मातृभाषेतील शिक्षणाने आकलन समृद्ध होईल | पुढारी

मातृभाषेतील शिक्षणाने आकलन समृद्ध होईल

देशात उच्च शिक्षण मातृभाषेत करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. 2010 ला भारत सरकारने पारित केलेल्या शिक्षण हक्क कायद्याने देखील प्राथमिक शिक्षण मातृभाषेत असावे असे म्हटले आहे. 34 वर्षांनंतर आलेल्या राष्ट्रीय शिक्षण धोरणानेदेखील मातृभाषेतील शिक्षण दिले जावे, असे म्हटले आहे.

मातृभाषेत शिक्षण देण्याचा विचार केंद्र सरकारने केल्याने मुलांच्या आकलनाचा प्रवास सुलभ आणि समृद्ध होईल. भाषेच्या प्रतिष्ठेबरोबर मुलांचे शिकणे अधिक परिणामकारक होण्याचा हा प्रवास आहे. त्याद़ृष्टीने शासनाचे हे पाऊल अभिनंदनीय आहे. शिक्षण प्रक्रियेत कोणतीही संकल्पना मातृभाषेतील समजावून घेणे सुलभ असते. संकल्पना न समजता आपण पुढे जात राहिलो, तर विद्यार्थ्याला उत्तीर्ण होता येते; मात्र जीवनासाठीचे शिक्षण मिळण्याची शक्यता नाही

महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्याचे सूतोवाच करताना राज्यात मातृभाषेतून शिक्षणावर भर देण्यात येईल अशी आग्रही भूमिका प्रतिपादन केली. उच्च शिक्षण विभागाने वैद्यकीय शिक्षणदेखील मराठीत करण्यासाठी समिती गठीत केली. देशात उच्च शिक्षण मातृभाषेत करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. 2010 ला भारत सरकारने पारित केलेल्या शिक्षण हक्क कायद्याने देखील प्राथमिक शिक्षण मातृभाषेत असावे, असे म्हटले आहे. 34 वर्षांनंतर आलेल्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाने देखील मातृभाषेतील शिक्षण दिले जावे, असे म्हटले आहे.

पायाभूत शिक्षणाची संकल्पना पुढे नेताना मातृभाषा शिक्षणाचा विचार प्रतिपादित करण्यात आला होता. जगभरातील शिक्षणतज्ज्ञ आणि भाषा अभ्यासक यांनी शिक्षणाची गुणवत्ता उंचावण्यासाठी मातृभाषेतून शिक्षणाचा आग्रह केला आहे. त्यामुळे सरकारी भूमिकेची प्रभावी अंमलबजावणी झाल्यास शैक्षणिक गुणवत्तेचा प्रश्न निकाली निघण्याची शक्यता अधिक आहे. मातृभाषेत शिक्षण याचा अर्थ इंग्रजी भाषेचा अथवा इतर भाषांचा द्वेष असा नाही. भाषा अभ्यासकांच्या मते स्वतःची भाषा उत्तम आली की, इतर भाषा शिकणेदेखील सुलभ होते. त्यामुळे इतर भाषा आत्मसात करण्याचा मार्ग खुला होतो.

देशाचे शिक्षणाचे चित्र बदलण्यासाठी सातत्याने बोलले जात आहे. अनेक समित्यांचे अहवाल येताहेत. शैक्षणिक धोरणे आखली जाता आहेत. शिक्षणासाठी विविध प्रकारची गुंतवणूक करण्याचे सूतोवाच केले जात आहेत; मात्र विविध समित्यांच्या अहवालांच्या शिफारशी मातृभाषेतून शिक्षण याच आहेत. महात्मा गांधीजींनी देखील शिक्षण सक्तीचे करण्याची भूमिका घेताना मातृभाषेत शिक्षणाचा विचार प्रतिपादित केला होता. जगातील अनेक प्रगत राष्ट्रांमध्ये मातृभाषेतून शिक्षण दिले जात आहे. मातृभाषेतील शिक्षण हेच प्रगती लक्षण आहे.

महात्मा गांधी हे प्रयोगशील शिक्षणतज्ज्ञ होते. येथील मातीची आणि माणसांची असणारी मानसिकता, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक पार्श्वभूमी त्यांना चांगली ज्ञात होती. त्यामुळे येथील परीस्थितीत परिवर्तन करण्याचा राजमार्ग शिक्षणाच्या महाद्वारातून जातो, हे त्यांनी ओळखले होते. महात्मा गांधी यांनी आपल्या शिक्षण संकल्पनेत शिक्षण मोफत व सक्तीचे करावे, तसेच मातृभाषेतून शिक्षणाची भूमिका मांडली होती. त्यांच्या मातृभाषेच्या आग्रहामागे शिक्षण जीवनाभिमुख करण्याचा विचार होता.

