गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांत ‘आप’ आघाडीवर... | पुढारी

गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांत ‘आप’ आघाडीवर...

गुजरातमध्ये येत्या 1 आणि 5 डिसेंबर अशा दोन टप्प्यांत मतदान होणार असून दिवसेंदिवस प्रचारातील रंगत वाढत चालली आहे. यावेळी भाजप आणि काँग्रेस या पारंपरिक प्रतिस्पर्धी पक्षांसह अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्षदेखील निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. त्यामुळे हा मुकाबला त्रिकोणी झाला आहे. या तीनही पक्षांचे उमेदवार जोरदार प्रचार करताना दिसत आहेत. त्यामुळे यावेळी कधी नव्हे एवढी राजकीय धांदल गुजरातमध्ये पाहायला मिळत आहे.

पहिल्या टप्प्यातील मतदानात 788 उमेदवार रिंगणात आहेत. यातील तब्बल 167 उमेदवार असे आहेत की, ज्यांच्यावर कोणत्या ना कोणत्या स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. यातही शंभर उमेदवारांवर हत्या, बलात्कारासारखे गुन्हे दाखल आहेत. विशेष म्हणजे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार देण्यात अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष आघाडीवर आहे. पहिल्या टप्प्यातील 89 पैकी 88 जागा आप लढवत आहे आणि आपने दिलेल्या उमेदवारांपैकी 36 टक्के उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. पक्षाचे सुमारे 30 टक्के उमेदवार असे आहेत की ज्यांच्यावर हत्या, हत्येचा प्रयत्न, बलात्कार, अपहरण अशा स्वरूपाचे गुन्हे आहेत. गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार देण्यात ‘आप’पाठोपाठ काँग्रेस आणि भाजपचा क्रमांक लागतो.

मोफतच्या खैरातींवर मोदींचा प्रहार….

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जंगी सभांना बहुतांश ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. या सभांद्वारे मोदी काँग्रेस आणि ‘आप’ वर निशाणा साधत आहेत. त्यातही दोन्ही पक्षांनी जाहीर केलेल्या विविध आश्वासनांना मोदींनी टीकेचे लक्ष्य केले आहे. दिल्ली आणि पंजाबमध्ये आम आदमी पक्षाच्या विजयामागे मोफत विजेच्या आश्वासनाने मोठी कामगिरी बजावली होती. गुजरातमध्ये सत्ता आली तर याठिकाणी देखील मोफत वीज दिली जाईल, असे आप आणि काँग्रेसचे नेते सांगत आहेत. यामुळेच मोदींनी मोफतच्या खैरातींवर टीका चालवली असल्याचे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे.

भाजपच्या ज्येष्ठ उमेदवाराच्या कामगिरीकडे लक्ष…

वयाची 75 वर्षे उलटलेल्या नेत्याला आमदारकी अथवा खासदारकीचे तिकीट द्यायचे नाही, असा भाजपचा केंद्रीय स्तरावरचा नियम आहे. मात्र गुजरातमधील मंजलपूर मतदारसंघाचे उमेदवार योगेश पटेल हे त्याला अपवाद ठरले आहेत. दुसरा कोणताही पर्याय न सापडल्यामुळे भाजपने मंजलपूरमधून 76 वर्षीय योगेश पटेल यांना मैदानात उतरवले आहे. आता ते निवडणुकीत विजयश्री खेचून आणतात काय, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

प्रचारसभांमध्ये बुलडोझर….

निवडणुका तोंडावर असतानाच्या काळात म्हणजे ऑक्टोबरमध्ये गुजरात सरकारकडून द्वारका बेटावरील द्वारकाधीश मुख्य मंदिराच्या आसपास मोठ्या प्रमाणात झालेले अतिक्रमण काढण्यात आले होते. अल्पसंख्याक समाजाच्या लोकांच्या अतिक्रमणाचा त्यात समावेश होता. याशिवाय पोरबंदर आणि गीर सोमनाथ येथील अतिक्रमणे देखील पाडण्यात आली होती. भाजपकडून अतिक्रमणे पाडण्याचा हा मुद्दा उपस्थित केला जात आहे. या पार्श्वभूमीवर काही प्रचारसभामध्ये बुलडोझरचे मॉडेल ठेवले जात आहे. अर्थातच नागरिकांमध्ये बुलडोझर मॉडेलची चर्चा झाली नसती तर नवल.

इतर पक्ष ठरले नगण्य….

‘आप’सारखा नवखा पक्ष गुजरातमध्ये आपली छाप पाडू पाहत असताना गेल्या कित्येक दशकांपासून राज्यात अस्तित्वात असलेले इतर पक्ष आणि डाव्यांना ओहोटी लागली आहे. यावेळी राज्यात भाजप, काँग्रेस आणि आप अशी तिरंगी लढत होत आहे. एखाद-दुसरा मतदारसंघ सोडला तर कोणत्याही मतदारसंघात इतर पक्षाचा प्रभाव दिसून येत नाही.

इलिसब्रीजवर सातव्यांदा भाजपचे वर्चस्व?

अहमदाबाद जिल्ह्यातील इलिसब्रीज मतदारसंघ असा आहे की, ज्याठिकाणी भाजपने सलग सहा वेळा विजय मिळवलेला आहे. यावेळी सातव्यांदा विजय पताका फडकविण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे.

भाजपकडून अमितभाई शहा (आपले केंद्रीय गृहमंत्री नव्हेत) मैदानात आहेत. काँग्रेसने भिकू दवे यांना तर आम आदमी पक्षाने पारस शहा यांना संधी दिली आहे. 2017 च्या विधानसभा निवडणुकीवेळी या मतदारसंघात भाजपच्या राकेश शहा यांनी काँग्रेसच्या विजय दवे यांना पराभूत केले होते. दोन्ही पक्षांनी यंदा उमेदवार बदललेले आहेत. त्याचमुळे याठिकाणची निवडणूक लक्षवेधी ठरली आहे.

Back to top button