सीमोल्लंघनाचा अर्थ | पुढारी

सीमोल्लंघनाचा अर्थ

सणावारांचे पारंपरिक संदर्भ जोपासून त्याला आधुनिक काळाशी जोडून घेण्यामुळे संस्कृती प्रवाही राहू शकते. आणि संस्कृती प्रवाही ठेवायची असेल तर पारंपरिक सीमोल्लंघनाला अनेक नवकल्पनांचे पंख लावून दशदिशांतून भरारीसाठी सज्ज व्हायला हवे. संस्कृतीच्या जपणुकीबरोबर त्याच संस्कृतीतली चिरंतन, सकस मूल्ये घेऊन भविष्याकडे वाटचाल सुकर होणार आहे. आज दसरा म्हणजे विजयादशमीच्या निमित्ताने त्यादृष्टीने पावले टाकण्याची नीतांत गरज आहे. पौराणिक काळात या दिवसाचे अनेक संदर्भ आहेत आणि ते घेऊन आधुनिक काळातही अनेक उपक्रमांचे आयोजन केले जाते.

प्रभू रामचंद्रांनी आजच्याच दिवशी रावणाचा वध केला म्हणून देशभरात ठिकठिकाणी आज रावण दहन केले जाते, हा रामायणकालीन संदर्भ. महाभारतकालीन संदर्भ म्हणजे याच दिवशी पांडवांनी आपली शस्त्रे शमीच्या झाडाच्या ढोलीतून बाहेर काढली आणि ते युद्धासाठी सज्ज झाले. म्हणून विजयादशमीला शस्त्रांची पूजा करण्याची प्रथा सुरू झाली. याच सीमोल्लंघनाचा संदर्भ जोडून आधुनिक काळात सीमोल्लंघनाच्या नवनव्या कल्पना पुढे येऊ लागल्या. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात रोजच सीमोल्लंघनाची गरज भासू लागली.

देशातील ऐंशी टक्के जनतेला रोजच्या जगण्याशी घनघोर संघर्ष करावा लागतो. त्याअर्थाने सामान्य माणसाच्या वाट्याला हे कुरुक्षेत्र कायमच आले आहे. या कुरुक्षेत्रावर सामान्य माणूस प्रत्येक लढाई जिंकतोच असे नाही. अनेकदा त्याला हारही मानावी लागते. ही हार व्यवस्थेपुढे असते. व्यवस्थेतील भ्रष्टाचार, अनाचार, अनिष्ट प्रथा यांच्यापुढे असते. अनेकदा सामान्यातली सामान्य माणसेही या व्यवस्थेवर मात करून जिद्दीने पुढे जात असतात, त्यातून अनेकांना प्रेरणा मिळत असते. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून केले जाणारे सीमोल्लंघन सामान्य माणसांच्या जगण्याला बळ देत असते. सणावारांच्या निमित्ताने समाजजीवनाला एकत्रित ठेवण्यासाठी केले जाणारे प्रयत्नही मोलाचे.

एकीकडे समाजमाध्यमांवर आभासी दुनियेत हजारो, लाखो माणसांच्या गोतावळ्यात असलेला माणूस वास्तव जीवनात एकटा असू शकतो. त्याचे एकटेपण दूर करण्याचे कामही सणांच्या निमित्ताने होत असते. म्हणूनच वर्तमानातील सीमोल्लंघनाचा अर्थ पांडव काळातल्याप्रमाणे शस्त्र हाती घेऊन बाहेर पडण्याचा किंवा तेवढ्यापुरताच मर्यादित नाही. तर समाजजीवनातील विस्कटलेल्या चौकटी पुन्हा सांधण्याचा, माणसांना माणसांच्या जवळ आणण्याचा, सोने घ्या-सोन्यासारखे राहा, असे म्हणत नात्यांचे बंध अधिक घट्ट करण्याचा दिवस म्हणून दसर्‍यासारख्या सणांकडे पाहिले पाहिजे. पौराणिक संदर्भाचा आशय कायम ठेवून त्याची अभिव्यक्ती बदलण्याचे प्रयत्न केले पाहिजेत.

