पुढारी अग्रलेख : आघाडी मधली धुसफूस?

पुढारी अग्रलेख : आघाडी मधली धुसफूस?
Published on
Updated on

राज्यातील आघाडी सरकार मधील शिवसेनेचे माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या एका सभेतील भाषणाने सध्या नवा वाद उकरून काढलेला आहे. कारण, त्यांनी थेट शरद पवार यांच्यावर व्यक्तिगत हल्ला चढवलेला आहे. राज्यातील आघाडी सरकार केवळ एक तडजोड आहे आणि आवश्यक तितकीच ही तडजोड चालू शकेल. त्या तडजोडीला भवितव्य नाही. मग, त्यावर विसंबून भविष्याचे राजकारण कसे करता येईल, असा जाहीर सवालच गीते यांनी उपस्थित केला आहे. तो त्यांच्या पक्षप्रमुखांना व नेतृत्वाला कितपत मान्य असेल, हे लवकरच कळेल. कारण, राष्ट्रवादी वा काँग्रेस या मित्रपक्ष वा त्यांच्या नेत्यांविषयी नाराजी व्यक्त करणे वेगळे आणि थेट दुखावणारी भाषा वापरणे वेगळे. तसे गीते हे मितभाषी म्हणून ओळखले जातात. त्यांच्याकडून इतके प्रक्षोभक किंवा चिथावणीखोर विधान समोर येणे, ही बाब अनपेक्षित आहे. काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म झाला आणि पवार कितीही ज्येष्ठ वा अनुभवी असले म्हणून शिवसैनिकांचे नेता असू शकत नाहीत, अशी भाषा त्यांच्याकडून का वापरली गेली, हा म्हणूनच मुद्दा आहे. वास्तविक, औरंगाबाद येथील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा सोहळा साजरा झाला, त्यात मुख्यमंत्र्यांनी केलेल्या भाषणापासून सत्ताधारी आघाडीतील मित्रांचे वाद अधिकाधिक टोकदार होताना दिसत आहेत. प्रथम पवारांनी 'आजी-माजी व भावी' असल्या भाषेला आक्षेप घेतल्याचे वृत्त आलेले होते. मग, पवारांनी शिवसेनेच्या आवडत्या 'कोथळा' शब्दावरून तोफ डागली; पण त्याविषयी सेनेचे नेहमीचेच यशस्वी कलावंत गप्प होते. अशा पर्श्वभूमीवर अनंत गीते यांच्याकडून आलेल्या वक्तव्याने म्हणूनच रहस्य निर्माण केले आहे. तटकरे यांचा ओझरता उल्लेख सोडल्यास गीते यांचे एकूण भाषण शिवसेना व आघाडीच्या व्यापक धोरणाशी संबंधित वाटते. म्हणून ते अधिक रहस्यमय आहे. पक्षाच्या अधिकृत प्रवक्ते वा मोठ्या नेत्यांनी असे वक्तव्य केलेले नसल्याने ते सेनेचे अधिकृत मत नसल्याचा नंतर खुलासा करण्याची मोकळीक राहते; पण सेनेत राष्ट्रवादी किंवा पवार यांच्याविषयी किती रागलोभ आहे, त्याचे प्रदर्शन मात्र यातून होत आहे. आघाडीची तडजोड जगजाहीर आहे. दोन्ही पक्षांतील वैचारिक तफावत उघड आहे; पण त्याच्या पलीकडे जाऊन काँग्रेसच्या 'पाठीत खंजीर खुपसून' राष्ट्रवादीचा जन्म ही भाषा मुद्दाम जिव्हारी लागणारी का असावी? त्यात पुन्हा शिवसैनिकांचे नेते वा गुरू पवार असू शकत नाहीत, इतके बोचरे शब्द कशासाठी योजले जावेत? यातून मित्रपक्षांना शिवसेना काही एक संदेश, संकेत देऊ इच्छिते आहे काय?

