लवंगी मिरची : आम्ही असू लाडके! | पुढारी

लवंगी मिरची : आम्ही असू लाडके!

काही म्हणा आबुराव. यंदाची दिवाळी कोणी, कधी, चुकूनही विसरणार नाही.
का? नेहमीसारखीच तर होती यंदाची दिवाळी. जरा दोन वर्षांच्या सक्तीच्या खंडानंतर आली, म्हणून अंमळ जास्त गाजली, एवढंच.
पण क्रिकेटच्या वर्ल्ड कप टी-20 मध्ये भारताने पाकिस्तानला ऑस्ट्रेलियात जे हरवलं ना, ती यंदाच्या दिवाळीची खरी आतषबाजी होती बघा. काय तो सामना, काय ती विराट खेळी, काय तो जल्लोष! सगळंच कसं मनावर कोरलं गेलंय,
ते मात्र झालं. मी माझ्या दोन्ही नातींना म्हटलं, पोरीहो, आता सगळं ध्यान क्रिकेटवर द्या.
भले! गेल्या वर्षी तर थोरल्या नातीला रागावत होता, पोरांसारखी त्या तांबड्या चेंडूमागे पळत सुटू नकोस म्हणून.
गेल्या वर्षीची गोष्टच वेगळी.
कशी काय वेगळी? गेल्या वर्षी तुम्ही, तुमच्या नाती आणि क्रिकेट हे सगळं सेमच होतं की.
हो, पण तेव्हा क्रिकेटमध्ये पोरींना पैसे मिळण्याचा नेम नव्हता. आता क्रिकेट बोर्डाने क्रिकेटमध्ये पोरींनाही बाप्यांएवढेच पैसे द्यायचं ठरवलंय ना?
अच्छा, म्हणून एकदम टोपी फिरवली का तुम्ही?
तसं म्हणा. आपल्याला सगळा पुढचा विचार करावा लागतो. दोन्ही नातींना नीट सेटिंग लावून द्यायला पाहिजे.
अहो, पण मागे तर तुमच्या धाकट्या नातीला क्रिकेट आवडत नाही, ती बॅडमिंटन शिकायला बघते, असं म्हणत होतात.
तिला काय कळतंय? पोरीची जात. आपणच योग्य दिशेला वळवायची.
योग्य दिशा? जो खेळ तिला आवडत नाही त्यात घाम गाळायला लावणं ही योग्य दिशा कशी काय म्हणता हो?
आता तुम्हीच बघा. आज क्रिकेटमध्ये आहे तेवढा पैसा दुसर्‍या कुठल्या खेळात आहे?
तो जुनाच वांधा आहे आपल्याकडे. क्रिकेटवाले नेहमी लाडके. सरकारचेही, जनतेचेही. उगाच बंडमिंटन, टेबलटेनिस, कबड्डी वगैरेंना भाव देत नाही आपण लोक. सगळा ओढा क्रिकेटकडे. तेही पठ्ठे म्हणणार, ‘आम्ही असू लाडके!’
म्हणून लाडक्या नातींना मी लाडाकोडाच्या खेळाकडेच खेचणार.
तुमच्या खेचाखेचीत इतर खेळांची उपेक्षा होऊ नये आणि पोरींवरही नावडत्या गोष्टी लादल्या जाऊ नयेत म्हणजे मिळवली.

– झटका

Back to top button