अग्रलेख – सत्य नेमके काय? | पुढारी

अग्रलेख - सत्य नेमके काय?

‘सत्य परेशान होता है, पराजित नही।’ गेल्या आठवड्यात राज्याचे नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ व त्यांच्या अन्य सहकार्‍यांना भ्रष्टाचाराच्या एका आरोपातून कोर्टाने निर्दोष ठरवले. असे अनेकदा अनेक व्यक्‍तींच्या बाबतीत घडते. आरोपांचा गवगवा खूप होतो आणि प्रत्यक्षात न्यायालयीन सुनावणीमध्ये कित्येक वर्षांचा कालावधी निघून गेल्यावर कधीतरी त्याच व्यक्‍तीला निर्दोष मुक्‍तता मिळते. जेव्हा असे काही घडते तेव्हा उपरोक्‍त हिंदी उक्‍ती अगत्याने सर्व भाषिक वापरत असतात; पण खरोखरच सत्य नेहमी जिंकते का? तसे असेल, तर शनिवारी अफगाणिस्तानात उजळमाथ्याने तालिबानी सत्तेचा झेंडा फडकला, त्यालाही सत्य मानावेच लागेल!

प्रामुख्याने शनिवारी तारीख 11 सप्टेंबर होती आणि बरोबर दोन दशकांपूर्वी याच दिवशी अवघे जग तोंडात बोट घालून अमेरिकेची आर्थिक राजधानी न्यूयॉर्क येथे उलगडणारी घटना थक्‍क होऊन पाहत होती. तिथे लागोपाठ दोन प्रवासी विमाने जगप्रसिद्ध जुळ्या मनोर्‍यांवर आदळली आणि काही तासांतच जगातल्या सर्वात उंच मानल्या जाणार्‍या त्या इमारती जमीनदोस्त झाल्या. त्यात विमानातले प्रवासी व त्या गगनचुंबी इमारतीतले काही हजार लोक मरण पावले. अफगाणिस्तानात बसलेला ओसामा बिन लादेन त्या घातपाताचा सूत्रधार असल्याचे स्पष्ट झाले. तिथून तथाकथित दहशतवादविरोधी युद्धाला सुरुवात झालेली होती.

अमेरिकेच्या तत्कालीन अध्यक्षांनी अफगाणच्या तालिबान सत्तेकडे ओसामाला अमेरिकेचा आरोपी म्हणून ताब्यात देण्यास फर्मावले. त्याला इन्कार मिळाल्यानंतर दोन महिन्यांतच अमेरिकन सेनेने तिकडे कूच केले होते. या सगळ्या घटनाक्रमाला दि. 11 सप्टेंबर 2001 रोजी सुरुवात झाली आणि त्याला वीस वर्षे पूर्ण होत असताना पुन्हा तिथे तालिबान्यांची सत्ता त्याच दिवशी प्रस्थापित होणार असेल, तर कोण परेशान झाला आणि पराजित झाला नाही, या शब्दांना किंवा तत्सम काव्याला काही अर्थ उरतो का?

संबंधित बातम्या

तालिबान्यांचा नि:पात करण्यासाठी दोन दशकांपूर्वी अमेरिकेने व जगातल्या पुढारलेल्या देशांच्या सेनेने छेडलेली प्रदीर्घ मोहीम यशस्वी झाली आहे का? की त्या सगळ्यांना पुरे पडून तालिबान शिल्लक उरली? दोन दशकांपूर्वी सोव्हिएत फौजेचे भंगार झालेले युद्ध साहित्य हाताशी असताना जगाशी वैर पत्करलेले तालिबान आज त्यापेक्षाही अत्याधुनिक अशा युद्ध सामग्री व दारूगोळ्यानिशी सुसज्ज आहेत व अधिकच शक्‍तिमान झालेले आहेत. जगातला दहशतवाद निपटून काढण्यात आलेले अपयश सत्य मानायचे का?

