गणरायाचे भक्‍तांस पत्र | पुढारी

गणरायाचे भक्‍तांस पत्र

माझ्या गणेश भक्‍तांनो,
अनेक उत्तम आशीर्वाद!

एरव्ही मी येणार म्हटलं की, तुमची दोन- तीन महिने अगोदरच लगबग सुरू होते. कोरोनाने तुमच्या उत्साहाला बांध घालायला भाग पाडलं आहे. साधेपणानेच तुम्हाला माझं स्वागत करावं लागणार आहे; पण तुम्ही त्याची थोडीही खंत वाटून घेऊ नका. कारण, माझ्या उत्सवापेक्षा तुमचा जीव माझ्यासाठी जास्त मोलाचा आहे. त्यामुळे उत्सव दणक्यात साजरा करू वगैरे गोष्टींचा अजिबात आग्रह धरू नका. राजकारणी मंडळी तुमचा वापर करून तसा आग्रह धरतीलही. कारण, त्यांना भक्‍तीपेक्षा राजकारणातच जास्त रस आहे.

माझ्या उत्सवाचं तर सोडूनच द्या. त्यांनी कोरोनात, महापुरात, दुष्काळात आणि वादळातही राजकारणच केलंय. मी इतकी वर्षे तुमच्या उत्सवाला येतोय; पण त्यांना बुद्धी देण्याचे काम मीही करू शकलेलो नाही. त्यामुळे त्यांच्या नादाला लागून कोणतेही चुकीचे पाऊल उचलू नका.

संबंधित बातम्या

कोरोनाने मांडलेल्या उच्छादामुळे जगाची आर्थिक घडी विस्कटली आहे. अनेकांच्या नोकर्‍या गेल्या. अनेक छोटे व्यावसायिक अडचणीत आहेत. बेताची आर्थिक स्थिती असणार्‍या सामान्य माणसाचे तर कंबरडेच मोडले आहे. माझी सर्व गणेश मंडळांना कळकळीची विनंती आहे की, यावर्षी कुणालाही वर्गणीसाठी आग्रह करू नका.

खुशीने कुणी दिली, तरच वर्गणी घ्या. धाकदपटशा दाखवून वर्गणी गोळा केली, तर मी नाराज होईन, हे लक्षात ठेवा. यावर्षी भव्य देखावे करू नका. देखाव्याचे पैसे अडचणीत असणार्‍या माणसांना मदत करण्यासाठी वापरा. त्या पैशातून गरजूंना अन्‍न मिळेल. रुग्णांना उपचार मिळतील, अशी व्यवस्था करा.

मला एकवीस मोदकांचा नैवेद्य दाखविण्याऐवजी एकवीस सामाजिक उपक्रमांचा नैवेद्य दाखवा!

घराघरातल्या गणेश भक्‍तांना माझे सांगणे राहील की, त्यांनीही साधेपणानेच माझी प्राणप्रतिष्ठा करावी. माझ्यासाठी पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी बाजारात गर्दी करू नये. बाजारात जायची वेळ आली, तर घरातल्या एकाच व्यक्‍तीने जावे. सोसायटीच्या कंपाऊंडच्या आत किती माणसे जमली आहेत, हे कोण येतंय बघायला, अशा भ्रमात राहून सोसायट्यांनीही माझ्या उत्सवात नियमांचे उल्लंघन होणार नाही, याची काळजी घ्यावी.

माझ्या दर्शनासाठी अजिबात घराबाहेर पडू नका. मी यत्र, तत्र, सर्वत्र आहे. त्यामुळे मंडपासमोरच येऊन माझे दर्शन घेण्याचा दुराग्रह टाळा. आता आम्ही देवांनीही ऑनलाईन हे माध्यम स्वीकारलेले आहे. आम्हालाही ते आवडलं आहे. काय ती भक्‍तांची गर्दी! त्या गर्दीनेच घामाघूम व्हायचो मी! मग, माझ्या शेजारी अखंड उभा असलेल्या गणेश भक्‍ताला मला वारा घालण्याचं काम कराव लागायचं.

मी दहा दिवस उत्सवात बिझी असल्यामुळे आणि माझ्या घरातल्या मंडळींकडे लक्ष देता न आल्यामुळे तेही नाराज व्हायचे. तुम्ही जशी ‘वर्क फ्रॉर्म होम’ ही संकल्पना स्वीकारली आहे, तशीच आम्हीही ‘दर्शन फ्रॉर्म होम’ ही संकल्पना स्वीकारून अमलात आणण्याचे ठरविले आहे. त्यामुळे आमच्याजवळ असणार्‍या उंदराचे आम्ही माऊसमध्ये रूपांतर केले आहे, तेव्हा ऑनलाईनच भेटू!

तुमचाच लाडका,
गणपती.

– झटका

Back to top button