शशी थरूर पर्याय ठरतील? | पुढारी

शशी थरूर पर्याय ठरतील?

काँग्रेसमधील असंतुष्ट जी-23 गटाचे सदस्य असलेले शशी थरूर यांचेही नाव काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी समोर आले आहे. थरूर यांनी उघडपणे सांगितले आहे की, ते अध्यक्षपदाची निवडणूक लढविण्याचा विचार करीत आहेत. नुकतीच त्यांनी काँग्रसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली आहे.

सध्या काँग्रेस अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार, हा विषय गल्लीपासून दिल्लीपर्यंत चर्चेत आहे. खरे तर हा विषय अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. तरीही अद्याप यावर तोडगा काढण्यात आलेला नाही. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी इच्छुकांनी अर्ज दाखल करण्याची तारीख तोंडावर आली आहे. ही तारीख 24 ते 30 सप्टेंबर अशी आहे. म्हणजे खूपच कमी दिवस राहिले आहेत. तरीही इच्छुकांची नावे अजूनही घोषित करण्यात आली नाहीत. मात्र, यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. कारण, शेवटच्या दिवशीसुद्धा ही नावे घोषित करता येतील. हा पक्षातील अंतर्गत भाग आहे. कोण इच्छुक असणार, याबाबत मात्र संभ्रम कायम आहेच; शिवाय अध्यक्षपद निवडणुकीबाबतही अजूनही संभ्रम कायम असल्याचे दिसून येते.

याबाबत राहुल गांधी, अशोक गेहलोत अशी नावे पुढे आली आहेत; पण राहुल गांधी हे पुन्हा अध्यक्ष न बनण्याच्या मतावर ठाम आहेत. असे त्यांनी आताही ठामपणे सांगितले आहे. त्यामुळे अशोक गेहलोत हे नाव पुढे येत असतानाच काँग्रेस पक्षातील असंतुष्ट जी-23 गटाचे सदस्य असलेले शशी थरूर यांचेही नाव समोर आले आहे. यात जर-तर असले तरी थरूर यांनी उघडपणे सांगितले आहे की, ते अध्यक्षपदाची निवडणूक लढविण्याचा विचार करीत आहेत. नुकतीच त्यांनी काँग्रसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली आहे. अशी बातमी आहे की, यावेळी सोनिया गांधी म्हणाल्या की, या निवडणुकीत त्यांची भूमिका तटस्थ असणार आहे.

शशी थरूर यांना ही निवडणूक लढवायची असेल तर त्यांनी जरूर लढवावी. ही बातमी खरी आहे असे समजून चालले, तर काँग्रेसमधील अंतर्गत संभ्रम काही प्रमाणात कमी होऊ शकतो. कारण या संभ्रमामागे एक कारण आहे, ते म्हणजे एक अशीच बातमी आहे किंवा अफवा आहे की, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत आणि यासाठी त्यांनी होकार दिला आहे. जर ही बातमीही काही प्रमाणात खरी असेल तर सोनिया गांधी यांच्या सध्याच्या मतानुसार हे स्पष्ट होते की, गांधी परिवार कोणत्याही खास उमेदवारास प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पाठिंबा देण्याचे घोषित करणार नाही.

पक्षात संभ्रमावस्था असण्याचे आणखी महत्त्वाचे कारण म्हणजे एकापाठोपाठ अनेक काँग्रेसच्या प्रदेश संघटकांनी राहुल गांधी हे अध्यक्षपदाचे उमेदवार असतील, यास पाठिंबा दर्शविला आहे. तसेच राहुल गांधी हेच काँग्रेसचे अध्यक्ष व्हावेत, यासाठी त्यांनी प्रस्तावदेखील मांडला आहे. गेहलोत यांच्याच राजस्थान या राज्यातून ही प्रक्रिया सुरू झाली आणि आतापर्यंत छत्तीसगड, गुजरात, महाराष्ट्रासह सहा काँग्रेसच्या प्रदेश संघटनांनी सर्वसंमतीचे हा प्रस्ताव मंजूरसुद्धा केला आहे.

जर एकीकडे निवडणुकीसाठी घोषणा झाली आहे, नामांकन करण्याची तारीखही जवळ आली आहे आणि दुसरीकडे प्रदेश संघटनाच राहुल गांधी यांनाच अध्यक्ष करण्याचा प्रस्ताव मंजूर करीत असतील तर, या ठिकाणी असा प्रश्न पडतो की, पक्षांतर्गत काय हालचाली सुरू आहेत आणि खरेच पक्षाला अध्यक्षपदाची निवडणूक घ्यायची आहे की, केवळ औपचारिकता दाखवायची आहे?

आजपर्यंतचा पक्षाच्या हालचालीचा विचार करता असे लक्षात येते की, पक्षाचे अध्यक्षपद राहुल गांधी यांनी स्वीकारावे यासाठी त्यांचे मन वळविण्याचाच प्रयत्न झालेला दिसतो. आणखी महत्त्वाचा मुद्दा म्हणजे स्वतःला काँग्रेसशी एकनिष्ठ दाखविण्यासाठी प्रादेशिक नेते राहुल गांधींना समर्थन देत असल्याचे सध्या चित्र आहे. विशेष म्हणजे आताही आपण अध्यक्षपद स्वीकारणार नाही, या मतावर राहुल गांधी ठाम असल्याची बातमी आली आहे. यातील सत्य काहीही असो आणि इच्छुक कुणीही असो किंवा त्यांची संख्या कितीही असो, अध्यक्षपदाची निवडणूक ही ठरलेल्या वेळी आणि निष्पक्ष, पारदर्शी आणि विश्वसनीय पद्धतीने व्हावी, यातच काँग्रेस पक्षाचे हित आहे.

– अपर्णा देवकर

Back to top button