दसरा : सांस्कृतिक, राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक | पुढारी

दसरा : सांस्कृतिक, राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक

दसरा हे देशाच्या सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक आहे. एकता, बंधुभाव आणि सत्यमेव जयते हा संदेश दसरा देतो. देशभरात जागोजागी दसर्‍याच्या दिवशी रावण, कुंभकर्ण आणि मेघनाद यांच्या पुतळ्यांचे दहन केले जाते. प्रभू रामचंद्रांचा आदर्श आत्मसात करणे आणि इंद्रियांवर, दुष्प्रवृत्तींवर विजय मिळविणे हाच यामागील उद्देश असतो. या दिवशी आत्मचिंतन करून आपल्यातील दोष शोधून आपल्यातील रावणाचा विनाश केला, तरच दसर्‍याचा सण खर्‍या अर्थाने साजरा केला असे होईल.

आश्विन शुक्ल दशमी हा दिवस संपूर्ण देशभरात विजयादशमी किंवा दसरा म्हणून धूमधडाक्यात साजरा केला जातो. दसर्‍याला हिंदीत ‘दशहरा’ असे म्हणतात. ‘दस’ आणि ‘हरा’ दोन शब्दांच्या एकत्रीकरणातून हा शब्द तयार झालेला आहे. या शब्दाचा अर्थ ‘घेऊन जाणे’ असा आहे. अशा प्रकारे ‘दशहरा’ या शब्दाचा मूळ अर्थ दहा अवगुण घेऊन जाणे असा असून, या दिवशी आपल्या आतील दहा दोष किंवा अवगुण नष्ट करण्याचा संकल्प करायचा असतो. वस्तुतः प्रत्येक मनुष्याच्या आत रावणरूपी अनेक दोष असतात आणि या सर्व दोषांवर एकाच वेळी विजय प्राप्त करणे शक्यही नसते. त्यामुळे दसर्‍याच्या मुहूर्तावर अशाच काही दोषांचा नाश करण्याचा संकल्प करण्यातच या पर्वाचे सार्थक असते. प्रभू रामचंद्रांनी रावणावर मिळविलेल्या विजयाचे तसेच दुर्गादेवीने महिषासुर आणि चंड-मुंड या महाबलशाली राक्षसांवर मिळविलेल्या विजयाचे प्रतीक म्हणून दसरा साजरा केला जातो. चांगुलपणाचा वाईटावर विजय, सत्याचा असत्यावर विजय असाच या घटनांचा अर्थ घेतला जातो.

रावणाचा वध करण्यासाठी याच दिवशी श्रीरामांनी प्रस्थान ठेवले होते, असे मानले जाते. हिंदू राजे याच दिवशी विजयासाठी प्रस्थान ठेवत होते, असे स्पष्ट करणारे अनेक दाखले इतिहासात उपलब्ध आहेत. या दिवशी अपराजिता देवीचीही पूजा केली जाते. श्रीरामांनी समुद्रतटावर सर्वप्रथम शारदीय नवरात्राच्या पूजेस प्रारंभ केला होता आणि त्यानंतर दहाव्या दिवशी लंकेवर विजय प्राप्त केला होता, अशी मान्यता आहे. तेव्हापासून दसरा हा असत्यावर सत्याचा विजय तसेच अधर्मावर धर्माचा विजय म्हणून साजरा केला जातो.

दसर्‍याच्या दिवशी रावणावर प्रभू रामचंद्रांचा विजय अर्थात असुरी शक्तींवर सात्त्विक शक्तींचा विजय, अन्यायावर न्यायाचा विजय, वाईटावर चांगल्याचा विजय, असत्यावर सत्याचा विजय, अधर्मावर धर्माचा विजय, पापावर पुण्याचा विजय आणि द्वेषावर प्रेमाचा विजय झाला असे मानले जाते. दसर्‍याचे जेवढे धार्मिक महत्त्व आहे, तेवढेच सांस्कृतिक महत्त्व आहे. हा देशाच्या सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि राष्ट्रीय एकतेचा उत्सव आहे. राष्ट्रीय एकता, बंधुभाव आणि सत्यमेव जयतेचा मंत्र हा सण देतो.

पश्चिम बंगाल आणि मध्य भारताव्यतिरिक्त अन्य राज्यांमध्येही हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो आणि त्यात प्रादेशिक विविधतेचा अडथळा अजिबात जाणवत नाही. देशभरात दसर्‍याला जागोजागी रावण, कुंभकर्ण आणि मेघनाद यांच्या पुतळ्यांचे दहन केले जाते. श्रीरामांच्या आदर्शानुसार वाटचाल करणे आणि आपल्या इंद्रियांवर विजय प्राप्त करणे हीच त्यामागील भावना असते. हा सण खर्‍या अर्थाने आपल्या आत असलेल्या दुर्गुणरूपी रावणाचा वध करून सर्व अवगुणांवर विजय प्राप्त करण्याचा शुभकाळ आहे.

