अफगाणिस्तान अंतर्गत संघर्षाच्या वाटेवर | पुढारी

अफगाणिस्तान अंतर्गत संघर्षाच्या वाटेवर

सुरेश पवार

अखुंदझादा आणि मुल्ला घनी बरादर हे दोन प्रभावशाली नेते गायब आहेत. त्यांची हत्या झाल्याची चर्चा आहे. त्यातून अफगाणिस्तान मध्ये अंतर्गत संघर्ष उद्भवण्याची चिन्हे आहेत.

अमेरिकन सैन्य परतल्यानंतर तालिबान्यांनी उचल खाल्‍ली आणि अध्यक्ष अश्रफ घनी यांना पलायन करावे लागून तालिबान्यांनी अफगाणिस्तान मध्ये ताबा मिळवला. सत्ता मिळेपर्यंत तालिबानी नेते एकत्र होते. तथापि, सत्ता हाती येताच त्यांच्यातील बेदिली उघड होत चालली आहे. मंत्रिमंडळ रचनेवरून मुल्ला घनी बरादर आणि हक्‍कानी गट यांच्यात चकमक उडाली होती. आपल्या मुत्सद्दीपणामुळे तालिबानची सत्ता आली, असा मुल्‍ला अब्दुल घनी बरादरचा दावा आहे, तर आपल्यामुळेच सत्ता आली, असे हक्‍कानी गटाचे म्हणणे आहे. त्यातून मुल्‍ला घनी बरादर गटाचा मंत्रिमंडळाच्या एका सदस्याशी वाद झाला. त्यामुळे मुल्‍ला अब्दुल घनी बरादर नाराज असल्याची चर्चा आहे. मुल्‍ला घनी बरादर हा तालिबान सरकारात उपपंतप्रधान आहे; पण या संघर्षामुळे तो सरकारमधून बाहेर पडण्याच्या विचारात असल्याची शक्यता व्यक्‍त होत आहे. मुल्‍ला हैबतुल्लाह अखुंदझादा हा तालिबान सरकारचासर्वेसर्वा आहे. मात्र, सत्ता स्थापन झाल्यापासून अखुंदझादा अज्ञातवासात आहे आणि मुल्‍ला अब्दुल घनी बरादर हाही गायब झाला असल्याची चर्चा आहे. हे दोघेही प्रभावशाली नेते आहेत आणि त्यांना सहजासहजी डावलणे शक्य नाही. तसे डावलले गेले असल्यास ते स्वस्थ बसण्याची सुतराम शक्यता नाही. त्यातून तालिबान अंतर्गत रक्‍तरंजित संघर्ष उफाळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हत्या केल्याचा संशय

प्रतिस्पर्धी गटांनी या दोघांची हत्या केली काय, अशी शंका घेतली जात आहे. खरोखर तसे झाले असल्यास त्यांचे कट्टर अनुयायी त्याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाहीत आणि त्यातून रक्‍तपात उद्भवेल. तथापि, या दोन नेत्यांच्या कथित हत्येच्या चर्चेत कितपत तथ्य असेल, हे सांगणे कठीण आहे. अशी होणारी चर्चा ही तालिबानअंतर्गत यादवी उद्भवण्याची शक्यताच सूचित करते.

कू्ररकर्मा अखुंदझादा

तालिबानी नेत्यांतील सर्वात खतरनाक आणि क्रूरकर्मा नेता म्हणून मुल्ला हैबतुल्लाह अखुंदझादा याला ओळखले जाते. 2016 मध्ये अमेरिकन सैनिकांच्या हल्ल्यात तत्कालीन तालिबानी नेता अख्तर मन्सूर ठार झाला. त्यानंतर तालिबानची सूत्रे अखुंदझादाकडे आली. 1990 च्या दशकात त्याने रशियनांशी लढा दिला. 2012 आणि 2019 या वर्षांत त्याच्या हत्येचे प्रयत्न झाले होते. अखुंदझादा कट्टर धर्मीय आहे आणि त्याच्यामागे कट्टर तालिबान्यांचे पाठबळ आहे. सत्तेवरची पकड तो सहजासहजी सोडील असे नाही आणि आपल्या विरोधकांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.

मुल्ला अब्दुल घनी बरादर हा अखुंदझादाचा उजवा हात! 1996 ते 2001 या काळातील तालिबान सरकारात तो वरिष्ठ पदावर होता. तालिबानचा पाडाव झाल्यावर तो पाकिस्तानात गेला. क्‍वेट्टाच्या शूराचे त्याने (शूरा म्हणजे अफगाणांची निर्णय घेणारी सभा) नेतृत्व केले. अमेरिकन सैन्य परतीसाठी दोहा येथे जो समझोता झाला, त्या करारावर त्याने सही केली होती. त्यावरून तालिबानमधील त्याचे स्थान लक्षात येते.

