लवंगी मिरची : या रावजी तुम्ही बसा भौजी। - पुढारी

लवंगी मिरची : या रावजी तुम्ही बसा भौजी।

या रावजी तुम्ही बसा भौजी
येतोय आम्ही तुमच्या पक्षात
स्वागत करा जीऽजीऽऽजी!

साधे भोळे, आम्ही कलाकार
राजकारणाचा नाही, अनुभव फार
कलेवर आमची, श्रद्धा अपार
रसिकांना मानून सरकार
आनंद वाटला जीऽजीऽऽजीऽऽऽ ॥1॥

गुणग्राहक साहेब अन् रसिक दादा
आमच्या ताईंनी केलाय, प्रेमाचा वादा
वचन आमचं, नाही मागणार जादा
रसिक मंडळी होतील पक्षावर फिदा
तुम्ही बघाच जीऽजीऽऽजीऽऽऽ ॥2॥

आमच्या कलेत ‘हाता’चा मोठा वाटा
नजरेच्या ‘बाणा’चा नसणार कधीच तोटा
बांधून ‘घड्याळ’ हाती इतरांना देऊ फाटा
विरोधकांचा काढू मग अलगद काटा
तुम्ही बघाच जीऽजीऽऽजीऽऽऽ ॥3॥

तिकडं पाठवली तुम्ही बारांची यादी
तेरावी मी, तुम्ही घ्यावी तसदी
कलावंत खूश, रसिक होतील आनंदी
विश्वास ठेवा, शत्रू होतील जायबंदी
तुम्ही बघाच जीऽजीऽजीऽऽऽ ॥4॥

आमची लावणी वाढवेल रसिकांची धकधक
घड्याळाची मग वाढत राहील टिकटिक
विरोधकांची बघा बंद होईल बकबक
सत्ता येईल पक्षाकडे मग करत टकटक
तुम्हीच बघाच जीऽजीऽऽजीऽऽऽ ॥5॥
लोक बोलतील तुम्ही त्यांना बोलू द्या हो
टीका करतील तुम्ही त्यांना करू द्या हो
घायाळ होतील तुम्ही त्यांना होऊ द्या हो
पक्षात येतील तुम्ही त्यांना येऊ द्या हो
तुम्ही बघाच जादू जीऽजीऽऽजीऽऽऽ ॥6॥

राजकारणाचा आज झाला आहे तमाशा
जीवापाड आम्ही जपला आहे तमाशा
नेता म्हणून घेतो कुणीही बत्तासा
लावते काढायला त्यांना बघा उठाबशा
तुम्ही बघाच जीऽजीऽऽजीऽऽऽ ॥7॥

साहेबांकडून शिकू आम्ही एकेक डाव
शब्दांनी होतील घायाळ असा घालू घाव
सत्तेवर मारू मग अलगद ताव
जनता पाठीशी आम्हाला कुणाचं भ्याव
तुम्ही बघाच राव जीऽजीऽऽजीऽऽऽ ॥8॥

आम्ही केली नाही कधी शेतीबिती
आम्हा माहीत नाहीत तुमच्या रितीभाती
तरी जपू आम्ही तुमची नातीगोती
आम्हा संधी द्यावी भरण्या पोती
तुम्ही द्यालच ना जीऽजीऽऽजीऽऽऽ ॥9॥

तिथं होऊन जाऊ द्या सवाल जवाब
बघत राहतील तिथं पाटील आणि नवाब
फडणवीस, दरेकर बघतील आमचा रुबाब
अभिनंदनास पात्र ठरेल प्रत्येक बाब
तुम्ही बघाच जीऽजीऽऽजीऽऽऽ ॥10॥

– झटका

Back to top button