लवंगी मिरची : काय त्या पंगती, काय ह्यो गुलाल, येकदम ओक्के | पुढारी

लवंगी मिरची : काय त्या पंगती, काय ह्यो गुलाल, येकदम ओक्के

ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल लागलाय. विजयी पॅनेलची मिरवणूक सुरू आहे. गुलालाची उधळण होत आहे. गर्दीत टांगमारे आणि बातामारे हे जिवलग मित्र भेटतात –
टांगमारे – हैशा दोस्त – कुठ रं हुतास इतक्यांदा-
बातामारे : हायच नव्हं, या पॅनेलच्या प्रचारात. मी हायच की – जातोय कुठं-
टांगमारे : काय राव सांगताय – मागेमोतर म्या तुमाला दुसर्‍या पार्टीकडं बघितलं हुतं –
बातामारे : आवो, कान करा हिकडं – (कानात सांगतो) आवो, म्या त्या पार्टीकडं गेलतो ते तिथला दूम काढाया, म्या खरा याच पार्टीचा –
टांगमारे : हैशा गब्रू – म्हंजे तिकडं आन हिकडंबी पाची बोटं दुधातुपात म्हना की!
बातामारे : आवं, कुठलं दूध आन् तूप – दूध तरी काय स्वस्त हाय व्हय – तवा वाटलं तसं प्यायला – खरं म्हंजे दोन्ही पार्ट्या मागिंदी येकच हुत्या. पर आता फुटल्या. दोन झाल्या. काल गळ्यात गळा घालीत हुते, आता पायात पाय घालाय लागल्यात-
टांगमारे : आवो, भावा-भावात भांडणं लावली आपल्या नेत्यांनी – पुलोद झाल्यापासून बघतोय न्हवं-
बातामारे : पर म्या म्हनतो, आताच ह्यास्नी येकमेकाइरुध हुभा र्‍हायचं कुठनं सुचलं?
टांगमारे : कान हिकडं करा! (कानात बोलतो) आवो, ही येकच पार्टी र्‍हायली आसती तर बिनइरोध निवडणूक झाली असती. मग तुमचं-आमचं काय – द्या टाळी! म्हनून काढली युगत –
बातामारे : (टाळी देत) हैशा – ब्येस युगत काढली. तुमच्याबिगर आसं कुणाचं डोस्कं चालायचंच न्हाई.
टांगमारे : तवा मग म्या लागलो, कारभार्‍याच्या कानाला – तुमचा जोडीदार कानामागनं ईऊन तिकट व्हतोय म्हनालो – तिकडं जोडीदाराला फुणगी टाकली – झालं – तीन तिघाडा झाला –
बातामारे : खरं गावाचा येकोपा – त्याचं काय –
टांगमारे : ह्ये तुमी म्हनता – दोनीकडनं कोपरा पावेतो रस्सा वरपलासा, दोनीकडची पाकिटं तुमीच वाटलीसा – किती वाटलासा सांगा –
बातामारे : आनी आपली स्वारी कुठं हुती – आमच्या म्होरं घोड्यावर –
टांगमारे : जाऊ द्या – तुमची-आमची बेजमी झाली न्हवं –
बातामारे : झाली खरं – जिल्हा परिषद – पंचायत समिती पातोर झालीया –
टांगमारे : मग त्या निवडणुकीत विधानसभेपातोर करू या की बेजमी. बाकी काय म्हणा. प्रचारात नुसता धुरळा – काय त्या पंगती, काय ह्यो गुलाल, येकदम ओक्के –
बातामारे : व्हय – येकदम ओक्के.

Back to top button