लवंगी मिरची : राज्यगीताला नाराजीचे सूर नकोत!

लवंगी मिरची : राज्यगीताला नाराजीचे सूर नकोत!
Published on
Updated on

काय गुणगुणताय आबुराव?
तुम्हाला ऐकू आलं? मी तर मनातल्या मनात प्रॅक्टिस करतोय. जय जय महाराष्ट्र माझाची.
तुमचं मनातलं आता जनातपण आलंय आबुराव. जयजय महाराष्ट्र हे राज्यगीत झालंय ना? मग ते आपल्याला यायला हवं असं अनेकांना वाटणारच.
बाकी गाणं भारी आहे ते. राजा बढेंचे शब्द आणि शाहीर साबळेंचा बुलंद आवाज! मी पण बरं गुणगुणलो ना?
हो. म्हणजे गाणं ओळखू तरी आलं मला; पण दोनच कडवी घेतलीयेत ना हो राज्यगीतासाठी?
हो ना. अशी गीतं सुटसुटीतच हवीत. लोकांच्या तोंडी सहज बसण्याजोगी. प्रश्न उरतो तो मनाचा.
म्हणजे? मला नाही समजलं.
अहो, खरोखरच 'गर्जा महाराष्ट्र' असं मनातून वाटतंय का लोकांना? हे बघायला नको?
बस्का? कशातही खुसपटं काढणारच ना तुम्ही?
तसं नाही; पण देशातले मोठे, महत्त्वाचे उद्योग महाराष्ट्रात यायला तयार नाहीत, हे बघतोय ना आपण? एन्रॉनपासून सुरू झालेलं ते सत्र थांबत नाहीये अजून.
रोजगार मेळावे वगैरे भरवतंय की सरकार.
तोच वांधा आहे ना. मोठ्या, घाऊक रोजगाराच्या संधी घालवायच्या आणि नंतर मेळावे भरवायचे. काय उपयोग?
शेतकर्‍यांनाही खूप सारी कर्जमाफी मिळणार आहे.
पण हमी भावाची मारामारी सुरूच आहे ना?
आता यंदा भयानकच पाऊस कोसळला, नाहक नापिकीचं संकट आलं. त्यात सरकारचा काय दोष?
मान्य; पण अशा संकटाच्या काळातच सरकारची साथ हवी ना?
त्याच्या योजना करायला सरकार जरा स्थिर हवं हो. आपली तिथे जरा गडबड होते. मध्येमध्ये मुख्यमंत्रीसुद्धा नसतो आपल्याला.
राज्यकर्त्यांची आपापसातच धुळवड चालली की, असं होतं. गरिबी, बेरोजगारी, खंडणीखोरी, असुरक्षितता हे रोजचे प्रश्न मागे राहतात.
बघा बुवा. शौर्यगीतं वगैरे म्हणणं हे आतून यायला हवं माणसांच्या. तेव्हा आता 'गर्जा महाराष्ट्र' लादताय, तसाच गरजण्याजोगा काही पराक्रमही करून दाखवा आता. आणि हो. तो एखाद्या पदाकरिता नसावा! आम जनतेसाठी असावा. मग मनातली नाराजी गेली की, ते एकसुराने म्हणतील, जय जय, महाराष्ट्र माझा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news