संसर्गबळींचे आव्हान | पुढारी

संसर्गबळींचे आव्हान

भारतातील आरोग्य व्यवस्था नेहमीच चर्चेचा विषय राहिलेली आहे. कोरोनाचे संकट आपल्या आरोग्य व्यवस्थेने पेलले असले तरी अजूनही युद्ध संपलेले नाही, असेच म्हणावे लागेल. कारण, कोरोनाशिवाय अन्य आजारांमुळे मृत्युमुखी पडणार्‍यांची संख्यादेखील लक्षणीय असून,
ती चिंताजनक आहे.

विशेषत: जीवाणूच्या (बॅक्टेरिया) संसर्गामुळे होणार्‍या मृत्यूच्या प्रकरणात भारताची स्थिती दयनीयच आहे. लॅन्सेटचा ग्लोबल बर्डन ऑफ डिसिज स्टडी-2019 वरून भारतातील जीवाणू संसर्गाची तीव्रता समजते. लॅन्सेट-2019 च्या अहवालात म्हटले आहे की, देशात 33 प्रकारच्या जीवाणूंच्या संसर्गामुळे सुमारे चौदा लाख लोकांचा मृत्यू झाला. यापैकी सहा लाख 80 हजार जणांचा मृत्यू केवळ पाच प्रकारच्या जीवाणूंच्या संसर्गामुळे झाला. जागतिक पातळीचा विचार केल्यास जीवाणू संसर्ग हा जगात मृत्यू होण्याचे दुसरे महत्त्वाचे कारण आहे. 2019 मध्ये जगभरात 77 लाख जणांचा मृत्यू हा 33 प्रकारच्या जीवाणूंमुळे झाला आहे. आपल्या देशातील आरोग्यस्थिती फार समाधानकारक नाही. भारतात लाखो लोकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेले पाच जीवाणू म्हणजे मूत्र संसर्ग, न्यूमोनिया (फुफ्फुसाचा दाह), विषमज्वर (टाइफॉईड) यासह अन्य जीवाणूजन्य आजारांचा उल्लेख इथे प्रामुख्याने करता येईल. या जीवाणूंमुळे आजारी पडणार्‍यांंची संख्या लक्षणीय आहे. हे आजार साधारणपणे राहणीमान आणि खाण्यापिण्याच्या सवयींमुळे होतात.

देशातील जीवाणूंचा वाढता फैलाव पाहता आरोग्य, जीवनमान, आहार, प्रदूषण, स्वच्छ पाणी आणि शौचालय आदी मूलभूत सुविधांच्या आघाडीवर आपण कोठे आहोत, हे कळून चुकते. भारताच्या ग्रामीण आणि दुर्गम भागात अशा प्रकारच्या जीवाणू संसर्गामुळे किती व्यक्ती मृत्युमुखी पडतात त्याची बर्‍याचदा नोंदही सरकारी दरबारी नसते. त्यामुळे लान्सेटच्या अहवालातील आकडेवारी ही केवळ धक्कादायक नसून आपल्याला कोठे काम करावे लागेल, हे देखील सांगण्याचे काम करते. जीवाणू संसर्गाखेरीज सामान्य संसर्गामुळे मृत्युमुखी पडणार्‍यांची संख्यादेखील कमी नाही.

संबंधित बातम्या

या सर्वांवरून एक बाब लक्षात येते की, किरकोळ आजारांचे निदानदेखील आपल्याकडे वेळेत होत नाही आणि उपचारही वेळेवर मिळत नाहीत. यामागे इथल्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतील उणिवा कारणीभूत आहेत. सरकारी रुग्णालयांतील वाढत्या रुग्णसंख्येमुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. हजारो लोकांमागे एक डॉक्टर, एक बेड अशी स्थिती अनेक दशकांपासून आपल्याकडे आहे. रुग्णालयातील उपकरणे आणि औषधांची टंचाई हे नेहमीचेच रडगाणे आहे. कोरोना काळात ऑक्सिजन सिलिंडरच्या कमतरतेमुळे देशाच्या आरोग्य व्यवस्थेचे वाभाडे निघाले होते.

ऑक्सिजन सिलिंडर घेऊन लागलेल्या वाहनांच्या रांगा आजही डोळ्यांसमोरून जात नाहीत. एरवीदेखील जिल्हा रुग्णालयापासून ग्रामीण भागातील प्राथमिक व सामुदायिक आरोग्य केंद्राची स्थिती बिकटच आहे. ग्रामीण भागात आपण सरकारीच नव्हे तर खासगी रुग्णालयांत गेलो तर तेथे एक तर सुविधा नसतात किंवा आरोग्य कर्मचारी तरी वेळेवर हजर नसतो. या जोडीला सार्वजनिक आरोग्यसेवेला भ्रष्टाचाराची कीड लागली आहे. त्याचाही परिणाम संसर्गबळींच्या रूपाने दिसून येतो आहे. संसर्गजन्य रोगांचा फैलाव करणारे जीवाणू वाढण्यामागे सर्वात मोठे कारण म्हणजे अस्वच्छता.

भारतातील बहुतांश भागांत आजही सांडपाण्यापासून ते कचर्‍याची समस्या खूपच गंभीर आहे. घराघरांत नळाद्वारे येणार्‍या पाण्यात सांडपाणी मिसळणे आणि किटाणू आढळून येणे ही बाब सामान्य आहे. उन्हाळा आला की, बहुतांश भागांत दूषित पाणीपुरवठा होऊ लागतो आणि नागरिक आजारी पडू लागतात. या समस्येवर नगरपालिका, महानगरपालिका, ग्रामपंचायतींकडून थातूरमातूर उपाय केले जातात आणि कालांतराने परिस्थिती ‘जैसे थे’ होते. देशाची राजधानी नवी दिल्लीतील तीन मोठे कचर्‍याचे डोंगर हे तब्बल चार दशकांपासून उभे असून, त्यात दिवसागणिक भर पडत आहे.

देशातील आणि महाराष्ट्रातील नद्यांच्या प्रदूषणाचा विषय हा जटिल आव्हान बनून राहिला आहे. वाढत्या प्रदूषणामुळे केवळ नद्यांचे, नाल्यांचेच नव्हे तर भूगर्भातील पाणीही प्रदूषित केले आहे. एकंदरीत देशातील लाखो नागरिक प्रदूषणाच्या विळख्यात अडकले आहेत. अशा दूषित वातावरणात आजारांचा फैलाव होणारच. सामान्य जीवाणूंमुळे लाखो नागरिक मृत्युमुखी पडत असतील तर यास आपले दोषपूर्ण धोरण जबाबदार आहे, असे म्हणावे लागेल. संसर्गजन्य आजारांवर नियंत्रण मिळवायचे असेल तर मुळातच आपल्या व्यवस्थेला संसर्गमुक्त करावे लागेल.

– सुचित्रा दिवाकर

Back to top button