शिक्षण बदलतंय… की हरवतंय?

शिक्षण बदलतंय… की हरवतंय?
Published on
Updated on

ता काय पोरांना गृहपाठच नसणार का म्हणे?'
'कोण म्हणे?'
'शालेय शिक्षणमंत्री. निदान इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत तरी गृहपाठाची काही जरुर नाही म्हणतायत.'
'आपल्यावेळी केवढा अभ्यास द्यायचे. शाळेतून घरी आलो की त्या हमालीलाच जुंपले जायचो आपण.'
'हो. पुन्हा तो नीट केला नाही तर पट्ट्या खाणं, वर्गाबाहेर उभं राहाणं अटळच.'
'खरं तर त्या वयातच पोरं सर्वात वांड असतात नाही?'
'असतात. वर्गात लक्ष देत नाहीत. म्हणून घरीतरी सराव करावा, अभ्यास पक्का करावा असं वाटायचं पूर्वी.'
'बाबो, मग आताच गृहपाठ का नको म्हणे?'
'मुलांवर फार दबाव येतो त्याचा. आधीच शाळेत जाऊनयेऊन थकलेली असतात बिचारी.'
'उगाच पानंच्या पानं खर्डेघाशी करायला लावणं, काय तर म्हणे, गणितं सोडवा, प्रश्नांची मोठमोठी उत्तरं लिहा, वह्यामागून वह्या भरवा, याने फक्त दप्तरंच पोत्यासारखी होणार ना?'
' पण त्यांच्या दप्तरांचं ओझंही आता कमी केलं ना म्हणे?'
'होय हो. पोरं केवढी? त्यांच्या पाठी केवढ्या? त्यावर ती ओझी किती लादायची? असा विचारच नाही केला कोणी पूर्वी. पुन्हा जरा पोराचा गृहपाठ कमी पडला की पट्ट्या मारायला हे मोकळे!'
'मध्यंतरी वर्गात पोरांना मारण्यालाही बंदी घातली गेली ना हो?'
'हो तर. विद्यार्थ्यांना शारीरिक इजा करणं बंदच केलं. काय शिस्तबिस्त लावायची ती तोंडाने लावा. अंगाला हात, पट्टी, पोकळ बांबू वगैरे लावायचं काम नाही.'
' बराबर आहे, कोवळी असतात पोरं. त्यांना धाकात ठेवण्यापेक्षा प्रेमानं समजवावं हे बरं.'
'आता परीक्षाही न घेण्याकडे कल आहे. कुठे मार्कबिर्क देताय? हा वरचढ, तो कच्चा वगैरे सांगताय, पोरांच्यात न्यूनगंड आणताय, असं म्हणताहेत लोक.'
'अच्छा, म्हणजे करताकरता घरचा अभ्यास नको, परीक्षा नकोत, मार्क नकोत, पास नापास नको, त्याबद्दल शिक्षा नकोत असं एकेक सगळं सोडत चाललो आपण. पण मग आपल्या मुलाचं ज्ञान वाढतंय, प्रगती होतेय की नाही?, इतर मुलांच्या तुलनेत तो कुठे आहे? हे आपल्याला कसं कळावं?'
'कशाला कळायला हवं? तुमचा मुलगा, मुलगी ढ आहे, नर्मदेतले गोटे आहेत, असं सांगून वाईटपणा कोण घेणार? बच्चाभी खूष, बापभी खूष, टीचरभी खूष, इस्कूलभी खूष, असंच हवंय बहुतेक लोकांना.'
'अहो, मातीदगड ह्यांच्याशी टक्कर देत रोपं जमिनीतून वर येतात. भिजवलेल्या कडधान्याला वर वजन ठेवल्यावरच तरतरीत मोड येतात. दबाव, ताण ह्याशिवाय काहीच वाढत नाही जगात.'
'हे सगळे जुने, बाबा आदमच्या काळातले विचार झाले बरं का.'
'असं म्हणता? मग एवढाल्या शाळा तरी का बांधता? शिक्षणखातं तरी कशाला हवं? ह्याच्यापुढे फक्त सार्वजनिक बागाच वाढवा गावोगावी. पोरांना त्यांच्यात जायचं तेव्हा जाऊ दे, तिथे करायचं ते करु दे. आपण फक्त टाळ्या वाजवत बसू. गोडवा हवाय ना? मग घ्या गोडवा. समाजातली अनागोंदी वाढवा.'
– झटका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news