निर्विघ्नं कुरू मे देवः! | पुढारी

निर्विघ्नं कुरू मे देवः!

‘सुखकर्ता, दुःखहर्ता’ अशा बिरुदावलीने अलंकृत असलेल्या श्री गणरायाचे आज शुभागमन होत आहे. हे गजानना, त्रिविध तापांनी त्रासलेले सर्वसामान्य जनलोक तुझ्या आगमनाची नेत्री प्राण आणून प्रतीक्षा करीत आहेत.

आपत्तीमागून महाआपत्ती आल्यानंतर या जनलोकांनी कुणाकडे तारणहार म्हणून पाहावे? गणनायका, तुझ्यावाचून या पामर जनाला कोण त्राता आणि वाली आहे बरे? तेव्हा गजवदना, गौरीपुत्रा तुझ्या शुभागमनाने सार्‍या हालअपेष्टा संपुष्टात याव्यात, सौख्याची झुळूक यावी, ही आर्त विनवणी तमाम रयतेची आहे.

गणाधीशा, भक्‍तमनीचा हा भाव तुला निश्‍चितच आकळेल आणि भक्‍तांसाठी तू वायुवेगे धावून येशील, यात शंका नाही. ‘भक्‍तानुकंपिंतं देव, जगत्कारणमच्युतमम’ ही अथर्वशीर्षातील तुझी ग्वाही भक्‍तमानसाला दिलासा देणारी आहे. सर्व चराचर, सारे विश्‍व व्यापून राहिलेल्या द्वादशनाम, तू साक्षात ब्रह्मा, विष्णू, महेश, इंद्र, चंद्र, सूर्य, अग्‍नी, वायू आहेस, असे अथर्वशीर्षात मोठ्या गौरवाने म्हटले आहे. ज्ञान, विज्ञानाचा तूच कर्ता-धर्ता आहेस, अशीही साक्ष या अथर्वशीर्षाने दिली आहे.

संबंधित बातम्या

कालातीत, गुणातीत अशी तुझी ख्याती! शक्‍तित्रयात्मका म्हणून तुझा आदर केला जातो. ‘वाचे स्मरावा गजमुख’ असे संतांनी उगीच म्हटलेले नाही. तुझ्या स्मरणमात्रेच सारी विघ्ने आणि आपदा-आपत्ती दूर सरतात. मग, विश्‍वनियंत्या, तुझ्या शुभागमनाने सारे दुःख, दैन्य का नाही दूर होणार? तेव्हा, ये, विघ्नराजेंद्र, भालचंद्रा, मोरया संकटी पावण्यासाठी निर्वाणी रक्षणासाठी मनोवेगाला मागे सारीत तुझे शुभागमन होऊ दे!

विश्‍वचालका, तुला आम्ही काय सांगावे? गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीने सार्‍या जगाची ससेहोलपट झाली. मराठ्यांच्या इतिहासात पानिपत हे मोठे रणांगण. त्यात लाख बांगडी फुटली, असे बखरीचे वर्णन आहे.

एका पानिपताने जेवढी हानी झाली, त्यापेक्षा शेकडोपटीने गेल्या दोन वर्षांतील कोरोनाने भारताची आणि सार्‍या जगाची हानी केली. अद्यापही कोरोनाची ही महाआपत्ती टळलेली नाही आणि आता तिसर्‍या लाटेची टांगती तलवार आहे.

पहिल्या दोन लाटांचाच तडाखा एवढा जबरदस्त बसला आहे की, आता तिसर्‍या लाटेला तोंड द्यायला अंगात यत्किंचितही त्राण उरलेले नाही. पहिल्या दोन लाटांच्या जखमा ताज्याच आहेत. त्याची उपाययोजना सुरूच आहे.

तोच तिसरी लाट दरवाजा ठोठावत आहे. सर्वसामान्य जनतेची आताच पाचावर धारण बसली आहे. पहिली लाट ओसरते न ओसरते तोच दुसर्‍या लाटेचा दणका बसला. देवा, तुला सारे अवगत आहेच.

दुसर्‍या लाटेत आपल्या देशाची महाभीषण हानी झाली. तब्बल पंधरा लाख कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले. त्यापैकी नऊ लाख कोटी रुपयांची हानी फक्‍त रिटेल व्यावसायिकांची होती. ‘मंगल देशा, पवित्र देशा’ अशा महाराष्ट्राचे दीड लाख कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले.