मातृभाषेचा आग्रह हा अभिमान असेल; मात्र शैक्षणिकद़ृष्टया मातृभाषेतून शिक्षण म्हणजे गुणवत्तेचा प्रवास आहे. जोवर शिक्षणाची प्रक्रिया ही समजावून केली जात नाही तोवर आपल्याला गुणवत्तेचा आलेख उंचावता येणार नाही. शिक्षण प्रक्रियेत कोणतीही संकल्पना मातृभाषेतील समजावून घेणे सुलभ असते. संकल्पना न समजता आपण पुढे जात राहिलो, तर विद्यार्थ्याला उत्तीर्ण होता येते; मात्र जीवनासाठीचे शिक्षण मिळण्याची शक्यता नाही. निरंतर शिक्षण हे आपले ध्येय आहे; मात्र जेथे पाठ्यक्रमातील पुस्तक समजावून घेणे ही मोठी अवघड गोष्ट बनते तेथे निरंतर शिक्षणाचा प्रवास कठीण आहे. गांधीजींनी सतत मातृभाषेच्या विचारांचे समर्थन केले आहे.

त्यांनी इंग्रजांना जसा विरोध केला तसा इंग्रजीला देखील केला. त्या विरोधामागे शिक्षणाची विचारधारा होती. मुलांच्या विकासाचा विचार होता. ते म्हणत, मुलांवर इंग्रजी लादणे, त्याला बळजबरीने इंग्रजीच्या शिक्षणांशी जोडणे म्हणजे त्याच्या नैसर्गिक शिक्षणप्रक्रियेला बाधा आणणे आहे. त्यांच्या मूळ स्वरूपालाच नष्ट करणे आहे. शिक्षणाचा पाया हा मातृभाषाच असायला हवा, ही जगभरातील भाषातज्ज्ञ आणि शिक्षणतज्ज्ञांची भाषा गांधीजी बोलत होते. त्यामागे सामाजिक धारणा आणि समाजाच्या विकासप्रक्रियेचे मूळ होते. त्यामुळे वर्धा शिक्षण परिषदेत मातृभाषा शिक्षणाचे जोरदार समर्थन करण्यात आले होते.

अलीकडे मातृभाषेतील शिक्षण नाकारणार्‍या माणसांची विचार जाणून घेण्याचा प्रयत्न केला, तर ते सांगतात की, जगण्याची शक्ती देणारी व्यवस्था मातृभाषेत नाही. आज जागतिकीकरण, मुक्त अर्थव्यवस्था, उदारीकरणाचा विचार करता इंग्रजी ही भाषा जगाला जवळ आणणारी वाटू लागली आहे. अर्थात, कोणत्याही भाषेचे उद्दिष्ट हे संवाद, विचारांचे आदान-प्रदान, ज्ञानाची निर्मिती हेच राहिले आहे.

त्यामुळे इंग्रजी म्हणजे जगाला मुठीत घेणारी भाषा असे वाटणे साहजिक आहे; मात्र त्याचवेळी शासनाने उच्च शिक्षण मराठीतून देण्याचा सुरू केलेला विचार अधिक स्वागतार्ह आहे. यामुळे भाषेत नवनवीन शब्दांची भर पडणार आहे. जगात होणार्‍या संशोधनातील विविध संकल्पना, तेथील ज्ञान मातृभाषेत आले, तर येथील पिढी जशी ज्ञानसंपन्न होईल त्याप्रमाणे भाषेच्या शब्दसंपत्तीत नवी भर पडणार आहे. भाषा समृद्ध होत राहिली, तर तिचा लोकव्यवहारात उपयोग वाढत जातो.

लोकव्यवहारात भाषा आली, तर भाषेच्या मृत्यूची चिंता व्यर्थ ठरते. इंग्रजी भाषा जगभरातील अनेक शब्दांची भर टाकत दरवर्षी वाढत जाते. सातत्याने इंग्रजीत नवनवीन शब्दकोष बाजारात उपलब्ध होतात. मराठी भाषेतून उच्च शिक्षण घेताना भाषाकोषांची गरज भासणार आहेच. भाषा समृद्धतेचा मार्ग आहे. त्यामुळे प्राथमिक स्तरावर मराठी शिकून काय करायचे, असा पडणारा प्रश्नदेखील निकाली निघेल. उच्च शिक्षणाची भाषा म्हणून पालक मुलांना इंग्रजी माध्यमांच्या शाळेत पाठवतात. शेवटी शिक्षणाची भाषा आणि तिचा भविष्यासाठी होणारा उपयोग याचे नाते असतेच. उच्च शिक्षण मराठीत आल्याने गुणवत्ता उंचावण्यास मदत होईल. त्याचा परिणाम प्राथमिक,माध्यमिक शाळांमधील प्रवेश उंचावण्यावर होईल.

– संदीप वाकचौरे, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ

Back to top button