कुठल्याही घटनांचे वा घटनाक्रमाचे काव्यात्म वर्णन सुखावणारे वा आकर्षक असले म्हणून ते खरोखर सत्य असत नाही, याचा हा जळजळीत पुरावा आहे. कारण, सत्य नेहमी सापेक्ष असते आणि तत्कालीन परिस्थितीवर विसंबून असते. तेव्हापुरते ते सत्य असते आणि परिस्थिती बदलली की, सत्यही बदलत असते.

ज्या तालिबान जिहादी मानसिकतेने अमेरिकेच्या अत्याधुनिक सुसज्ज फौजेला दाती तृण धरून माघार घ्यायला लावली, त्यांनीच त्यापूर्वी तितक्याच तुल्यबळ सोव्हिएत फौजेला शेपूट घालून अफगाण भूमी सोडायला भाग पाडलेले होते. जिभेला मानवी रक्‍त लागलेले श्‍वापद नरभक्षक होते, असे म्हणतात. त्याला भूतदया वा प्राणिमात्र समजून जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केवळ आत्मघातकी असतो. त्यापेक्षा काहीही वेगळे घडलेले नाही आणि घडणारही नाही.

सोव्हिएत फौजांनी अफगाण भूमी व्यापून तिथे आपली साम्यवादी सत्ता प्रस्थापित करण्याचा घाट घातला तो चुकीचाच होता; पण त्याचा विरोध करताना अमेरिकेने जिहाद छेडण्यास तिथल्या व जगभरच्या मुस्लिमांना घातपाती राक्षस बनवून टाकले. त्यानेच आता अमेरिकेचा पराभव केला आहे. अर्थात, यात काहीही नवे नाही. असाच व इतकाच दारुण पराभव अमेरिकन सेनेने व्हिएतनाममध्ये अनुभवला होता. अत्याधुनिक शस्त्रास्त्रे व युद्ध सामग्रीने लढाया जिंकता येत नाहीत, तर लढण्याची जिद्द व प्राणापेक्षाही प्रिय असे अभिमानाचे धारदार हत्यार सगळ्यात भेदक अस्त्र असते. अमेरिका जुन्या अनुभवातून शिकली नाही, त्याची किंमत त्यांनी मोजली आहे. सोव्हिएत युनियन त्या युद्धात उद्ध्वस्त होऊन गेले.

दोन महाशक्‍तींना परास्त केलेल्या त्याच तालिबान वा जिहादींना मग इतर कुठल्या तत्सम सेना वा फौजा, राजसत्ता मुठीत ठेवू शकतील? नसतील तर आज 2021 मध्ये तोच फसलेला प्रयोग अन्य कोणा देशाने वा प्रगत राष्ट्राने करणे शहाणपणाचे असू शकते काय? पण, जेव्हा अंगात मस्ती व डोक्यात झिंग चढलेली असते, तेव्हा कुठलेही शहाणपण पचत नसते आणि तेच चीन व पाकिस्तानचे झालेले आहे. तालिबान्यांच्या विजयात अमेरिकेचे अपयश पाहून सुखावलेल्या त्याच दोन देशांनी आता तालिबान्यांचे आश्रयदाते होण्यात पुढाकार घेतलेला आहे.

आपण तालिबान व त्यांच्या दहशतवादी पवित्र्याचा आपल्या जागतिक महत्त्वाकांक्षांसाठी उपयोग करून घेऊ शकतो, अशा भ्रमात त्या दोन देशांनी तालिबानी सत्तेचे यजमानपद स्वीकारले आहे. त्या माध्यमातून भारत वा अन्य शेजारी देशांच्या विरोधात आपले राजकीय डावपेच खेळायला निघालेल्या भारताच्या या दोन्हीही शेजार्‍यांना सत्य म्हणूनच ओळखता आलेले नाही वा समजलेले नाही. किंबहुना तालिबान्यांचे सत्य आणि चीन व पाकिस्तानचे सत्य भिन्‍न आहे. याचा अनुभव त्या दोघांना लवकरच आल्याशिवाय राहणार नाही. म्हणूनच आजच्या स्थितीत भारताने शांत राहून आसपासच्या घटनाक्रमावर नजर ठेवण्यात शहाणपणा आहे. त्यामुळेच भारताची शांतता वा अलिप्तता अनेकांना समजू शकलेली नाही. सत्य हेच आहे.

Back to top button