पहिल्या आणि दुसर्‍या कोरोना लाटेत कोट्यवधी लोकांचे रोजगार बुडाले. रोजीरोटीवाल्यांच्या हालाला पारावार राहिला नाही.

कोट्यवधी उद्योग, व्यवसाय, व्यापारी संस्थांना लॉकडाऊनची झळ बसली. जगभरात कोरोनाच्या महाप्रकोपाने शंभर कोटींहून अधिक लोक दारिद्य्ररेषेखाली ढकलले गेले.

संयुक्‍त राष्ट्रांच्या अहवालात हे विदारक वास्तव स्पष्ट करण्यात आले आहे. कोरोना महामारीने सर्वसामान्यांची उमेद खच्ची झाली. हे गणराया, आता येणार्‍या तिसर्‍या लाटेवर मात करण्यासाठी तुझ्या भक्‍तांचे मनोधैर्य आणि मनोबल बळकट कर, हीच प्रार्थना!

हे महागणपती, कोरोनाचे महाविघ्न घोंगावत आहे तोच वरुणराजाच्या अस्मानी आपत्तीने लोकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. या अस्मानी सुलतानीने अनेक ठिकाणी होत्याचे नव्हते झाले आहे. 2019 आणि 2021 या दोन वर्षी पर्जन्याने दिलेल्या तडाख्याने सारे जीवन विस्कळीत होऊन गेले.

शेकडो गावेच जलमय झाली. एवढेच नव्हे, तर कोल्हापूर-सांगलीसारख्या शहरांत बहुतांश भागात पाणी शिरले. हजारो लोक विस्थापित झाले. हजारो एकर शेती पाण्याखाली गेली. पूरग्रस्तांना पहिली मदत पोहोचते न पोहोचते तोच दुसर्‍यांदा मदत द्यायची वेळ आली आहे. महाराष्ट्रावर ही आपत्ती ओढवली.

विशेषतः पश्‍चिम महाराष्ट्र आणि कोकणाला या हानीची झळ पोहोचली. या भागात दोन्ही वेळच्या आपत्तींमुळे किमान दहा हजार कोटींहून अधिक थेट नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्याशिवाय अप्रत्यक्ष झालेली हानी ही काही हजार कोटींच्या घरात आहे.

ओल्या दुष्काळाबरोबर महाराष्ट्रात काही भागाला कोरड्या दुष्काळाचीही झळ बसली. पुनर्वसनाचा प्रश्‍न आ वासून समोर उभा आहे.

गुणाधीशा, जनतेने किती हालअपेष्टा सहन कराव्यात, याला काही सीमा आहे का? कोरोना महाप्रकोपाने आधीच गांजलेल्या जनतेवर अतिवृष्टी आणि महापुराची आपत्ती कोसळली. त्यामुळे लोक अक्षरशः मेटाकुटीला आले आहेत.

देशावर आणि राज्यावर अशी संकटाची मालिका ओढवत असताना, ज्यांच्याकडे आशेने आणि अपेक्षेने पाहावे, ते या कठीण कसोटीला उतरले आहेत का, या प्रश्‍नाचे उत्तर संशोधनानेच सिद्ध होणार आहे.

‘देवा तूचि गणेशु। सकल मती प्रकाशु॥’ ही संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वरांची उक्‍ती; पण ही उक्‍ती राज्य कारभार पाहणार्‍यांकडून प्रत्ययाला आलेली दिसत नाही. उलट दररोज काही ना काही कलगीतुरा चालूच आहे. कधी नव्हे अशी असंस्कृत भाषा वापरली जात आहे.

या फुकटच्या तमाशाने कोणाची करमणूक होत नाही. उलट मनःस्तापात भरच पडत आहे. तेव्हा हे रिद्धी-सिद्धीनायका, बुद्धिदात्या गणराया, या सार्‍यांना जनकल्याणासाठी राबवण्याची सद्बुद्धी दे, हीच तुझ्या चरणी विनम्र प्रार्थना!

‘हे गणराया, विघ्नहराया, लवकर यावे सिद्ध गणेशा’ या आवाहनाला भक्‍तवत्सला तू तत्काळ प्रतिसाद देशील, असा द‍ृढ विश्‍वास आहे.

Back to top button