेदना अधिक धारदार होत असल्याच्या आणि त्यातून उडणारे हिंसक संघर्ष पाहता त्यांनी वेळीच धोक्याची घंटा वाजवली आहे. तो अधिकारही त्यांनाच होता. काही वर्षे सरता जवळजवळ शंभर वर्षांची सर्व प्रकारची स्थित्यंतरे झेलणार्‍या, अनेक आव्हानांना तितक्याच तडफेने तोंड देणार्‍या आणि स्वातंत्र्याचे खरे मूल्य जाणणार्‍या, जगणार्‍या या क्रांतिवीरांगणेची चिंता खरी न ठरो! त्यांना विनम्र आदरांजली!

Back to top button