दसर्‍याचा संबंध नवरात्राशीसुद्धा आहे. शक्तीची उपासना करण्याचा हा काळ असून, शारदीय नवरात्र प्रतिपदेपासून सुरू होऊन नवमीपर्यंत नऊ तिथी, नऊ नक्षत्रे आणि नऊ शक्तींची नवविधा भक्ती करून नवरात्रौत्सव साजरा केला जातो. नवरात्रात देवीच्या शक्तींनी दशदिशा व्यापलेल्या असतात आणि देवी दुर्गेच्या कृपेमुळेच दहा दिशांना विजय प्राप्त होतो. म्हणूनच नवरात्रानंतर येणार्‍या सणाला विजयादशमी म्हणतात, असे मानले जाते. दसरा हा असुरी शक्तींवर नारीशक्तीचा विजय मानला जातो. आदिशक्ती दुर्गेला शक्तीचे रूप मानून शारीरिक आणि मानसिक शक्ती प्राप्त करण्यासाठी नऊ दिवस देवीच्या नऊ वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते. व्रत, अनुष्ठान केले जाते. जागोजागी दुर्गादेवीच्या विशाल मूर्तींची प्रतिष्ठापना केली जाते.

दुर्गा पूजेमुळे सुख-समृद्धी, ऐश्वर्य, धनसंपदा, आरोग्य, अपत्य, सुख आणि आत्मिक शांतीची प्राप्ती होते असे मानले जाते. नवरात्राच्या अंतिम दिवशी कुमारिकांना भोजन देऊन नवरात्राची सांगता केली जाते. नवरात्राच्या नऊ दिवसांत आपण देवीच्या नऊ रूपांची पूजा करतो; परंतु हे करताना आपण समजून घेतले पाहिजे की, आपल्या समाजात असलेल्या सर्व स्त्रिया या दुर्गा, सरस्वती, लक्ष्मी, पार्वती यांचीच रूपे आहेत. त्यामुळे या पर्वांची सार्थकता खर्‍या अर्थाने तेव्हाच होईल, जेव्हा आपण आपल्या समाजातील देवीरूपातील नारीशक्तीचा उचित सन्मान करू. स्त्रियांना गर्भातूनच नाहीशा करण्याचा राक्षसीपणा आपण करणार नाही. मुलींना वाचवून, त्यांना शिकवून त्यांचा हक्क देऊ. त्यांना आत्मनिर्भर बनवून सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळवून देऊ.

शारदीय नवरात्राचे अभिन्न अंग म्हणजे दसरा होय. दरवर्षी दुर्गोत्सवाची सांगता या पवित्र पर्वाने होत असताना वाईटावर चांगल्याचा आणि असत्यावर सत्याचा विजय मानला जाणारा हा सण मानवी मूल्यांच्या संरक्षणासाठी लढल्या गेलेल्या प्रत्येक लढाईत विजय प्राप्त करण्यासाठी बळ देतो. महाबली असुरसम्राट महिषासुराचा वध दुर्गादेवीने विजयादशमीलाच केला होता असे मानले जाते. जेव्हा महिषासुराच्या अत्याचारांनी भूलोक आणि देवलोक त्राहि-त्राहि करीत होते, तेव्हा आदिशक्ती दुर्गादेवीने नऊ दिवस महिषासुराशी घनघोर युद्ध केले होते आणि दहाव्या दिवशी त्याच्यावर विजय प्राप्त केला होता. हा नऊ दिवसांचा काळ दुर्गोत्सव म्हणून, शक्तिसंचयाचे प्रतीक मानून साजरा केला जातो. आदिशक्तीने महिषासुरावर मिळविलेल्या विजयाचे प्रतीक म्हणून दहावा दिवस ‘विजयादशमी’ या नावाने साजरा केला जातो. नवरात्राच्या प्रारंभी मातीच्या घड्यात माती भरून धान्य पेरले जाण्याची परंपराही देशाच्या अनेक भागांमध्ये पाहायला मिळते. दसर्‍याच्या दिवशी मुली त्यांच्या भावांना पगडी बांधतात किंवा घड्यात उगवून आलेली रोपे त्यांच्या डोक्यावर ठेवतात, तर भाऊ बहिणींना भेटवस्तू देतात.

जर या दिवशी आपण आत्मचिंतन करून आपल्या आतील दोष शोधून आपल्यातील रावणाचा विनाश केला, तरच दसर्‍याचा सण खर्‍या अर्थाने साजरा केला असे होईल.

– विजय शास्त्री जोशी

Back to top button