दसर्‍याचे पौराणिक संदर्भ आणि देशभरातील प्रथा-परंपरा वेगवेगळ्या आहेत; परंतु महाराष्ट्राने राजकीय, सामाजिक अवकाशात दसर्‍याला वेगळे परिमाण दिले आहे. ‘दसरा सण मोठा, नाही आनंदाला तोटा’ ही महाराष्ट्राच्या दसर्‍याची टॅगलाईन लक्षात घेतली तर त्याचे अनेक अर्थ समोर येऊ शकतील. कृषी संस्कृतीच्या दृष्टीने असलेले या सणाचे महत्त्व त्यानिमित्ताने अधोरेखित होत असते. सामान्य माणसाच्या आयुष्यात दसर्‍याचा दिनक्रम ठरला असला तरी राजकीय घडामोडींनी हे संदर्भही बदलून टाकले.

राजकीय संघटना मजबुतीसाठीचा महत्त्वाचा दिवस म्हणूनही याकडे पाहिले जाते. त्या दृष्टिकोनातून विचार केला तर विजयादशमीला महाराष्ट्रात दिवसभरात काय काय घडणार, याची कार्यक्रम पत्रिका जवळपास निश्चित झाली आहे. सकाळी नागपूरला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संचलन आणि त्यानंतर सरसंघचालकांचे मार्गदर्शन, त्यानंतर दुपारी मराठवाड्यातील भगवान गडावर पंकजा मुंडे यांचे भाषण. सायंकाळी मुंबईतील शिवाजी पार्कवर शिवसेनेचा दसरा मेळावा वर्षांनुवर्षे होत आला आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणाची महाराष्ट्राला मोठी उत्सुकता असे. शिवसेनाप्रमुखांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र उद्धव ठाकरे यांनी ही प्रथा सुरू ठेवली; परंतु यंदा त्यांच्या भाषणाची जी उत्कंठा आहे, तशी यापूर्वी कधीच नव्हती. त्याचे कारण शिवसेनेमध्ये पडलेली मोठी फूट. एकनाथ शिंदे यांनी चाळीस आमदारांसह शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करून महाविकास आघाडीचे सरकार पाडले. त्यानंतर आपलीच शिवसेना खरी शिवसेना असल्याचे सिद्ध करण्यासाठी त्यांनी अनेक पातळ्यांवर प्रयत्न सुरू ठेवले आहेत. निवडणूक आयोगाकडे ही लढाई आधीच पोहोचली आहे. दसरा मेळावा घेऊन ते आपला शिवसेनेवरचा दावा बळकट असल्याचे जनमानसाच्या मनावर बिंबविण्याचा प्रयत्न करीत आहेत.

राजधानी मुंबईत दोन्ही गटांकडून जोरदार शक्तिप्रदर्शन होत आहे. यंदाचा दसरा म्हणजे हिंदुत्वाचा तिरंगी सामनाच होणार यात शंका नाही. भारतीय जनता पक्षाची जननी मानल्या जाणार्‍या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक हिंदुत्ववादी विचारांची पेरणी करीत असतात. त्यातील संदर्भ घेऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे त्यांचा प्रतिवाद करीत असतात. 2019च्या विधानसभा निवडणुकीत भाजपशी युती तोडून महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केल्यापासून शिवसेनेची हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून कोंडी करण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जातो.

या पार्श्वभूमीवर तसेच मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेकडे विशेष लक्ष असेल. उद्धव ठाकरे यांची कोंडी करण्यासाठी यंदा एकनाथ शिंदे गटाकडूनही कोणतीही कसर ठेवली जाणार नाही. एकूणच यंदा दसर्‍याला विचारांचे सोने लुटले जाते की, वैचारिक धुळवड साजरी केली जाते, हेही पाहणे औत्सुक्याचे ठरेल. राजकीय पातळीवर धुमश्चक्री सुरू असताना नागपूरच्या दीक्षाभूमीवर याच दिवशी धर्मचक्रप्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा होतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लाखो अनुयायी तिथे हजेरी लावत असतात. राजकीय धुळवडीपेक्षा दसर्‍याचा हा पारंपरिक आनंदच सर्वसामान्य माणसांच्या जगण्यात आनंद द्विगुणित करीत असतो, त्यामुळे त्याचे महत्त्व अन्य कोणत्याही गोष्टीपेक्षा खचितच अधिक. हाच दसर्‍याच्या सीमोल्लंघनाचा अन्वयार्थ.

Back to top button