दुटप्पी हक्‍कानी नेटवर्क

अफगाणिस्तानबरोबर पाकिस्तानातही बस्तान बसवलेले हक्‍कानी नेटवर्क अनेक घातपाती कारवायांना जबाबदार आहे. जलालुद्दीन आणि सिराजउद्दीन हे दोघे भाऊ या नेटवर्कचे म्होरके आहेत. हे नेटवर्क देवबंद या कट्टर पंथाचे अनुयायी असून, अतिशय कडवे आहेत. अमेरिकन फौजांशी लढताना हक्‍कानी नेटवर्कने अमेरिकेच्या सी.आय.ए. या गुप्‍तहेर संघटनेशी संबंध ठेवले होते. त्यांच्या या दुटप्पी व्यवहारामुळेच अखुंदझादा आणि मुल्‍ला अब्दुल घनी बरादर यांच्याशी त्यांचा खटका उडाला असण्याची शक्यता आहे.

विविध वांशिकांत विभागलेला देश

अफगाणिस्तान मध्ये विविध वांशिक गटांत फारशी एकसंध भावना नाही. पश्तून ही इथली प्रमुख जमात. चार कोटी लोकसंख्येत त्यांचा वाटा आहे 42 टक्के. ही जमात राज्यकर्ते असल्याच्या तोर्‍यात वावरते. तालिबान्यांत त्यांचे वर्चस्व आहे. 2001 पासून अफगाणिस्तानात जी राजवट होती, त्याचे नेते हमीद करझाई, अश्रफ घनी हे पश्तूनच होते. पश्तूनमध्येही अनेक टोळ्या आहेत आणि त्यांच्यातही संघर्ष आहेत.

अफगाणिस्तानातील दुसरी मोठी जमात आहे, ती ताजिकी. त्यांची संख्या 27 टक्के आहे. अहमदशहा मसूद हा या जमातीचा प्रसिद्ध नेता. पंजशीरचा सिंह असा त्याचा लौकिक. त्याने रशियनांशी दोन हात केले आणि तालिबान्यांना जेरीस आणले. 2001 मध्ये त्याची हत्या झाली. त्याचा मुलगा मसूद अहमद हा लंडनमध्ये शिकलेला असून, तालिबान्यांचा कडवा विरोधक आहे. तालिबान्यांनी पंजशीरवर कब्जा मिळवला असला, तरी मसूद अहमदचा गट नेस्तनाबूत झालेला नाही. मसूद अहमद याच्या नॅशनल रेझिस्टन्स फ्रंटने आताच प्रतिसरकार उभारण्याची घोषणा केलीच आहे व ही यादवीचीच तयारी आहे.

हजारा या शिया पंथीय जमातीचा तालिबान्यांनी अमानुष छळ केला होता. उझबेक, ऐमक, बलुची, तुकीमेन अशा अनेक अल्पसंख्य जमाती आपला सवतासुभा राखून आहेत. या देशात मुळातच एकात्मता नाही. त्यामुळे सत्तेसाठी काही गट एकत्र आले, तरी जोवर सर्वोच्च नेता प्रबळ आहे, तोवरच असे गट एकत्र नांदतात, असा अनुभव आहे. रशिया आणि अमेरिकेने वीस-वीस वर्षे सत्ता राबवली, ती शस्त्र बळावर! मुल्‍ला ओमरची जरब होती म्हणून तालिबानी सत्ता पाच वर्षे टिकली.
आता मात्र तालिबान राजवटीत अनेक गटांची खिचडी आहे आणि अखुंदझादा आणि मुल्‍ला अब्दुल घनी यांची कोंडी होत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आगामी काळात अफगाणिस्तान अंतर्गत संघर्षाच्या वाटेवर गेल्यास आश्‍चर्य वाटायला नको.

भारताची डोकेदुखी वाढणार

तालिबानचा उदय होताच भारतात दहशतवादी हल्ल्याचे कारस्थान रचण्यात आले, हा योगायोग म्हणता येत नाही. या उघड झालेल्या कारस्थानात सापडलेला जान मोहमद शेख ऊर्फ समीर कालिया हा मुंबईतील धारावीचा आहे आणि या घातपाती कारवाईसाठी कुख्यात माफिया दाऊद इब्राहिमचे नेटवर्क वापरले जात होते. समीर कालिया हा गेल्या 20 वर्षांपासून दाऊद टोळीच्या संपर्कात होता. 28 वर्षांपूर्वी दाऊदनेच मुंबईत महाभीषण बॉम्बस्फोट मालिका घडवून आणली होती. आता पुन्हा एकदा दाऊद टोळी सक्रिय झली असल्याचे दिसून येते. त्याच्या मागे पाकिस्तानची कुख्यात आयएसआय ही हेरयंत्रणा आहे. शिवाय आता तालिबानचाही आशीर्वाद मिळाला आहे. तालिबानचा उदय, त्यांच्या बड्या नेत्यांतील संघर्ष आणि त्यातून भारतापुढे दहशतवादाचे वाढते संकट ही भारताची डोकेदुखी ठरणार आहे.

Back to top button