श्रीमद् भगवद्गीतेतील गुरुपरंपरा

श्रीमद् भगवद्गीतेतील गुरुपरंपरा
Published on
Updated on

आज गीता जयंती. त्यानिमित्त…

आपल्या देशात 'गीता' या नावाने अनेक ग्रंथ आहेत. त्यामध्ये अवधूत गीता, अष्टावक्र गीता, शिवगीता, गुरुगीता अशा अनेक ग्रंथांचा समावेश होतो. मात्र, 'गीता' म्हटलं की, सहसा लोकांच्या नजरेसमोर येते ती 'श्रीमद् भगवद्गीता'. महाभारताच्या भीष्मपर्वात अवघ्या सातशे श्लोकांमध्ये समाविष्ट असलेला श्रीकृष्ण-अर्जुन संवाद हा जगभर 'भगवद्गीता' या नावाने विख्यात आहे. 'भगवद्गीता' म्हणजे 'भगवंताने गायिलेली'. ऐन युद्धारंभाच्या वेळी किंकर्तव्यमूढ झालेल्या अर्जुनाला त्याच्या नियत कर्तव्यकर्माची, धर्माची आठवण करून देत असताना भगवान श्रीकृष्णांनी जे ज्ञान दिले, त्याचा समावेश या अजरामर गीताग्रंथात आहे.

परंपरेनुसार मार्गशीर्ष शुक्ल एकादशीला गीता जयंती साजरी केली जाते. या एकादशीनंतर लगेचच येते ती विविध संप्रदायांच्या, मोक्षमार्गांच्या अग्रस्थानी किंवा गुरुस्थानी असलेल्या भगवान श्रीदत्तात्रेय यांच्या जयंतीची पौर्णिमा. गीतेतही काही श्लोकांमधून सद्गुरूचे किंवा गुरुपरंपरेचे महत्त्व सांगितलेले आहे. गीता ही उपनिषदांचे सारच आहे. उपनिषदांमध्ये 'शाब्दे परे च निष्णात' अशा किंवा 'श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठम्' अशा सद्गुरूंकडून ज्ञान घेण्याचा उपदेश केलेला आहे. उपनिषदांचे सार असलेल्या गीतेतही सद्गुरूंचे महत्त्व सांगितले नसते तरच नवल होते!

महान धनुर्धर व योद्धा असलेला अर्जुन मोहवश होऊन युद्ध टाळू पाहत होता. अशावेळी तो भगवान श्रीकृष्णांना शिष्यभावाने शरण गेला व त्याने भगवंतांनाच आपले गुरू मानले. 'शिष्यस्तेऽहं शाधि मां त्वां प्रपन्नम्' (मी आपला शिष्य आहे, आपल्याला शरण आलेल्या मला उपदेश करा) अशी त्याने प्रार्थना केली. त्यानंतर भगवंतांनी लगेचच गुरुपद घेऊन त्याला त्याच्या शोक व मोहाबाबत सुरुवातीलाच फटकारले. 'अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे। गतासूनगतासूंश्च नानूशोचन्ति पंडिताः॥' (जे शोक करण्यायोग्य नाही, त्याबाबत तू शोक करीत आहेस आणि स्वतः विद्वान, पंडित असल्याप्रमाणे बोलत आहेस) अशा शब्दांमध्ये त्याला फटकारले! 'पाण्डित्यं निर्विद्य' (पांडित्याला संपादन करून) असे बृहदारण्यक उपनिषदामध्ये म्हटले आहे. त्यानुसार आद्य शंकराचार्य आपल्या गीतेवरील भाष्यात म्हणतात की, 'पण्डा आत्मविषया बुद्धिः येषां ते पण्डिताः' म्हणजे आत्मविषयक बुद्धीचे नाव 'पण्डा' आहे आणि अशी बुद्धी ज्याच्यामध्ये आहे तो 'पण्डित' आहे. अर्जुनाची आत्मविषयक बुद्धी मोहग्रस्त होऊन देहबुद्धीने जोर धरला होता. त्यामुळे त्याला फटकारून भगवंतांनी लगेचच (दुसर्‍या अध्यायात) त्याला आधी आत्म्याचेच ज्ञान दिले. पुढे त्यांनी आत्मज्ञानासाठी सद्गुरूंचे महत्त्व विशद करून सांगितले.

चौथ्या अध्यायात गुरुपरंपरेचे व सद्गुरूंचे महत्त्व सांगितलेले आहे. भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितले की, ही ब्रह्मविद्या मी पूर्वी सूर्यदेव विवस्वानाला सांगितली होती व ती पुढे परंपरेने सूर्यवंशीय राजांना सांगितली गेली. 'एवं परम्पराप्राप्तमिमं राजर्षयो विदुः' म्हणजे अशाप्रकारे परंपरेने राजर्षींनी ती जाणून घेतली; पण कालौघात ती लुप्त झाली. आता तीच पुरातन विद्या किंवा योग मी तुला सांगत आहे, असे भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितले. यावरून अखंड गुरुपरंपरेचे महत्त्वही सहज लक्षात येऊ शकते.

याच अध्यायात भगवंतांनी ज्ञानाचे महत्त्व सांगून म्हटले आहे की, 'तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया। उपदेक्ष्यन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्वदर्शिनः॥' याचा अर्थ 'हे ज्ञान तू तत्त्वदर्शी ज्ञानी गुरूकडे जाणून प्राप्त कर. त्यांना नम्रतेने दंडवत प्रणाम केल्यावर, त्यांची सेवा केल्यावर आणि कपटरहित, सरळपणाने प्रश्न विचारल्यावर असे तत्त्वदर्शी, ज्ञानी महात्मा त्यांना जे परमात्वतत्त्व माहिती आहे त्याचा तुला उपदेश करतील'. आद्य शंकराचार्यांनी गीतेवरील भाष्यातच 'तत्त्वदर्शी' म्हणजे कोण, हे दुसर्‍या अध्यायावरील भाष्यावेळी सांगून ठेवलेले आहे. त्यामध्ये ते म्हणतात, 'तत्' हे सर्वनाम आहे आणि 'सर्व' ब्रह्मच आहे. त्यामुळे त्याचे नाव 'तत् आहे. त्याच्या भावाला म्हणजे 'ब्रह्म'च्या यथार्थ स्वरूपाला 'तत्त्व' असे म्हटले जाते व हे तत्त्व पाहणे ज्यांचा स्वभाव आहे, त्यांना 'तत्त्वदर्शी' म्हटले जाते.

भगवंतांनी अशाच तत्त्वदर्शी सद्गुरूंना शरण जाऊन, त्यांची विनम्र सेवा करून, जिज्ञासा व्यक्त करून हे तत्त्व जाणून घेण्याचा उपदेश केलेला आहे. या ज्ञानामुळे तू पुन्हा मोहग्रस्त होणार नाहीस व या ज्ञानरूपी नौकेने हा भवसागर तरून जाशील, असेही भगवंतांनी अर्जुनाला सांगितले. हीच ब्रह्मविद्या स्वतः भगवान श्रीकृष्णांनीही गीतेच्या रूपाने दिलेली आहे. त्यामुळेच 'कृष्णं वन्दे जगद्गुरूम्' असे म्हटले जाते. ज्ञानदात्या भगवान श्रीकृष्णाला आणि अजोड ज्ञानग्रंथ असलेल्या श्रीमद् भगवद्गीतेला गीता जयंतीनिमित्त शतशः वंदन!

– सचिन बनछोडे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news