मागल्या चार-सहा महिन्यांपासून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले स्वबळावर पुढली प्रत्येक निवडणूक, अशीच भाषा वापरत आहेत. त्यावरून पवारांनी उघड नाराजी दर्शवली होती. मुख्यमंत्र्यांनीही शेलक्या भाषेत स्वबळाच्या गर्जनांना लगाम लावण्याचा प्रयत्न केलेला आहे; पण त्यानंतर काँग्रेसला वगळून सेना-राष्ट्रवादी यांची दीर्घकालीन युती-आघाडी निवडणुकीतही राहील, अशीच चर्चा होती. त्या चर्चेला 'खो' देण्याचा प्रयत्न या विधानातून सेना करत आहे काय? की निम्न स्तरावरील सेना नेते वेगवेगळ्या प्रकाराने व मार्गांनी आपल्या शीर्ष नेतृत्वाला तशी कुठलीही आघाडी कार्यकर्त्यांना व समर्थक मतदारांना पचणारी नाही, असा संदेश देऊ पाहत आहेत? ज्या ठिकाणी गीते यांची ही बैठक वा भाषण झाले, त्याचेही एक स्थानमाहात्म्य आहे. रायगड जिल्ह्यात शिवसेना व राष्ट्रवादी यांच्यातच तुंबळ लढाई आहे आणि खुद्द गीते यांचा लोकसभेत राष्ट्रवादीच्या सुनील तटकरे यांनीच पराभव केलेला होता. मग, आजची आघाडी कायम राहिली, तर गीते यांच्यासह शिवसेनेला तो मतदारसंघच सोडावा लागणार ना? आधीपासून असलेले खासदार कायम ठेवून एकत्र लढायचे, तर तटकरेंना शरण जायचे किंवा रायगडची शिवसेना राष्ट्रवादीच्या दावणीला बांधायची का, असा प्रश्न स्थानिक सेना नेते पक्षप्रमुखांना यातून विचारत नाहीत का? उद्या आघाडी मोडली मग, कुठल्या घरी जाणार आहात? तटकरेंच्या घरात शिवसैनिकांना स्थान वा आश्रय असणार आहे काय? सत्तेपुरती आघाडी ठीक; पण शेवटी मुक्कामाला जाताना आपल्याच घरी जावे लागते आणि म्हणूनच आपले घर म्हणजे शिवसेना नावाचा पक्ष शाबूत राखला पाहिजे, असे गीते म्हणतात. त्यात तथ्य इतकेच आहे की, रायगड जिल्ह्यात भाजपला फारसे स्थान नसून शेकाप नामशेष झाला आहे. खरी लढाई सेना व राष्ट्रवादी यांच्यातच आहे. त्यांनी एकत्र यायचे ठरवले, तर विरोधी पक्षाची जागा किंवा अवकाश अन्य पक्षांकडे जाईल. परिणामी, शिवसेनाच संपुष्टात येईल, असे गीते यांना सुचवायचे आहे; पण ही अडचण त्या एका जिल्ह्यापुरती नसून राज्यातल्या अनेक जिल्ह्यांत आघाडी म्हणून काम करताना मित्रासाठी त्याग वा बलिदान देण्याची वेळ आल्यास काय, असा प्रश्न आहे आणि त्याकडेच यातून लक्ष वेधले जात असावे. म्हणूनच पुढली 25 वर्षे आघाडी टिकवण्याचे हवाले देणार्‍यांना सेनेच्या स्थानिक नेत्यांनी हा प्रश्न विचारला आहे, असेही मानावे लागते. योगायोग म्हणजे खुद्द पवारांनीच या प्रदीर्घ एकजुटीची हमी दिलेली असून गीते यांनी त्यांच्यावरच व्यक्तिगत हल्ला चढवून ही वक्तव्ये केलेली आहेत. उद्धव ठाकरे यांची नाराजी ओढवण्याचा धोका पत्करून गीते इतक्या टोकाची विधाने करतील, ही शक्यता नाही. म्हणून तर त्यांच्या त्या प्रक्षोभक विधानांची दखल घ्यावी लागते आणि त्याच्या परिणामांचा विचार करणे भाग आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news